कॅटेगरी: नोंद

संस्कृती

संस्कृती

संस्कृती हा मानवी जीवनातील अविभाज्य घटक. संस्कृती भूगोलाला पूरक असते. खरतर भूगोलामुळेच संस्कृतीचा उगम होतो. भूगोलात बदल झाला तर संस्कृतीत बदल होतो. अन संस्कृती बदलली की भूगोल देखील बदलतो.

जिथं थंड वातावरण असते, तिथं लोक जाड आणि काळे कपडे घालतात. शरीराची उष्णता वाढवण्यासाठी उष्णतावर्धक पेय घेतात. जिथं खूप पाऊस पडतो. तिथं छत्री व कमी ओले होणारे कपडे वापरतात. अशाच एकानेक गोष्टीने संस्कृती जन्मते. खानपान देखील तसेच जिथं खूप उष्ण वातावरण असते तिथं खाण्यात गोडाचे प्रमाण अधिक असते.

आपल्या देशात इतकी विविधता का याचाही कारण तेच. कारण कुठं खूप पाऊस तर कुठे वाळवंट. कुठे खूप उष्णता तर कुठे भरपूर पाऊस. त्यामुळे संस्कृतीत वैविध्य निर्माण झाले. अन ते राहणार. त्यामुळेच लोकांच्या आचार, विचारात व भाषेत फरक राहणार. संस्कृती ही निसर्गपूरक असते. त्यामुळे जोवर संस्कृती आहे तोवर निसर्ग आहे. विकासाच्या नावाखाली आपण संस्कृतीत बदल केला आणि निसर्गाची हत्या घडू लागली. आज आपण पृथ्वीवरील जीवसृष्टी धोक्यात आणली आहे.

दगडात अन झाडात कुठं देव असतो. असे म्हणून संस्कृतीची थट्टा केली. आपण अफाट वृक्षतोड केली. विकासाच्या नावाखाली पर्यावरणात देखील आपण बदल केले. अन आता सर्व भूभाग प्रदूषणाच्या विळख्यात सापडला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि युरोपीय देशात वनांना आगी लागत आहेत. आणि जपानमध्ये भयंकर वादळे तडाखा देत आहेत. आपल्याकडे दुष्काळ आणि तापमान ५० अंश गाठत आहे. आणि उत्तर भारतात पूर गावे वाहून नेत आहे.

तरीही आपण त्याच्या मुळाकडे साफ दुर्लक्ष करतो. सरकार नावाचा लाकूडतोड्या देशभर उन्माद करीत आहे. आपल्या अधिकाराचा गैरवापर करून निसर्गाशी वैर ओढत आहे. भाषा हे संस्कृतीचे बाह्यरूप. भाषेतून आपण संस्कृतीची ओळख करू शकतो. इंग्रजी भाषेत ‘रेन रेन गो अवे’ म्हणजेच पावसाला जा म्हणणारी कविता आहे. तर मराठीत ‘येरे येरे पावसा’ ही कविता आहे. ह्यातून आपण दोन संस्कृतीतील फरक पाहू शकतो.

मराठी संस्कृती महाराष्ट्रातून जसजशी कमी होते. तसतसे दुष्काळ वाढत आहे. दुष्काळ पाणीप्रश्न निर्माण करतो. असे का? कारण आपण निसर्गपूजक आहोत. शिवरायांनी अगदी नौकाबांधणीसाठी इतर राज्यातून लाकूड मागवले. पण महाराष्ट्रातील वृक्षांना हात लावला नाही. वृक्षतोड करण्यासाठी ‘एकास पाच’ असा नियम केलेला. म्हणजे एक झाड तोडण्याआधी पाच झाडांचे संगोपन करायचे मग एक झाड तोडण्यास परवानगी. आताचे सरकार एका रात्रीत लाखो झाडांची यथेच्छ कत्तल करते. अन दुष्काळाला आपण निसर्गाला दोष देतो! गंमत आहे नई?

मुद्दा इतकाच की, संस्कृतीचे महत्व आपण मनापासून स्वीकारायला हवे. चालीरीती का कशासाठी ह्याचे पैलू आपण उलगडून पाहायला हवे! नाहीतर विनाश असाही डोळ्यासमोर होत आहेच!!

