लोकशाहीला श्रद्धांजली

लोकशाहीला श्रद्धांजली द्यावी, अशी स्थिती निर्माण झाली आहे. जे जे राज्यघटना व तत्व म्हणून राजकारणात आहे. त्याच्या नेमकं उलट घडत आहे. एक देश म्हणून आपण दररोज अधोगती करीत आहोत. ज्याप्रमाणे पाकिस्तान, म्यानमार, इंडोनेशिया, बांग्लादेश धर्माधतेच्या चिखलात डुंबत आहे तिकडे आपली वेगाने वाटचाल होत आहे.

फक्त धर्मांधता नाही तर नीतिमत्तेचा देखील कोणताही विचार सत्तापिपासू सत्ताधारी करीत नाहीत. असंगाशी संग हाही तोकडा वाटावा अशी परिस्थिती आहे. बेबंदशाही सुरु झालेली आहे. चार चार पक्ष बदललेला राहुल नार्वेकर हा व्यक्ती हा पक्षांतर बंदीवर निर्णय देतो. यातून लोकशाहीची वाताहत स्पष्टपणे दिसते. सर्वोच्च न्यायालयाला ह्या नुरा कुस्तीत कसली मजा येते हेही अनाकलनीय आहे.

जे धादांत खोटं आहे त्यावर किती खल करावा? किती काळ वेळ दवडावा? चोराला चोर म्हणायला कसली राज्यघटना चघळायची? राज्यघटना तयार केल्यानंतर ते सांभाळणाऱ्यांवर लोकशाही अवलंबून आहे. अन ह्या लोकांना लोकशाही झेपणार नाही असे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर म्हणाले ते खरंच आहे. मोदींसारखा वेडा माणूस वाट्टेल ते चाळे करतो. अन त्यांची वेड्यांची सेना नाचू लागते. बरं न्यायव्यवस्था देखील नाराजीच्या पलीकडे उडी घेत नाही.

दहा वर्षातील सरकारचे काम काय तर एक पुतळा अन एक देऊळ (ते देऊळ देखील अर्धवट). सगळीकडे अर्धवट कामे. मग ते शहर असो की देशाची लोकसभेची इमारत. अर्धवट लोकांच्या हाती सत्ता दिल्यावर दुसरे ते काय होणार? बरं इतके मूर्ख लोक निवडून येतातच कसे? हेही न उलगडणारे कोडे आहे. मतदान यंत्राचा वापर कोणत्याही पुढारलेल्या देशात होत नाही. का होत नाही? का ते अडाणी अन आपण शहाणे? यावर एकही शासकीय यंत्रणा चर्चा करत नाही. निवडणूक महामंडळ सत्ताधाऱ्यांचे किती दास्यत्व स्वीकारले आहे हे नव्याने सांगायला नको. इंडीया सरकारचे नामकरण त्यांनी मोदी सरकार केलेले आहे.

कोणत्या आघाडीवर आपण कौतुक करावे अशी एक गोष्ट नाही. देश सोडून जाणाऱ्या लोकांची आकडेवारी काढली तर तीही धक्कादायक आहे. नागरिकत्वाचा त्याग करून दुसऱ्या देशाच्या नागरिकत्वाचा स्वीकार करणाऱ्यांमध्ये जगात आपण प्रथम क्रमांकावर आहोत. ६०० लोक दिवसाला देश सोडतात. ही किती मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे. युद्धात गांजलेले युक्रेन, रशिया, इस्राईल, सीरिया हेही आपल्या जवळ नाहीत.

एकूणच निराशेचे वातावरण आहे. जोवर हे सरकार सत्तेतून जात नाही तोवर देशाला भविष्य सोडा वर्तमान देखील नाही. नागरिकांनी प्रामाणिकपणे अंतर्मुख होऊन विचार करावा. नाहीतर लोकशाहीला श्रद्धांजली द्यावी लागेल.

Leave a Reply