बाप्पा म्हणजे गणपती बाप्पा. कधीकधी आपल्या संस्कृतीची गंमत वाटते. कसाकाय गणेशोत्सव सुरु झाला? पण त्याने घरोघरी वातावरण आनंदून जात हे मात्र नक्की. सार्वजनिक गणेशोत्सवांवर खूप बोलून झालाय. त्यावर नव्याने बोलायची गरज नाही.
माझ्या जन्मगावी गल्लीत गणपतीच देऊळ. माझ्या आजोळ म्हणजे चिंचवडगाव. म्हणजे मोरया गोसावींचे गाव. त्यामुळे लहानपणापासून बाप्पाच्या सानिध्यात लहानपण गेलं. आई वडील दोन्हीही आस्तिक. मी न धड आस्तिक न नास्तिक. जे पटते ते पाळतो. गल्लीतील देऊळ म्हणजे आम्हा मुलांसाठी केंद्रच होत. तिथं तासनतास बसून गप्पा चालायच्या. त्यामुळे एक नातं निर्माण झालं. देऊळ झाडून काढण्यात आनंद यायचा. आताही येतो. एक समाधान मिळते.
वडिलांच्या बोलण्यातून देवळातील गणपतीची रोज पूजा व्हायला हवी असं आलं. अन का कुणास ठाऊक देवाची अंघोळ घालण्याची इच्छा झाली. अन मग रोज सकाळी अंघोळ झाल्यावर कळशीभर पाणी घेऊन मी देवळात जायचो. वडिलांमुळे पाढे, रामरक्षा, मारुती स्तोत्र म्हणायची सवय लागलेली. त्यामुळे देवळातील अथर्वशीर्षचा म्हणतांना अडचण आली नाही. अन तिथून अथर्वशीर्ष पठाणाची सुरवात झाली.
खरं तर हे धार्मिक वाटेल. परंतु, बाप्पाच्या सहा फुटी मूर्तीला रोज अंघोळ घालून गंध लावणे. आरती फारच आत्मिक समाधान आजही देते. गणेशोत्सव तर त्याकाळी दिवाळीपेक्षा मोठा सण असे. आम्ही लहान पडायचो. त्यामुळे वडील मंडळींची कामे ऐकावी लागायची. अन आरतीच्या वेळी घंटा वाजवण्याची संधी प्रत्येकाला हवीहवीशी वाटायची. पण लहान असल्याने एकतर उंची पुरत नसे. अन वाजवण्यासाठी पुढे गेले की कोणीतरी मोठं माणूस ओरडे.

गल्लीतील बाप्पा. पूर्वी हा खूपच सुंदर दिसायचा. एखाद्या गुटगुटीत बाळाप्रमाणे. पण नंतर कुणाच्या मनात खूळ आलं. अन त्यांनी ह्याचा शेंदूर काढला. अन हा म्हातारा दिसू लागला.
माझ्या मित्रांच्या आग्रहामुळे गल्लीतील मुलांचा गणेशोत्सव सुरु झाला. पुढे त्याचे स्वरूप इतके वाढले की, लोक स्वतःहून देणगी द्यायचे. आम्ही सर्वजण अथर्वशीर्षाचे सहस्त्रावर्तन करू लागतो. पुढे माझे वडील आणि त्यांचे काही सहकाऱ्यांनी भंडाऱ्यांची सुरवात झाली. आताही तो भंडारा नेहमी होतो. अगदी कुणी नसेल तर माझे वडील पुढाकार घेऊन तो घडवून आणतात. एकूणच खूपच आनंदाचे वातावरण असते.
मुळात बाप्पाची मूर्ती भुरळ पाडते. मलाच काय माझ्या दोन्ही चिमुकल्यांना देखील बाप्पा खूप आवडतो. कामानिमित्त पिंपरी चिंचवडमध्ये स्थायिक झाल्यावर माझ्या सदनिकेत दरवर्षी बाप्पा येतो. आमची इमारतीतील गणेशोत्सवाची सुरवात देखील मी केलेली. घरच्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठा माझ्या दोन्ही चिमुकल्यांच्या हस्ते होते. एकूणच हे दिवस आनंदाचे असतात. आता काही सार्वजनिक मंडळे गणेशोत्सवाच्या, वर्गणीच्या नावाखाली स्वतःची हौस भागवतात. चौक अडवतात. ध्वनिप्रदूषण करतात. ते कुणालाच पटणार नाही. परंतु, माझ्यापुरते बोलायचं झालं तर बाप्पा येणार हा आभास देखील सुखावून जातो. तूर्तास इतकेच.

Leave a Reply