काळा पैसा संपवण्याच्या दृष्टीने आपल्या पंतप्रधान मोदीनीं पाचशे व हजाराच्या नोटा रद्द करण्याची एका रात्री घोषणा केली. मग काय देशभर आर्थिक हिशोब गडबडले. कुणाला पटले तर कुणी त्याचा विरोध केला. तसा मुद्दा व निर्णय पटण्याजोगे आहे. पण त्याचा परिणाम माझ्यासारख्या सामान्य माणसावर फारच मोठा झालाय. कृपया हा विषय देशभक्तीशी जोडू नका ही विनंती.
काही बोलण्याआधी आपल्याला एक महत्वाची परंतु खासगी गोष्ट सांगू इच्छितो. काही महिन्यांपूर्वी एका कामासाठी मला एक संयुक्त अरब अमिराती (युएइ) देशातील एका नामांकित कंपनीचे एक काम मिळालेलं. दिवसाला ऐंशी डॉलर असा त्या कामाचे स्वरूप होते. साधारण सात दिवसांचे ते काम. त्यांचे काम सांभाळणारे ऑफिस पाकिस्तानात होते. उरी हल्ल्यानंतर मी ते काम पुन्हा घेणे थांबवले. कारण एकच हल्ल्याचा निषेध!
आता मूळ विषयाकडे येऊ. माझा व्यवसाय सुरु करून फार काळ लोटलेला नाही. त्यामुळे माझी आर्थिक परिस्थिती बेताची आहे. जी काही थोडीफार रक्कम असते ती जपून वापरण्याकडे माझा कल असतो. त्यामुळे पाकिटात फार फार तर दोन तीनशेच असतात. बाकीचे बँकेत. जेव्हा मोदींनी नोटा रद्द करण्याची घोषणा केली. तेव्हाही खिशात तेवढेच होते. दुसऱ्या दिवसापासून बँका/एटीएम सगळेच बंद. पहिले दोन तीन दिवस आते त्या पैशात भागवले. नंतर काय, जिकडे पहाल तिकडे बँक/एटीएम सगळीकडे रांगच रांग. जिथे शक्य होईल तिथे डेबिट कार्ड वापरून दिवस काढले. पण घरी धुणीभांडी, दुधवाल्यांचा पगार कुठून देणार. शेवटी रांगेत उभे राहीलो. बँक कर्मचारी/लोक सगळेच त्रस्त!
रांगेत एक भाजीवाले काका सांगत होते. खिशात पन्नास हजार आहेत. पण चहाही प्यायला ते पैसे वापरू शकत नाही. माझ्या सोसायटीतील एक रिटायर्ड पोलीस अधिकारी सांगत होते. लग्न जवळ आले म्हणून दीड एक लाखाची रक्कम बँकेतून काढलेली. आता या घोषणेने सगळे पैसे बदलून घेताना फारच अडचणी येत आहेतच. असे अनेक अनुभव आहेत, मला तर दुष्काळात तेरावा महिना चालू आहे. थोड्याफार प्रमाणात सगळेच असेच त्रस्त झालेले आहेत.
मी मोदींचा विरोधक नाही. पण त्यांच्या निर्णयाने जेवढे देशाचे भले झाले त्यापेक्षा अधिक लोकांचे हाल झाले. त्यात काहींचे बळी देखील गेले. मला फक्त इतकेच सांगायचे आहे की निर्णयाला विरोध का होतो आहे याचा शांत डोक्याने विचार करा.
Leave a Reply