होळीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏😊

होळी

लोकशाहीला श्रद्धांजली

लोकशाहीला श्रद्धांजली द्यावी, अशी स्थिती निर्माण झाली आहे. जे जे राज्यघटना व तत्व म्हणून राजकारणात आहे. त्याच्या नेमकं उलट घडत आहे. एक देश म्हणून आपण दररोज अधोगती करीत आहोत. ज्याप्रमाणे पाकिस्तान, म्यानमार, इंडोनेशिया, बांग्लादेश धर्माधतेच्या चिखलात डुंबत आहे तिकडे आपली वेगाने वाटचाल होत आहे.

फक्त धर्मांधता नाही तर नीतिमत्तेचा देखील कोणताही विचार सत्तापिपासू सत्ताधारी करीत नाहीत. असंगाशी संग हाही तोकडा वाटावा अशी परिस्थिती आहे. बेबंदशाही सुरु झालेली आहे. चार चार पक्ष बदललेला राहुल नार्वेकर हा व्यक्ती हा पक्षांतर बंदीवर निर्णय देतो. यातून लोकशाहीची वाताहत स्पष्टपणे दिसते. सर्वोच्च न्यायालयाला ह्या नुरा कुस्तीत कसली मजा येते हेही अनाकलनीय आहे. (more…)

मराठीचा द्वेष

सध्याचा काळ मराठी भाषिकांसाठी अत्यंत कठीण असा आहे. अनेक ठिकाणी मराठीचा वापर हे तो हेतूपुरस्सरपणे टाळला जात आहे. हा प्रश्न आताचा नाही अनेक वर्षांपासून विशेषतः सरकारी पातळीवर मराठीचा द्वेष म्हणावा या पातळीचा कारभार सुरू आहे. (more…)

काय बोलावं

काय बोलावं असा प्रश्न पडलेला आहे. इतके विषय आहे की, प्रत्येक विषयावर व्यक्त झालो तर एखादा ग्रंथ वगैरे तयार होईल. असो, गमतीचा भाग सोडला तर देश म्हणून आपण अपयशी ठरतोय असे वातावरण आहे.

ज्ञान मिळवणे प्रत्येकवेळी फायद्याचेच असते असे नाही. अज्ञानात सुख आहे. ह्या वाक्याची अनुभूती घेत आहे. आजकाल घरोघरी पदवीधर आहेत. अन जितके पदवीधर आहेत तितकेच बेरोजगार देखील आहेत. ही वस्तुस्थिती आहे. परंतु रोजचंच मढ, त्याला कोण रड? ह्या बेरोजगारांनी देश तयार करायचा ठरवला तर पाचपट ऑस्ट्रेलियाच्या अधिक लोकसंख्येचा तो देश असेल. महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या आसपास देशातील बेरोजगारांची संख्या आहे.

बेरोजगारीकडे दुर्लक्ष करावे अशी परिस्थिती संपलेली आहे. शासनाने गेल्या सहा वर्षांपासून कोणतीही भरती केलेली नाही. याचा अर्थ त्यांना उमेदवारांची गरज नाही. किंवा त्यांनी परीक्षा घेतल्या नाहीत. असा होत नाही. परीक्षा घेणे व त्यासाठी शुल्क आकारणे. अन त्या शुल्कावर देखील कर लावून वरकमाई करण्याचा त्यांनी आवडता उद्योग सुरु केला आहे. पूर्वी ह्या बेरोजगारांना नोकरीचे मृगजळ दाखवून अनेक खासगी संस्था व्यक्ती रोजगार मेळावाच्या नावाखाली लुटत होते. आता हाच उद्योग सरकारने देखील आरंभलेला आहे.

