बेरोजगारी हा सध्याच्या एक प्रमुख विषय. शिक्षण झाल्यावर नोकऱ्या नाहीत. व्यवसायाच्या संधी कुठे आहेत. अशा अनेक गोष्टी ऐकायला मिळतात. साधारण एक तपापूर्वीची गोष्ट. एक छोटासा कोर्स करून मी नोकरीच्या शोधात पुण्यात आलो. त्याही वेळी आता सरकारी नोकऱ्या कुठे आहेत. वगैरे गप्पा चालायच्या.
एकट्या महाराष्ट्रात दिवसाला ऑनलाईन हजार संधी उपलब्ध होतात. ऑफलाईनचा विचार केला तर दोन हजारांचा आकडा होईल. सरकारी आकडा धरला तर हा आकडा अजून पुढे जाईल. पण आम्हाला नोकऱ्या कुठे आहेत हेच माहित नाही.
माहिती मिळाली तर योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे मुलाखत सुमार होते. ह्याचे मला स्वतःला देखील अनुभव आहे. प्रत्येकात एक कला असते. तिचा विकास केला तर तो व्यक्ती त्या क्षेत्रातील सर्वोच्च स्थान मिळवू शकतो. मग आता मला सांगा बेरोजगारी का वाढते आहे?
सगळ्यात पहिल्यांदा शिक्षण नोकरीसाठी असते हे काढून टाका. आपण जे शिकतो यातून केवळ इस्त्रीचे कपडे अन केसाचा भांग कसा पाडायचा इतकेच समजू शकते. व्यावसायिक शिक्षण आवश्यक आहे. विज्ञान पुढे जात आहे. आपण त्याची कास धरायला हवी.
सरकारचे काम उद्योग धंद्यांना प्रोत्साहन देणे. नोकऱ्या निर्माण करणे सरकारचे काम नाही. नोकऱ्या कुठे याची माहिती दिली तरी अनेकांचे आयुष्य बदलतील. आधी डोक्यातील जळमटे काढा. अनेक क्षेत्र आहेत. माहिती हे शस्त्र आहे. अनेक अकल्पित मार्ग सापडतील. वेब डिझायनिंग अजूनही माझ्या गावातील लोकांसाठी अज्ञात क्षेत्र आहे.
काही क्षेत्रातील नोकऱ्या ऑनलाईन उपलब्ध होतात. तर काही वर्तमान पत्रात छापून येतात. असे अनेक क्षेत्र आहे जिथल्या संधी ओळखीतून भरल्या जातात. रोज इतक्या इमारती उभ्या राहतात. तिथले रोजगार कुठे छापून येतात का? त्यामुळे नोकऱ्या नाहीत हे अज्ञानाचे लक्षण आहे.
यासाठी एकत्र व्हायला हवे. आपल्या लोकांना नवीन क्षेत्राचे मार्गदर्शन द्यायला हवे. माझ्या अनुभवावरून मराठी लोक हुशार असतात. कामसू असतात. योग्य मार्गदर्शन केल्यास नक्कीच एक वेगळा महाराष्ट्र निर्माण होईल. अकारण होणारा तणाव निवळेल.
सुरवात आजूबाजूला उघड्या डोळ्यांनी पाहण्याने करा. अनेक संधी तुम्हाला सहज सापडतील. अनेकजण हरहुन्नरी आहेत. बऱ्याच गोष्टी शिकायला देखील मिळतील. बेरोजगारी व त्याने निर्माण होणाऱ्या तणावाला आपण संपवूयात. मी त्याच एका योजनेवर काम करतो आहे. लवकरच आपल्या समोर सादर करेन!
प्रतिक्रिया
अगदी योग्य दृष्टिकोन मांडलास हेमंत! तुला खूप साऱ्या शुभेच्छा!
धन्यवाद रोहन! 🙂