बाप्पा

बाप्पा

बाप्पा म्हणजे गणपती बाप्पा. कधीकधी आपल्या संस्कृतीची गंमत वाटते. कसाकाय गणेशोत्सव सुरु झाला? पण त्याने घरोघरी वातावरण आनंदून जात हे मात्र नक्की. सार्वजनिक गणेशोत्सवांवर खूप बोलून झालाय. त्यावर नव्याने बोलायची गरज नाही.

माझ्या जन्मगावी गल्लीत गणपतीच देऊळ. माझ्या आजोळ म्हणजे चिंचवडगाव. म्हणजे मोरया गोसावींचे गाव. त्यामुळे लहानपणापासून बाप्पाच्या सानिध्यात लहानपण गेलं. आई वडील दोन्हीही आस्तिक. मी न धड आस्तिक न नास्तिक. जे पटते ते पाळतो. गल्लीतील देऊळ म्हणजे आम्हा मुलांसाठी केंद्रच होत. तिथं तासनतास बसून गप्पा चालायच्या. त्यामुळे एक नातं निर्माण झालं. देऊळ झाडून काढण्यात आनंद यायचा. आताही येतो. एक समाधान मिळते.

वडिलांच्या बोलण्यातून देवळातील गणपतीची रोज पूजा व्हायला हवी असं आलं. अन का कुणास ठाऊक देवाची अंघोळ घालण्याची इच्छा झाली. अन मग रोज सकाळी अंघोळ झाल्यावर कळशीभर पाणी घेऊन मी देवळात जायचो. वडिलांमुळे पाढे, रामरक्षा, मारुती स्तोत्र म्हणायची सवय लागलेली. त्यामुळे देवळातील अथर्वशीर्षचा म्हणतांना अडचण आली नाही. अन तिथून अथर्वशीर्ष पठाणाची सुरवात झाली.

खरं तर हे धार्मिक वाटेल. परंतु, बाप्पाच्या सहा फुटी मूर्तीला रोज अंघोळ घालून गंध लावणे. आरती फारच आत्मिक समाधान आजही देते. गणेशोत्सव तर त्याकाळी दिवाळीपेक्षा मोठा सण असे. आम्ही लहान पडायचो. त्यामुळे वडील मंडळींची कामे ऐकावी लागायची. अन आरतीच्या वेळी घंटा वाजवण्याची संधी प्रत्येकाला हवीहवीशी वाटायची. पण लहान असल्याने एकतर उंची पुरत नसे. अन वाजवण्यासाठी पुढे गेले की कोणीतरी मोठं माणूस ओरडे.

गल्लीतील बाप्पा. पूर्वी हा खूपच सुंदर दिसायचा. एखाद्या गुटगुटीत बाळाप्रमाणे. पण नंतर कुणाच्या मनात खूळ आलं. अन त्यांनी ह्याचा शेंदूर काढला. अन हा म्हातारा दिसू लागला.

माझ्या मित्रांच्या आग्रहामुळे गल्लीतील मुलांचा गणेशोत्सव सुरु झाला. पुढे त्याचे स्वरूप इतके वाढले की, लोक स्वतःहून देणगी द्यायचे. आम्ही सर्वजण अथर्वशीर्षाचे सहस्त्रावर्तन करू लागतो. पुढे माझे वडील आणि त्यांचे काही सहकाऱ्यांनी भंडाऱ्यांची सुरवात झाली. आताही तो भंडारा नेहमी होतो. अगदी कुणी नसेल तर माझे वडील पुढाकार घेऊन तो घडवून आणतात. एकूणच खूपच आनंदाचे वातावरण असते.

बाप्पा

हा गेल्यावर्षीचा गणपती बाप्पा. हा आला की, घर भरल्याप्रमाणे वाटते.

मुळात बाप्पाची मूर्ती भुरळ पाडते. मलाच काय माझ्या दोन्ही चिमुकल्यांना देखील बाप्पा खूप आवडतो. कामानिमित्त पिंपरी चिंचवडमध्ये स्थायिक झाल्यावर माझ्या सदनिकेत दरवर्षी बाप्पा येतो. आमची इमारतीतील गणेशोत्सवाची सुरवात देखील मी केलेली. घरच्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठा माझ्या दोन्ही चिमुकल्यांच्या हस्ते होते. एकूणच हे दिवस आनंदाचे असतात. आता काही सार्वजनिक मंडळे गणेशोत्सवाच्या, वर्गणीच्या नावाखाली स्वतःची हौस भागवतात. चौक अडवतात. ध्वनिप्रदूषण करतात. ते कुणालाच पटणार नाही. परंतु, माझ्यापुरते बोलायचं झालं तर बाप्पा येणार हा आभास देखील सुखावून जातो. तूर्तास इतकेच.