बरं, शासनाने गेल्या दशकात पेट्रोल, डिझेलवरील करातून अफाट संपत्ती मिळवली. इतका कर आकारणारा जगाच्या पाठीवर दुसरा कोणताही देश नाही. मग इतके श्रीमंत सरकार आहे असे म्हणावे अशीही परिस्थिती नाही. देशात २०१४ सालापर्यंत ५४ लक्ष कोटींचे कर्ज होते. आता ते २५०% पटींनी वाढून २०५ लक्ष कोटी इतके झाले. हे काय दर्शविते? काय बोलावं अन किती बोलावं?

भ्रष्टाचार संपला अशा वल्लागना कितीही होत राहोत. प्रत्यक्षात मात्र परिस्थिती गंभीर आहे. एका रात्रीत सात विमानतळांचे कंत्राट एकाच उद्योगपतीला मिळते. बर कागदी विमान सांभाळण्याचा देखील अनुभव नसलेल्या उद्योगपतीला कोणतीही निविदा, जाहिरात, प्रस्ताव न मागवता ताबडतोप कसे दिले जाते. हा खूप गंभीर विषय आहे. जागतिक पातळीवर मंदी असतांना त्या उद्योगपतीची वार्षिक उलाढाल ५ कोटी देखील नसतांना तीन वर्षात जगातील तिसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत उद्योगपती अशी गणना होते.

एक रुपयाचे देखील उत्पादन नसणाऱ्या पक्षाकडे आता सप्ततारांकित कार्यालये आहेत. एकही पुढारी वा पक्ष कर्जबाजारी होऊन आत्महत्या केल्याची घटना नाही. याऊलट ते महागड्या गाड्या घेऊन मिरवतात. हे सगळं कशाचं द्योतक आहे? अजून एक उदाहरण. ६५०० कोटींचे कर्ज असलेल्या उद्योगपतींचे कर्ज १५०० कोटींमध्ये रद्दबादल झाले. अन संबंधित उद्योगपतीला जप्त केलेली संपत्ती व उद्योग पुन्हा सुरु करण्याची अनुज्ञप्ती दिली गेली. मध्यंतरी ४८ हजार कोटींचे कर्ज असलेल्या उद्योगपतीला एक दिवसाची देखील शिक्षा नाही. उलट ४५५ कोटीत तो उद्योग विकला.


बातमीचा दुवा

यातील गमतीचा व सामायिक भाग असा की कर्ज देणाऱ्या सर्व संस्था ह्या शासकीय मालकीच्या होत्या. अन तोटा सहन करून त्या संस्था अवाक्षर देखील काढत नाही. विरोधक असोत की भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणाऱ्या अंमलबजावणी संचालनालयसारख्या संस्थांच्या ह्या आर्थिक गुन्ह्यांवर बोलण्याची देखील टाप नाही. कारवाई तर लांबचीच गोष्ट.

काय बोलावं पासून सुरवात करून बरंच बोललॊ. बोलता बोलता बरंच काही बोललो. असो, सुज्ञास अधिक सांगणे न लगे.

योग्य दिशा

योग्य दिशा

योग्य दिशा मिळण्यासाठी बराच काळ लागतो. बराच विचार अन खल करावा लागतो. हे अनुभव आज येतोय. व्यवसाय उभा करायचे ध्येय बाळगून २०१६ साली ठरवलेलं. त्यावेळेसही कठीण काळ सुरु होता. आताही सुरु आहे.

परंतु, आता गेल्या काही काळातील अनुभवातून व मिळालेल्या ज्ञानातून हेही एका देवळातील देवाच्या भेटीप्रमाणे आहे. एखाद्या विषयात तुम्ही पारंगत आहात याचा अर्थ तुम्ही स्वबळावर आर्थिक स्वातंत्र्य मिळवू शकता. पण त्यासाठी जसे तुम्ही तुमच्या क्षेत्रात शिक्षण आणि सराव केला. तसेच शिक्षण आणि सराव हा व्यवसाय नावाच्या विषयात देखील ते मिळवणे आवश्यक आहे.

