शांतता

शांतता

शांतता ही महत्वाची गोष्ट आहे. जिथे शांतता नांदते, तिथे प्रगती निश्चित होते. गोंगाट लक्ष विचलित करतो. गोंधळ, गोंगाट जिथे वाढतात तिथे अशांतता वाढते. अन प्रगतीचा वेग मंदावतो. त्यामुळे शांतता महत्वाची.

शांतता आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी महत्वाची आहे. शांततेमुळे आपल्या कामात लक्ष लागते. अन काम नीट होते. जितके एकाग्रतेने काम होते. तितका त्या कामाचा दर्जा सुधारतो. अशांततेमुळे शाररिक आणि मानसिक त्रास वाढतो. हृदयाचे स्पंदने वाढतात. त्यामुळे शारीरिक समतोल बिघडतो. आणि त्याचा परिणाम शरीराबरोबर कामावर देखील होतो.

सुख आणि समाधान ह्या गोष्टी शांततेमुळे सहजप्राप्त होतात. देवळात गेल्यावर आपल्याला समाधान का मिळते? कारण तिथं शांतता असते. आता तुम्ही या उदाहरणाची तुलना पुण्यातील दगडूशेठ वा मुंबईचा सिद्धिविनायक वा पंढरपूरचा विठ्ठल रुक्मिणीच्या देवळासोबत करू नका. ती प्रसिद्धी पावलेली अन सदा गजबजलेली ठिकाणे आहे. तिथे देवाचं दर्शनऐवजी धक्काबुक्की होईल.

धार्मिक ग्रंथ देखील हीच शिकवण देतात. तेही याचमुळे. माणसेच काय देश देखील अशांत झाले की संहारक होतात. वनातील  श्वापदांप्रमाणे जीवावर उठतात. युद्ध, प्रदूषण वाढवून निसर्गाची व स्वतःची हानी करतात. स्वतःच्या इंद्रियांवर नियंत्रण असावे. त्याखेरीज आपण सुसंवाद साधू शकत नाही. शांतता सुसंवादामुळे टिकतो. अडचणी कमी करतो.

व्यक्तीने समाज आणि समाजाने राष्ट्र घडते. व्यक्ती सर्व गोष्टींचा गाभा आहे. जेवढी आसक्ती कमी तेवढ्या गोष्टी सहजसाध्य होतात. प्रादेशिक असमतोल वाढण्याचे मूळ कारण हेच. असमतोलच जर दूर केला तर वाद येणार कुठून? वाद नसेल तर शांतता टिकवणे शक्य आहे. ऐतिहासिक काळ चाळला तर शूरवीरांच्या भूमीत प्रगती अन शांतता नांदलेली दिसेल. शौर्याच्या बळावर त्यांनी स्वतःची प्रगती केली.

देश, समाज ह्या मोठ्या गोष्टी आहेत. आपण स्वतःला जरी शांत ठेवलं. आपला आजूबाजूचा, घराचा परिसर देखील शांत ठेवला तरी ह्यात आपलेच हित आहे. अकारण चीडचीड. निष्कारण वाद हे हितवाह नसतात. त्यातून शांतता बिघडते. अन प्रगतीला अडसर निर्माण होतो. ह्याचा अर्थ सहन करा असा मुळीच नाही. पण सुसंवादाची कला अवगत केली तर बदल शक्य आहेत. खरतर ह्या गोष्टी वयाच्या एका टप्प्यानंतर आपोआप उमजतात. त्यामुळे फारशी चिंता नसावी. शांततेचे महत्व जरी जाणले तरी अनेक बदल सहजसाध्य आहेत.

Leave a Reply