म्हणजे अगदी सुरवातीपासून, हे डोक्यात द्वंद्व चालू आहे. कधी वाटत ती माझी होईल. तिलाही मी आवडत असेल. पण नंतर तो शेपट्या किंवा तो शेंड्या तिच्यासोबत असला की, म्हणजे तेव्हाही काही नाही वाटत इतकं. पण ती हसून वगैरे बोलतांना पहिले तर. मग मात्र अस वाटायला लागते की, कधीच शक्य नाही. काल संध्याकाळी देखील असेच. मी जातांना ‘बाय’ करावं म्हटलं. आणि पीसी बंद करून निघणार तेवढ्यात ती समोर. तिचा चेहरा लाल झालेला. म्हणजे मी देखील खूप हसलो तर माझाही चेहरा असाच लाल होतो. ती हसत चाललेली. तिच्या डेस्ककडे पहिले ते ते दोन हिरो होतेच. शेंड्या आणि शेपट्या. मग मुडच गेला. ती मान खाली घालून माझ्या समोरून गेली. तरीही ‘बाय’ करायची इच्छा होती. पण नाही झाली हिम्मत.
असो, पण काल कंपनीतून निघाल्यावर खूप डोके दुखले. काहीच सुचत नव्हते. वाटत होते, तिला तिच्या योग्यतेचे शेपट्या आणि शेंड्या असल्यावर ती मला का निवडेल. आणि आजही सकाळी आलो त्यावेळी तो शेंड्या होताच तिच्या डेस्कवर. आणि आताही तोच तिच्याशी बोलतो आहे. सोडा, काल इतका हैराण झालो होतो ना! सगळंच संपल अस वाटत होते. आताही वाटते आहे. असे विचार कालपासून खूप येत आहेत. मला माहिती आहे की मला ती खूप खूप आवडते. तीची आणि माझी जुनी ओळख असल्याप्रमाणे वाटते. ती हसली की सगळ छान वाटते. सगळीकडे तीच दिसते. मला हे देखील मान्य आहे की तिला पहिल्यापासून माझ्यात खूप बदल घडले आहेत. म्हणजे विक्रमी बदल.
म्हणजे परवा ती माझ्याशी स्वतःहून बोलली देखील. आणि हे सगळ स्वप्नवतच वाटते आहे. इतकी छान मुलगी माझ्याशी स्वतःहून बोलली. यापेक्षा स्वर्ग अजून काय? ती माझी झाली तर.. मला अजून काय हवे? खरच मी खूप भाग्यवान असेल जर तिला देखील मी आवडलो. म्हणजे अगदी खर सांगतो, माझ्या स्वप्नातली सुंदरी बद्दल माझी मते हीच होती की, तिने मला पहिले तर ती माझ्या आणि मी तिच्या प्रेमात पडेल. आणि तिला पहिल्यापासून मला कोणताच विचार येणार नाही. आणि तिलाही माझाच विचार येईल. तीही तेवढीच माझ्या इतकीच माझ्यावर प्रेम करेल. पण गेल्या दोन दिवसाआधी पर्यंत अस वाटायचं हीच ती. म्हणजे अजूनही वाटत. उलट वाढले आहे. पण तीच्यासोबत शेंड्या, शेपट्या किंवा तो नारळ पहिला की, मला अनेक विचार येत आहे. अस वाटत आहे. ती जस्ट माझ्याशी बोलते. पण तिच्या मनात त्यापैकी कोणी आहे. आणि स्पष्टच सांगायचे झाले तर नारळ सोडला तर ते दोघे, म्हणजे शेपट्या आणि शेंड्या तिच्या योग्य आहे. म्हणजे त्या दोघातही तो शेपट्याच भारी आहे. म्हणजे ‘परफेक्ट’ वगैरे म्हणतात ते.
सोडा, पण तरीही माझ्या मनात तीच आहे. मला ती खरच हवी आहे. माझ्यात काय चांगल तर, मी कुठल्याही प्रश्नाचे काही का असेना सकारात्मक उत्तर देऊ शकतो. अरे हो, त्या काळाच्या प्रश्नाचे उत्तर सापडल्यात जमा आहे. एक कोड मिळाला आहे. तिला सकाळी ‘हाय’ करतांना सांगणार होतो. पण नेहमीप्रमाणे. सोडा, ते एक मायक्रोसॉफ्टचे सॉफ्टवेअर आहे. आणि सोबत एक कोड. आज घरी जावून चेक करील. जर जमल तर दाजींचा प्रश्न सुटला. अरे, विसरलोच! काल मित्राचे एक काम करून द्यायचे राहिले आहे. यार काल खूप रडू आले होते. तिची इतकी आठवण आणि त्यात हे ‘द्वंद्व’. मग गच्चीतून आमच्या गल्लीतील दहीहंडी पाहत बसलो. नंतर निगडीपर्यंत पवळे पुलापर्यंत फिरायला गेलो. खूप डोके आणि नाक जाम झाले होते. जिकडे तिकडे तीच वाटायची. तिला म्हणून टाकावं असा देखील विचार मनात आला होता. पण अजून ‘हाय’ च्या पुढे ढकलगाडी. कस म्हणणार आणि उगाचंच जरी हिम्मत केली. तर ती नाराज होईल.
असो, ती मला मिळणे न मिळणे माझे भाग्य. तिला मी नाराज नाही करणार. सोडा, एक महिना राहिला आहे बीसीए च्या परीक्षेला. अजून नवीन अभासाक्रमाची पुस्तकेच नाहीत माझ्याकडे. आणि माझे आयकार्ड देखील पावसामुळे खराब झालेले आहे. पण चिंता नसावी. तोही प्रश्न मिटेल. आजही तिच्या बोलायची खूप इच्छा आहे. आणि हो, आज तिचा आणि माझा ड्रेसचा रंग सारखा झाला आहे. पण या डोक्यातील द्वंद्वामुळे आज पुन्हा डोकेदुखी..
Leave a Reply