त्यासाठी तुम्हाला व्यवसाय काय विषय आहे. त्यासाठी काय करणे आवश्यक आहे. सोबत व्यवसाय सुरु करण्यासाठी व नंतर लागणाऱ्या आर्थिक भांडवलाच नियोजन अशा अनेक गोष्टी येतात. मी अभिमन्यूप्रमाणे ह्या आर्थिक स्वातंत्र्याच चक्रव्यूह भेदले. पण त्यातून यशस्वी बाहेर कसे पडावे. हे मात्र माहित नसल्याने संकट ओढवून घेतले. संकट आल्यावर जे घडायचे ते सगळं घडले. आनंदाची बाब अशी की, यातून लाख मोलाचे ज्ञान मात्र मिळाले.

व्यवसाय करणे आणि तुमचे कार्यक्षेत्र ह्या दोन भिन्न बाबी असतात. व्यवसाय म्हणजे माणसे. त्यांच्याशी संवाद. त्यांच्या अडचणी सोडवण्याची संधी म्हणजे तुमचे काम. अन यातून तुम्हाला अन त्याला दोंघांना फायदा झाला तर झाला यशस्वी व्यवहार. नाहीतर यापैकी एकदा जरी तोट्यात गेला. तर मात्र वितुष्टता निर्माण होते. मी माझ्या कारकिर्दीत अनेक कामे एकहाती सांभाळली. त्यामुळे माझ्या क्षेत्रात मी पारंगत होतो. याची मला जाणीव होती. परंतु, मी ज्या आस्थापनेत कामाला होतो. त्यांचे सर्व ग्राहक अमेरिकादी देशातील होते.

तेथील लोक मी वास्तव्य करतो त्या देशाच्या मानाने सर्वच बाबतीत पुढारलेले. त्यामुळे त्याच्यासोबत काम करण्याचा फारसा फायदा मला इथं झाला नाही. त्यामुळे काही मोजके अपवाद वगळता अनेक अडचणी येत गेल्या. केलेल्या कामाचे पैसे काढणे हे तर वाघाच्या तोंडातील घास काढण्याइतके कठीण काम. सुदैवाने मला बहुतांशी ग्राहकांनी यात मला साहाय्य केले. आता जाऊन वेळेचे महत्व, प्रकल्प स्वीकारण्याआधी त्याचा सखोल अभ्यास. प्रकल्पाची नीट रूपरेषा. अन सगळ्यात महत्वाचं ग्राहकाची इच्छा. अन ते करण्यासाठी आपल्याला परवडेल अशी रक्कम. ह्या बाबी अतिशय महत्वाच्या आहेत. नाहीतर संकटांचे टोळके तुम्हाला हैराण केल्याखेरीज रहात नाही. यासाठी योग्य दिशा मिळणे महत्वाचे आहे.

दुष्काळ

दुष्काळ

दुष्काळ हा विषय अनेकदा चर्चिला आहे. त्यामुळे याच महत्व कमी झालंय. रोजचंच मढ त्याला कोण रड अशी परिस्थिती आहे. दुष्काळ कधीही एकटा येत नाही. त्यामुळे ह्याच भय अधिक आहे.

आपल्या देशात केवळ तीन टक्के लोकांचे वार्षिक उत्पन्न तीन लाखांहून अधिक आहे. दरडोई कर्जाचा बोजा उत्पन्नाच्या देखील जास्त. त्यात दुष्काळ पडला की त्याने अधिकच संकट वाढते. बर दुष्काळासाठी निसर्ग जबाबदार ठरवणे हा अडाणीपणा आहे. महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर दर वर्षाआड दुष्काळ येतो. यासाठी महाराष्ट्र सरकारने दुष्काळ कर देखील लागू केला आहे. आता त्या कराच्या रकमेचे पुढे काय होते हे देवालाही माहित नसावे.