मराठी शाळा

मराठी शाळा

मराठी शाळा मराठी भाषेचे मूळ आहे. तेच छाटणे सुरु आहे. भाषा केवळ संवादाचे साधन नाही. संवादासह अर्थव्यवस्था आहे. संस्कृतीचे बाह्यरूप आहे. उदाहरण म्हणून सांगतो. अमेरिकादी देशात नोकरी, राहण्यासाठी भाषेची चाचणी परीक्षा द्यावी लागते. पुढारलेले असूनही ते असे का करीत असावे?

याचे कारण त्यांना त्यांची संस्कृती जपायची आहे. संस्कृतीचे बाह्यरूप म्हणजे भाषा. भाषेतून समाजाचे प्रतिबिंब दिसते. युरोपीय देशांनी भाषेवर देश निर्माण केले. आता तो भारतीय दृष्टिकोनातून मूर्खपणा आहे. युरोपीय राष्ट्रवाद एक भाषा / संस्कृती / खानपान म्हणजे एक समाज वा राष्ट्र म्हणते. अगदी एक झेंडा. एक गीत वगैरे. आपल्याकडे बहुविध संस्कृती आहे. अफाट विविधता आहे. तरीही आपण एक समाज आहोत. कारण यात आपल्याला गैर वाटत नाही.

देवांचे उदाहरण घेऊया. आपल्या घरात, इमारतीत, चौकात वेगवेगळे देव असतात. अगदी ग्रामदैवत, तालुक्याचे, जिल्ह्याचे, राज्यांचे अन देशाचे सुद्धा देव आहेत. पण त्यात आपल्याला काहीच गैर वाटत नाही. किंवा माझ्या घरातलाच देव खरा. इतरांचे खोटे देव. अस कोणी म्हणत नाही. कारण सर्व मार्ग देवापर्यंत जातात. इतकंच काय प्रत्येकाच्या सत्याला आपण सत्य म्हणतो. याउलट चूक की बरोबरमध्ये पाश्चिमात्य देश अडकलेले आहेत.

आमचाच धर्म खरा. आम्हीच देवाकडे घेऊन जाऊ शकतो. ही पाश्चिमात्यांची भूमिका. आपल्यात अन त्यांच्या संस्कृतीत हा फरक आहे. त्यामुळेच जगातील सर्वाधिक भाषा इथं जन्मल्या अन वाढल्या. आजही जगात सर्वाधिक भाषा बोलणारे आपण आहोत. पण दुर्दैवाने युरोपीय राष्ट्रवादाच्या संकल्पनेने आपल्या येथील राष्ट्रवादी मंडळींना वेडे केलेले आहे. वेडेपणा इथवर गेलाय की, फ्रान्स, रशिया, चीन प्रमाणे सक्तीने एक भाषा म्हणजे एक राष्ट्र असा समज करून घेतला आहे.

सर्वांनी एकच भाषा बोलायला हवी. ह्या एका वेडेपणामुळे कधीकाळी हजारो भाषा बोलणारे आपण आता ७८० वर आलो आहोत. अन आहे त्यातील पुढील पन्नास वर्षात २५० भाषा मारून टाकू अशी परिस्थिती आहे. जगभर हा वेडेपणा सुरु आहे. २०५० सालापर्यंत जगातील ७००० भाषांपैकी ९०% भाषा मारल्या जातील असा अंदाज भाषा संशोधकांचा आहे. आपण स्वतःला लोकशाही म्हणवतो. लोकशाही म्हणजे लोकांचे राज्य. लोक जर राजे असतील तर त्यांच्या भाषांना शासनलेखी महत्व का नाही? महत्व सोडा सरकार गेल्या ७५ वर्षांपासून एकाच भाषेवर अफाट खर्च करीत आहे. अन इतर भाषांना संपवण्याचा विडाच उचलला आहे.

एकट्या मराठी बाबतीत बोलायचं झालं तर एका दिवसात १५ हजार शाळा बंद केल्या. असं जगात अन्यत्र कुठेही घडलेलं नाही. त्याचा परिणाम असा झाला की एका दिवसात दीड लक्ष विद्यार्थी आणि किमान १५ हजार शिक्षक शिक्षणबाह्य झाले. तिकडे जपानमध्ये एका शालेय शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी जपान सरकार अतिद्रुतगती लोहगाडी (बुलेट ट्रेन) पळवते. अन आपण दुर्गम भागातल्यांना वाऱ्यावर सोडतो.

