आपण प्रत्येकजण राज्यघटना मानतो. घटनेतील तत्वांचा आदर करतो. परंतु राज्यघटना आपल्याला माहिती आहे?. कधी वाचली आहे?. याचे असंख्य ‘नाही’ उत्तरतील. मग ती का वाचत नाही? उत्तर सोपं आहे. कारण ती वाचविशी वाटलीच नाही.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर महानच. का हेही कळेल. अनेक प्रश्नाचे सार दिसेल. राज्यघटना हा लोकशाहीचा धर्मग्रंथ. अनेक बाबी विचारपूर्वक नमूद केल्या. शब्द अगदी पारखून टाकले आहेत. घटनेत बदल केला जाऊ शकतो. याचाही विचार केला.
मी कलमांवर काहीच बोलणार नाही. एक गोष्ट नक्की, आपण ती वाचायला हवी. कायदे त्याआधारे बनवले. कायद्यांत बदल देखील. आपल्या न्यायव्यवस्थेचा पायाच आहे. इतकं सगळं आहे. ती न वाचण्याचे तोटे अधिक आहे. ज्ञान वाढावा. प्रश्न सोडावा. वाद टाळा.
अर्धवट लोकशाही आपण राबवतो. स्पष्ट करून सांगतो. माझ्या सौ.ची पर्स हरवलेली. त्यात मतदान ओळखपत्र, कार्ड व पैसे होते. मग पुन्हा मिळवण्यासाठी निवडणूक विभागाकडे अर्ज केला. ओळखपत्र, पोलिस तक्रारीची नक्कल जोडली. घराच्या कागदपत्रांची नक्कल जोडली. परंतु, अर्ज स्वीकारतांना अधिकारी आधारकार्ड जोडा म्हणाले. तसा कोणताच नियम नाही. मी संपर्क केंद्रातुन माहिती घेतली. त्यावेळी घराच्या कागदपत्रांची, पोलिस तक्रारीची नक्कल या दोनच गोष्टी सांगितलेल्या.
अधिकाऱ्यांना नियम दाखवा म्हणालो. तेंव्हा त्यांनी तो अर्ज स्वीकारला. हे घडू शकलं कारण ओळखपत्राची प्रत मिळवण्यासाठी आधारची आवश्यकता नव्हती. पन्नास टक्के त्रास हा नियम माहिती नसल्यामुळे होतो. आपल्याला कायद्याचे ज्ञान मिळावयास हवे. शालेय जीवनात होईल तेंव्हा होईल. परंतु आपण आपल्या सोयीसाठी शिकू शकतो.
सरकार सुद्धा घटनाबाह्य कामे करते. कधी स्वतःच्या तर कधी आर्थिक लाभासाठी. ह्यासाठी घटना वाचा. पोथ्या पुराणांपेक्षा राज्यघटना अधिक महत्वाची आहे. लबाड राजकारण्यांचे उद्योग देखील त्याने उघडे पडतील. सर्वात महत्वाचे आपण डोळस होऊ. लोकांसाठीच खरा अर्थ त्यातच आहे. अनेक अडचणींचे उपाय आपल्या जवळ आहेत. फक्त आपण ओळखू शकलेलो नाही.
हे आपले कर्तव्यच आहे. अनेक बाबी उलगडतील. नवा दृष्टिकोन मिळेल. कदाचीत जीवनाला नवा अर्थ मिळेल. आपण डोळस बनुयात. आपल्या अडचणी स्वतः सोडवूयात. लोकशाहीचा खरा अर्थ समजून घेऊयात. देश लोकांमुळेच बनतो. लोक सज्ञान तर देश सज्ञान. सध्याच्या द्वेषाच्या राजकारण सुरु आहे. ते संपवूया. तर मग करताय ना सुरवात!
Leave a Reply