स्पष्ट बोलायचं झालं तर तेल शुद्धीकरणासारखे जमीन नापीक आणि जीवसृष्टी नष्ट करणारे प्रकल्प असोत. वा बेसुमार वृक्षतोड हे सरकारचे पाप आहे. देशातील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होते. पण मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्याचा सरकारी खाक्या संकट अधिक गंभीर करतो. बरं कुठे पुराने गावे आणि शहरे पाण्याखाली जातात. तर कुठे लोहगाडीने पाणी आणावं लागते. बरं एवढा कर घेऊन सरकार नेमकं काय करते हेच मूळ कोडे आहे!

दुष्काळसोबत पाणीटंचाई, तापमानात वाढ, शेती उत्पादनात घट सारख्या गोष्टी येतात. त्यामुळे महागाईत वाढ होते. आणि सर्वसामान्यांचे जीवनमान खडतर होते. अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होतो. उत्तरेतील राज्यात मोठा पाणीसाठा आहे. त्या नद्या दक्षिणेत आणल्या तर हा प्रश्न सुटू शकतो. तिकडे चीनमध्ये हुकूमशाही असूनही तीन मोठे नदीजोड प्रकल्प पूर्ण झाले. आपल्याकडे सर्वोच्च न्यायालयाने २००६ साली आदेश देऊनही एकही नदीजोड प्रकल्पाची साध्या बैठकीची वानवा आहे. माझ्यामते, जोवर सरकारमध्ये बौद्धिक दुष्काळ आहे. तोवर दुष्काळ सोडा कोणताही प्रश्न सुटणार नाही. बरं लोकही इतके सरावली आहेत की, त्यांनी सरकारकडून अपेक्षा करणे कधीच सोडले आहे.

नाम सारख्या सामाजिक संस्था उत्तम कामगिरी करतात. पण सरकारला अफाट संपत्ती आणि मनुष्यबळ असूनही ते जमेना. कारण बुद्धीचा दुष्काळ आहे. बर हवामान बदलामुळे वणवा, वादळ, दुष्काळाचा फटका इतरही देशांना बसत आहे. पण ते देश तेथील सरकार हा विषय गांभीर्याने घेते. आपल्याकडे फक्त जाहिरातबाजी. साहेब फक्त उत्सवप्रिय! मूळ प्रश्नांना जोवर सरकार भिडणार नाही तोवर सगळंच अशक्य आहे.

कर घेऊन कर्जबुडवे उद्योगपतींची कर्जे फेडणे हेच जीवितकार्य असल्याप्रमाणे सरकारचे वर्तन आहे. ३९ रुपयांच्या पेट्रोलवर ६७ रुपयांचा कर लावून १०६ ला विकणारे सरकार अब्जावधी रुपयांची संपत्ती केवळ जाहिरात आणि उद्योगपतींच्या तुंबड्या भरण्यात खर्च करीत आहे. वर्षानुवर्षे हा प्रश्न असूनही त्याकडे दुर्लक्ष अराजकतेकडे नेणारे आहे!!

शांतता

शांतता

शांतता ही महत्वाची गोष्ट आहे. जिथे शांतता नांदते, तिथे प्रगती निश्चित होते. गोंगाट लक्ष विचलित करतो. गोंधळ, गोंगाट जिथे वाढतात तिथे अशांतता वाढते. अन प्रगतीचा वेग मंदावतो. त्यामुळे शांतता महत्वाची.

शांतता आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी महत्वाची आहे. शांततेमुळे आपल्या कामात लक्ष लागते. अन काम नीट होते. जितके एकाग्रतेने काम होते. तितका त्या कामाचा दर्जा सुधारतो. अशांततेमुळे शाररिक आणि मानसिक त्रास वाढतो. हृदयाचे स्पंदने वाढतात. त्यामुळे शारीरिक समतोल बिघडतो. आणि त्याचा परिणाम शरीराबरोबर कामावर देखील होतो.