इमारतींची डागडुजी, शिक्षक भरती, स्वच्छतागृह, वीज यांची वानवा आहे. शाळेला शिक्षक हवे म्हणून मागणी केली म्हणून पालकांवर गुन्हे दाखल करण्याचे प्रकारही घडलेले आहेत. सोप्या शब्दात मराठी शाळा बंद केल्या की अपरिहार्यपणे हिंग्रजी शाळांचा व्यवसाय वाढेल.

एक जातो तर दुसरा येतो. अशी अवस्था आहे. मराठी शाळा इंग्रजीत माध्यमाच्या करण्याच्या तसेच ‘दत्तक’ शब्दाच्या नावे ६२ हजार शाळा खासगी धनाढ्यांना देण्याचा देखील उद्योग राज्य सरकारने आरंभलेला आहे. आधी मराठी भाषिकांना शिक्षणाच्या माध्यमातून बहुभाषिक केलं. आता शिक्षणातून मराठी माध्यम काढून सरकार मराठी भाषेचा वांशिक उच्छेद करीत आहे. काही शाळा तर झोपड्यात चालवल्या जातात. 

शासन आधीही आणि आताही मराठीचा द्वेष करते हे ह्या सर्व प्रकारातून स्पष्ट होते. मराठी भाषिकांनी याचा गंभीरपणे विचार करावा. अन शक्य असल्यास स्वतःच्या मराठी शिक्षण संस्था उभ्या कराव्यात.

शासन आपल्या दारी

शासन आपल्या दारी

शासन आपल्या दारी,
पन्नास खोके लई भारी ॥ध्रु॥

मराठी शाळा मारी,
सार्वजनिक आरोग्य सेवेची दुर्दशाच सारी,
खोट्या जाहिरातींचा भडीमार करी,
पन्नास खोके लई भारी ॥ध्रु॥

अदानी, रामदेवचा करमाफ करी,
सत्तापिपासू राजकारण विखारी,
घोटाळेबाजांच्या हाती सत्तेची चावी,
पन्नास खोके लई भारी ॥ध्रु॥

परप्रांतियांना कंत्राटांची खारी,
पुणे मेट्रोत बिहारींची भरती सारी,
मोठे प्रकल्प गुजरातच्या दारी!
पन्नास खोके लई भारी ॥ध्रु॥

बस गाड्यांची वाताहत सारी,
खड्ड्यांची मुंबई गोवा महामार्ग साक्ष देई,
सर्वच शहरात वाहतूककोंडी भारी!
समृद्धी महामार्ग मृत्यूकारी,
पन्नास खोके लई भारी ॥ध्रु॥

स्त्रीयांवर अत्याचाराची परिसीमा करी,
अत्याचाऱ्यांना अभय, शोध पत्रकारांवर गुन्हे भारी,
सत्ताधाऱ्यांच्या लीला गुवाहाटीच्या दारी,
पन्नास खोके लई भारी ॥ध्रु॥

सत्तेत भगवाधारी,
तरी जातीधर्म आंदोलनकारी,
तत्वाहीन राजकारणाची मांदियाळी,
पन्नास खोके लई भारी ॥ध्रु॥

सोन्याच्या मुंबईची सूत्रे कुनीतीच्या घरी,
मध्यान्न भोजनात जिह्याजिल्ह्यात घोटाळ्यांची शे कोटींची भरारी,
सत्तेसाठी खोकेबहाद्दरांची काहीही करण्याची तयारी,
पन्नास खोके लई भारी ॥ध्रु॥

भर पावसाळ्यात दोन हजार टँकरची फेरी,
काही ठिकाणी ओला दुष्काळ नांदी,
काय झाडी, काय डोंगर खोकेशाही गुवाहाटी मजा मारी,
पन्नास खोके लई भारी ॥ध्रु॥

तलाठी आगाऊ प्रश्नपत्रिकेची लाखोंच्या उलाढाली,
परीक्षेत गुन्हेगार पकडल्यावर मंत्रालय तडजोड करी,
कधी सारथी कधी महाराष्ट्र लोकसेवा,
कधी शिक्षकभरती, कधी पोलीसभरती,
सगळीकडे मलिद्याची किमया सारी,
पन्नास खोके लई भारी ॥ध्रु॥

शेतकरी आत्महत्या करी,
महागाई जनते छळी, दलालांची चांदी शेतमाल लाल सडा पाडी,
शासन आपल्या दारी,
पन्नास खोके लई भारी ॥ध्रु॥

शिवराय

शिवराय

शिवराय म्हणजे स्वराज्यसूर्य. कधीकाळी महाराजांचा एवढा गवगवा का? राजकारण सार असं वाटायचं. पण वैयक्तिक आयुष्यातील अडचणी पहिल्या. मग महाराजांचे मोठेपण पटले. प्रत्येकाने महाराजांचा आदर्श घ्यावा.

