नोंदी लिहिण्यासाठी सुचावं लागत. अन त्याहून मोठं त्यासाठी वेळ द्यावा लागतो. मध्यंतरीच्या बराच मोठा काळ दोन पैकी एक गोष्ट नसल्याने काहीही होत नव्हतं. अगदी ठरवून देखील. परंतु, गेल्या काही दिवसातील परिस्थिती पुन्हा लिहिण्यास उद्युक्त करीत आहे.
एक चीड, विचार मनात वादळ निर्माण करतो. अन नोंद तयार होते. प्रत्येकाला मन मोकळं करावस वाटत. मन मोकळं करण्यासाठी प्रत्येकाचे मार्गही वेगेवेगळे. मी नोंद खरडून सुखावतो. इथ जे स्वातंत्र्य आहे ते समाजमाध्यमांवर नाही. तिथं प्रत्येकाची तोंड वेगवेगळ्या दिशेला. अन राजकीय पक्षांच्या सुळसुळाट झाल्यापासून तिथं कुविचारांचं प्रदूषणच अधिक. त्यामुळे या न त्या कारणाने इकडे येणं होत!
हजारो विषय आहे. हजारो संकल्पना आहेत. अनेक विषयावर मत मांडायचं आहे. पण कुठून सुरवात करावी हेच कळेना. शेवटी आज तो दिवस उगवला. कोणतीही गोष्ट सातत्याने करण्याचा अयशस्वी प्रयत्न मी करीत असतो. चुकून एखाद्या विषयात यश येते. नोंदीत देखील यश येतेय का ते पाहूया.
आजूबाजूच्या घटना अगदी तापदायक आहेत. एकूणच परिस्थती अधिकच गंभीर होत आहे. व्यावसायिक पातळीवर आशेचा किरण दिसतोय. पण देशातील परिस्थितीमुळे मनःशांती नाही. प्रत्येकजण विचारांचा चष्मा घालून जग पाहतोय. मोकळ्या डोळ्याने जे दिसत तेच त्यांना त्यामुळे दिसेनासे झाले आहे. तीच खदखद ह्या नोंदी खरडण्यास प्रवृत्त करते. परिस्थतीत सुधारणा होईना. अन लोकांना सुधारणा व्हाव्या असेही वाटेना. सगळेच चिखलात यथेच्छ डुंबत आहेत. कुणास सांगावे तर तोही चिखलात ये म्हणतो!
सकारात्मक विचार करायचा असं मी रोज ठरवतो. पण रस्त्यांवरील खड्डे दादा चिडवतात. रस्त्यांच्या कडेला असलेले अनधिकृत आडवे तिडवे फलक अन त्यातून डोकावून हसणारे दादा, मामा, नाना, कार्यसम्राट खिजवतात असाच भास होतो.
अनधिकृत टपऱ्या, हातगाड्या आणि नियमबाह्य शासकीय कारभार एकेदिवशी माझाही माधव आपटे करणार हे नक्की. तक्रारींना शासन जुमानेना. आजूबाजूची परिस्थिती अन त्यात महागाईने आर्थिक यश देखील गोड लागेना. इतर देशांमध्ये जसा महागाई आणि सार्वजनिक प्रश्नांनी उद्रेक होतो तसा आपल्याकडे होईल का? बर वर्तमानाचं नसेल तर भविष्यासाठी कुठवर आशावादी राहायचं?
मग पुन्हा विचार येतो महाराजांचा. सहा शाह्या असतांना त्यांना भेदून स्वराज्य उभं राहील! एक न अनेक संकटे आली! अन मराठी वाघांनी ती पेलली! अन आताच्या तीन देशांवर स्वराज्य उभं केलं. अन पुन्हा आशेचा किरण दिसतो. लढण्याची उमेद जागी होते. हीच उर्मी आर्थिक आणि सामाजिक स्वराज्य, स्वातंत्र्याची पहाट आणेल! असो, अजूनही शब्दांच्या माळा मनातून ह्या नोंदीत उतरत आहेत! पण अतिरेकही वाईट! वाचकाला छळून कसे चालेल? तूर्तास इथं थांबतो! बाकी बोलूच!!
Leave a Reply