सुख आणि समाधान ह्या गोष्टी शांततेमुळे सहजप्राप्त होतात. देवळात गेल्यावर आपल्याला समाधान का मिळते? कारण तिथं शांतता असते. आता तुम्ही या उदाहरणाची तुलना पुण्यातील दगडूशेठ वा मुंबईचा सिद्धिविनायक वा पंढरपूरचा विठ्ठल रुक्मिणीच्या देवळासोबत करू नका. ती प्रसिद्धी पावलेली अन सदा गजबजलेली ठिकाणे आहे. तिथे देवाचं दर्शनऐवजी धक्काबुक्की होईल.

धार्मिक ग्रंथ देखील हीच शिकवण देतात. तेही याचमुळे. माणसेच काय देश देखील अशांत झाले की संहारक होतात. वनातील  श्वापदांप्रमाणे जीवावर उठतात. युद्ध, प्रदूषण वाढवून निसर्गाची व स्वतःची हानी करतात. स्वतःच्या इंद्रियांवर नियंत्रण असावे. त्याखेरीज आपण सुसंवाद साधू शकत नाही. शांतता सुसंवादामुळे टिकतो. अडचणी कमी करतो.

व्यक्तीने समाज आणि समाजाने राष्ट्र घडते. व्यक्ती सर्व गोष्टींचा गाभा आहे. जेवढी आसक्ती कमी तेवढ्या गोष्टी सहजसाध्य होतात. प्रादेशिक असमतोल वाढण्याचे मूळ कारण हेच. असमतोलच जर दूर केला तर वाद येणार कुठून? वाद नसेल तर शांतता टिकवणे शक्य आहे. ऐतिहासिक काळ चाळला तर शूरवीरांच्या भूमीत प्रगती अन शांतता नांदलेली दिसेल. शौर्याच्या बळावर त्यांनी स्वतःची प्रगती केली.

देश, समाज ह्या मोठ्या गोष्टी आहेत. आपण स्वतःला जरी शांत ठेवलं. आपला आजूबाजूचा, घराचा परिसर देखील शांत ठेवला तरी ह्यात आपलेच हित आहे. अकारण चीडचीड. निष्कारण वाद हे हितवाह नसतात. त्यातून शांतता बिघडते. अन प्रगतीला अडसर निर्माण होतो. ह्याचा अर्थ सहन करा असा मुळीच नाही. पण सुसंवादाची कला अवगत केली तर बदल शक्य आहेत. खरतर ह्या गोष्टी वयाच्या एका टप्प्यानंतर आपोआप उमजतात. त्यामुळे फारशी चिंता नसावी. शांततेचे महत्व जरी जाणले तरी अनेक बदल सहजसाध्य आहेत.

चेंडूफळी

चेंडूफळी

चेंडूफळी हा आजकाल क्वचितच दिसणारा शब्द. क्रिकेट इंग्रजी शब्दाला हा मराठी पर्यायी शब्द. क्रिकेट ह्या शब्दाचा मराठीतच काय इंग्रजीत देखील काही अर्थ नाही. तो शब्द ‘क्रिक’ ह्या फ्लेमिश भाषेतून आलेला आहे. फ्लेमिश भाषा बेल्जीयममधील. क्रिक शब्दाचा इंग्रजी अर्थ स्टिक. मराठीत आपण शब्दशः न घेता एकत्र असा घेऊ शकतो.

एकत्र म्हणजे सर्व खेळाडूंना एकत्र हा खेळ खेळावा लागतो. या अर्थानं. अनेकांना हा अर्थ वा शब्द अतार्किक वाटेल. त्यापेक्षा चेंडूफळी हा शब्द अधिक संयुक्तिक वाटतो. कारण यात चेंडू व फळी या दोन्ही गोष्टी आहेत. आणि महत्वाचं म्हणजे त्याचा अर्थ सहजपणे समजेल असा आहे. सध्याचा काळ इंग्रजी शब्दाचा असल्याने कदाचित काहींना हे कठीण वाटेल. परंतु, हा शब्द सहजपणे वापरला जाऊ शकतो.