लहानपणी घरी जाणता राजा नाटकाच्या श्राव्यफिती होत्या. अगदी पाठ झालेलं. पुढे शिक्षण अन नोकरीसाठी पिंपरी चिंचवडमध्ये येणं झालं. सुरवातीचा काळ कठीण गेला. पुढे यशाचा काळ सुरु झाला. सुरवातीला दोन खोल्यांचं घर घेतलं. ते विकून तीन खोल्यांच घेतलं. भागातील पाणीप्रश्न वाढला. ते विकून नव्या ठिकाणी तीन खोल्यांचं घर घेतलं. गाडी, घर सगळं अगदी छान. नोकरीतील घुसमट कुणाला होत नाही? एके दिवशी राजीनामा देऊन स्वतःची संस्था उभी करण्याचा विचार केला.

अन तिथून खरं आयुष्य जगू लागलो. आर्थिक बाजू जेमतेम. शिते संपले म्हटल्यावर भुते कशाला राहतील? सोबत आजुबाजेचे वलय संपले. जीवनाच्या घाट वाटा मध्यरात्रीशी झुंज सुरु झाली. रोज एक नवीन संकट. जितकं स्वातंत्र्य तितकाच ताण. गृहकर्जरूपी औरंगजेब नाकाबंदी करू लागला. अचानक येणारी संकटे अक्षरशः धूळधाण उडवू लागली. काळरात्र संपेनाचं. सगळीकडे ताणच ताण. ताणाने एक आठवडा आजारीच पाडले.

व्यायाम नाही. आर्थिक अडचणी अन त्यात नवीन उद्योग चालू ठेवण्याचे आव्हान. मग आजारपण येणारच होते. सहज विचार करत असतांना महाराजांचा विचार आला. चार माणसांचे कुटुंब सांभाळणे इतकं कठीण असेल. तर महाराजांनी तीन लाखांच सैन्य. एक लाख घोडदळ. साडेतीनशेहुन अधिक गड कसे सांभाळले असतील. सहा सहा क्रूर शाह्या. त्यांच्यासमोर मूठभर सहकारी. कसा चमत्कार केला. उत्सुकता वाढली. इतिहासकारांच्या व्याख्यानातून महाराजांबाबत अधिकच कुतूहल वाढू लागले.

नुसत्या लढाया नव्हे तर शिवरायांचे दुर्ग विज्ञान. बलाढ्य गनिमांवर गनिमी चाल. वेगाचा व व्यक्तींचा अचूक उपयोग. अनेकदा संकटे आली. पण लढा सुरूच राहिला. बुद्धीचा आणि शक्तीचा अद्भुत संगम म्हणजे शिवराय. पंधराव्या वर्षी स्थापन केलेली स्वराज्य नावाची संस्था पन्नाशीत ३५० हुन अधिक गडांची अन तळांची झाली. तीन लक्ष सहकारी. मग काय माझ्या मनातील ताण कुठं गेला माहित नाही. अन आजवर सापडला नाही.

शिवरायांनी याच भूमीत स्वराज्य उभे केले. तेही आपल्याप्रमाणेच ह्याच मातीत जन्मले. मग त्यांच्या पाइकांना काय अशक्य? मग आयुष्याशी लढतोय. तेही निर्भीडपणे. आर्थिक काय सर्वच आघाड्यांवर यश मिळेपर्यंत लढा सुरु राहील. महाराजांनी परिस्थिती समोर हार मानली नाही. महाराजांच्या नावानेच दगड देखील जिवंत होईल. मग आपण तर माणसे आहोत. छत्रपतींचे नाव घेऊन पहा बारा हत्तीचे बळ संचारेल. शिवराय हा मंत्र आहे. महाराज म्हणजे मराठी माणसांसाठी महामृत्युंजय मंत्र!!