शेवटी भाषा म्हणजे काय? आपण जी बोलतो ती गोष्ट. मग कोणताही शब्द वापरला तर काय हरकत आहे असाही यावर वाद होऊ शकेल. परंतु शब्द बदलले की भाषा बदलते. भाषा बदलली की संस्कृती. आणि आजूबाजूच्या संस्कृती जर निसर्गाला पूरक नसेल तर निसर्गाची हत्या होते. अगदी उदाहरणादाखल, दिवाळीत फटाके हा काही आपला प्रकार नाही. चीनमधून तो आलेला. परंतु, तो आपल्या संस्कृतीत इतका रुळलाय की, संस्कृतीरक्षकांना फटाके उडवू नका. त्याने पर्यावरणाची हानी होते. असे सांगितले तर ते चिडतात.

३१ डिसेंबर अगदी अघोषित राष्ट्रीय सण झाला आहे. तिथेही फटाके, दारू आणि न बोलाव्या अशा गोष्टी घडतात. मुद्दा इतकाच की शब्द, संस्कृती बदलल्यावर काय काय परिणाम होऊ शकतात. ह्याच उदाहरण. अगदी सर्व पुढारलेले देश त्यांच्या भाषेची एकरूप झालेले तुम्हाला दिसतील. आता चेंडूफळी म्हणा की क्रिकेट. हे तुमच्या विवेकबुद्धीला पटेल ते वापरा. कालच एक चेंडूफळीचा सामना पहिला. खरं तर बऱ्याच वर्षांनी पाहिला. त्याचे समालोचन मराठीत असल्याने ऐकण्यास सुलभ झाले.

शब्द तयार होण्याचा काळ हा मोठा असतो. भाषा तयार होण्यासाठी कित्येक दशके जातात. परंतु, भाषा नष्ट करण्याला शब्दच जबाबदार ठरतात. मुख्य प्रवाहात चेंडूफळी हा शब्द जाईल की नाही. माहित नाही. परंतु, यापुढे चेंडूफळी हाच शब्दाचा वापर करणे मला एक शब्द आणि भाषा प्रेमी या अर्थानं योग्य वाटतो. कारण त्याला उमजेल असा अर्थ आहे. आपणही याचा विचार करावा.

कशासाठी तर मतांसाठी

कशासाठी तर मतांसाठी

कॅनडाच्या पंतप्रधानांनी भारत सरकारवर केलेले आरोप अनेकांसाठी धक्कादायक आहे. मुळापाशी गेलात तर हे कशासाठी तर मतांसाठी आहे हे लक्षात येईल. भारत सरकारला देखील असे आरोप हवेच. यात दोन देशांचे हित नसले तरी दोन पुढाऱ्यांचे हित नक्कीच आहे.

हरदीपसिंह निजेर नामक खलिस्थानी अतिरेक्याची हत्या कॅनडात झाली. त्यामागे भारत सरकारचा हात आहे, असा आरोप कॅनडाच्या पंतप्रधानांनी त्यांच्या लोकसभेत केला. परकीय सरकारकडून आमच्या नागरिकाची हत्या हा आमच्या सार्वभौमत्वावर हल्ला आहे वगैरे बोलले. बाहेर आल्यावर पत्रकारांशी बोलतांना आम्हाला या विषयाचे गांभीर्याची जाणीव भारत सरकारला करून द्यायची आहे. असे म्हणाले. पत्रकारांनी पुरावे मागितले. त्यावर त्यांनी हे गोपनीय आहे वगैरे म्हणाले. महागाईचा प्रश्न विचारल्यावर त्यांनी अक्षरशः पळ काढला.

गंमत आहे नाही? अगदी याच प्रश्नावर भारतातील सरकार देखील पळ काढते. कॅनडाच्या येत्या २०२५ सालात तेथील लोकसभेच्या निवडणुका आहेत. अन भारताप्रमाणे तिथेही सगळं निराशेचे वातावरण आहे. त्यात सध्यस्थितीत पंतप्रधानांना भारतातून गेलेल्या शीख समुदायाचा पाठिंबा आहे. सगळेच शीख खलिस्तानवादी नाहीत. परंतु, राष्ट्रवादाचा मुद्दा हा भावनिक असल्याने अनेकांना तो भावतो. त्यामुळे मी काहीतरी करतोय हे दाखवण्याचा प्रयत्न आहे. गंमत म्हणजे कॅनडाच्या विरोधी पक्ष नेत्याने देखील पुरावे द्यावे अशी मागणी केली आहे.

आपल्याकडे मात्र शक्य तेवढे भांडवल करण्याचा आपल्या सरकारचा प्रयत्न आहे. यातून त्यांना आपल्या राष्ट्रवादी मतपेढीला खेचण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे आम्ही केलं नाही म्हणायचं. अन दुसरीकडे, बघा आम्ही इतके शक्तिशाली आहोत की दुसऱ्या देशाचा पंतप्रधान आमच्यावर आरोप करतोय, हे बिंबवायचे. ह्यातून तिकडे ट्रूडू अन इकडे मोदीभाऊ आपण कसे राष्ट्रहित साधतोय हे दाखवण्याचा प्रयत्न आहे.

याआधी दोन कॅनडाच्या नागरिकांची चीन सरकारने हत्या केलेली. त्यावर ट्रूडू यांनी आजवर कधी ब्र देखील काढला नाही. आता तिकडे कॅनडात एका व्यक्तीची हत्या होते. तीन महिन्यात एकाही आरोपीला अटक होत नाही. अन हे बाबा जाहीरपणे दुसऱ्या देशाला आरोपी म्हणतात. हे अगदी आपल्याप्रमाणे आहे. पुलावामात सैन्यावर हल्ला झाला. ४० सैनिक ठार मारले. आपल्या सरकारने याची चौकशी देखील केली नाही. उलटपक्षी आम्ही पाकिस्तानात घुसून अतिरेकी तळावर हल्ला करून २०० अतिरेकी मारले अशा बातम्या छापून आणल्या.

अशा हल्ल्याचा पुरावा मागितल्यावर सत्ताधाऱ्यांनी सैन्यावर अविश्वास का दाखवता असा उलट प्रश्न करून वेळ मारून नेली. हवाई सैन्य दल प्रमुखांनी आम्हाला दिलेल्या ठिकाणावर आम्ही हल्ला केला. किती मारले गेले हे मोजणे आमचे काम नाही म्हटले. मग २०० अतिरेकी मारले ही बातमी कुठून आली. तर ही बातमी पसरवण्याचं काम खुद्द गृहमंत्र्याने केलेलं. चीनने अर्धा लडाख गिळंकृत केला. वीस सैनिकांचा बळी घेतला. त्यावर साधी चर्चा देखील लोकसभेत न करणारे कॅनडाच्या आरोपात थयथयाट करीत आहे.

२०२४ ला भारतात आणि २०२५ ला कॅनडात लोकसभेच्या निवडणुका आहेत. अन त्यासाठी दोन्ही देशातील राष्ट्रवादी मंडळींना आपल्या बाजूने खेचण्याचा निव्वळ डाव आहे. काही दिवसांपूर्वी, तेथील एका राज्यातील देवाणघेवाण विभागाच्या मंत्र्याने (आपल्याकडे कृषीमंत्रालय हा विभाग सांभाळते) ट्रूडू सरकारने अकारण कसे भारताशी वाद निर्माण केले आहेत. यावर दाखल्यांसहित आरोप केलेले.

थोडक्यात कशासाठी तर मतांसाठी हा संदर्भ घ्यावा. कारण दोन्ही देशातील सत्ताधाऱ्यांना महागाईसारख्या प्रश्नांना तोंड देता आलेले नाही. तिकडे अन इकडे अनेक प्रश्नांवर तोंडावर आपटल्यावर फक्त नागरिकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याची चाल आहे! तूर्तास इतकेच.

निर्भीडपणा

निर्भीडपणा

निर्भीडपणा हा एक गुण आहे. कसलीही भीती न बाळगता स्पष्टपणे बोलणे. हा गुण अंगी बाळगण्यासाठी अनेक बाबी आधी असणे आवश्यक आहे. असे व्यक्ती अगदी क्वचितच असतात. अन अशा व्यक्तींची भीती लबाडांना अधिक असते.

अनेकदा इतरांना दुखवायचे नाही म्हणून शब्द जपून वापरले जातात. अनेकदा यात अर्धसत्य सांगितले जाते. यातून दिशाभूल होते. काहीजण सोज्वळ भाषेत मत मांडतात. वादंग नको ही त्यामागील भूमिका. निर्भीडपणा गुण यासाठीच आहे. कुठलाही भीडभाड न ठेवता स्पष्टपणे मत मांडणे. यातून समोरच्या व्यक्तीला थेट मत कळते. हे खरेपणाचे लक्षण आहे.

अनेकदा निर्भीड व्यक्तीला अपरिपक्व समजतात. परंतु, निर्भीड व्यक्तीच्या मतामुळे अनेकदा सत्य समोर येते. काहीजण गोड शब्दात सांगण्याचा प्रयत्न करतात. पण त्यातून समोरच्या व्यक्तीवर परिणाम होईलच असे नाही. त्यामुळे निर्भीडपणे अधिक योग्य ठरते. लोकमान्य टिळक हे एक निर्भीड व्यक्तिमत्व. जे आहे ते सरळ स्पष्ट शब्दात.

मध्यंतरी त्यांचावर एक चित्रपट येऊन गेला. त्यातील त्यांची अनेक बेधक भूमिका दर्शवणारी वाक्ये होती. दुर्दम्य इच्छाशक्ती काय असते हेही त्यांच्याकडून घेण्यासारखे आहे. ताजे उदाहरण द्यायचं झालं तर जर्मनीच्या ॲनालेना बेरबॉक. काल परवाच त्या एका मुलाखतीत निर्भीडपणे चीनच्या शी जिंग पिंगला हुकूमशहा म्हणाल्या. इतक्या मोठ्या पदावरील व्यक्ती इतकी स्पष्ट भूमिका क्वचितपणे घेतात.

आचार्य अत्रेसारखे पत्रकार न डगमगता सरकारच्या विरोधात अशी मते मांडत. अन त्यांची मते सत्ताधारी देखील तितक्याच गांभीर्याने आणि आदराने घेत असत. चुकीला चूक म्हणणे म्हणजे निर्भीडपणा. आजकाल असे पत्रकार मंडळी अगदी तुरळक झाली आहेत. अन सरकार देखील अशा पत्रकारांवर गुन्हे दाखल करून दडपशाही करते. यावर मी अनेक दाखले देऊ शकतो. पण त्यावर नंतर सविस्तर चर्चा करूया.

निर्भीड लोक असणे हे समाजास, देशास हितकारक असते. ते दीपस्तंभाप्रमाणे असतात. हा गुण मात्र विद्वान लोकांनाच शोभून दिसतो. नाहीतर निव्वळ हा अतिशहाणपणा ठरतो. राजकारणातील सध्याची मंडळी मूर्ख शब्दाच्याही पलीकडे गेली आहे. त्यामुळे अतिशहाणपणा तसा बरा म्हणावा. एकूणच हा गुण कसा अंगिकारावा यासाठी अशी साधी सोपी पद्धत नाही.

आपण इतरांना त्रास न देता आपले मत स्पष्टपणे मांडले तरी तो निर्भीडपणा ठरतो. बाकी आपल्याला काय वाटते हेही आपण नमूद करावे. तुर्तास इतकेच.