सहनशक्ती

सहनशक्ती

सहनशक्ती ही मोठी शक्ती आहे. परंतु, याकडे फारसे कोणी लक्ष देत नाही. उलट अपमान सहन करणे म्हणजे भित्रा असा शिक्का मारला जातो. अनेकदा अनेक कारणांनी त्रास होतो. सर्वांनाच कमीअधिक अनुभव येतो. ज्याला यश मिळवायचे त्यांना मात्र याची नितांत गरज आहे.

कोणीतरी काहीतरी बोलतो. कधीकधी अपघात होतो. वा कोणीतरी आपला अपमान करतो. अशा सर्व प्रसंगात सहनशक्ती कामाला येते. त्यावेळी राग येणे, त्रास होणे साहजिक आहे. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करता येणे वा ते सहन करण्याची क्षमता असणे हे चांगले लक्षण आहे. वेळ कधीही सारखी नसते. आज जो रंक आहे तो उद्या राजा होऊ शकतो. अन आजचा राजा उद्या रंक देखील होऊ शकतो. त्यामुळे अनेकदा अनेकांकडून अपशब्द उच्चारले जातात. अपशब्द विषाप्रमाणे असतात. परिणाम देखील तसेच होतात.

राग हा माणसाला राक्षस बनवतो. अन राक्षसाला बुद्धी नसते. सूड भावनेने केलेले कार्य कधीही हितकारक नसते. ह्याचा अर्थ माघार घेणे असा होत नाही. परंतु, रागावर नियंत्रण ठेवल्यास अनेकदा समोरच्याला स्वतःच्या चुकीची जाणीव होते. तो माफी देखील मागतो. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. ह्या जगात आर्थिक श्रीमंतीला महत्व दिले जाते. त्यामुळे तुम्ही आर्थिकदृष्ट्या थोडेफार जरी वरखाली झाला तर जग तुमच्याकडे तुच्छतेने पाहते. दुर्लक्ष करते.

अशावेळी तुम्ही स्वतःचा संयम ठेवला तर भविष्यात नक्कीच याचा फायदा होतो. कारण मारलेलं एकवेळ विसरणे शक्य आहे पण बोललेलं विसरले जात नाही. ह्याने विनाकारण शत्रू निर्मिती होते. त्याऐवजी स्वतःच्या सुधारणांकडे लक्ष देणे महत्वाचे. खरतर एक वयाच्या एक ठराविक एका टप्प्यानंतर ह्याची जाणीव होतेच. तापट व्यक्ती दुसऱ्यासोबत स्वतःचे देखील अहित करते. कारण त्यात सहनशक्ती नसते.

मराठी लोकांमध्ये शारीरिक आणि बौद्धिक क्षमतेमुळे अपमान सहन करण्याची वृत्ती नाही. रामदास स्वामींनीच म्हटलेलं आहे, “ठकासी असावे महाठक। उद्धटासी उद्धट। खटनटासी खटनट। झालेची पाहिजे॥” ह्याची अनेक उदाहरणे इतिहासात आहेत. पण प्रत्येक ठिकाणी शक्तीच कमी येते असे नाही. युक्ती देखील उपयोगी ठरते. त्यामुळे आपले स्वहित पाहण्याकडे आपला कल असावा.

मना करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. हेही खरे. परिस्थिती अनुकूल असेल तर त्याची प्रगती होते. स्वामी विवेकानंदाचे मन आणि त्याची शक्ती अशा नावाचे लहानसे पुस्तक देखील आहे. ते आपण युट्युबवर ऐकू देखील शकता.

शिवरायांनी तह केले. शत्रूला जाळ्यात ओढण्यासाठी घाबरले असे चित्र निर्माण केले. परंतु हे सर्व स्वराज्याच्या हितासाठी केले. बाजीराव तर जोवर सर्व परिस्थितीत आपला विजय होईल अशी खात्री होत नाही तोवर प्रत्यक्ष युद्धाला सुरवात देखील करीत नसे. त्यामुळेच तोही छत्रपती संभाजी महाराजांप्रमाणे जगातील अजेय योद्धा ठरला. त्यामुळे वाक्यार्थ घेण्याऐवजी लक्षार्थ घ्यावा. त्यातच आपले हित आहे. तूर्तास इतकेच.

दृष्टी तशी सृष्टी

दृष्टी तशी सृष्टी

दृष्टी तशी सृष्टी असते. कुणाला हे जग चांगले वाटते. तर कुणाला वाईट. एखाद्या पर्यावरणवाद्याला भेटा. तो तुम्हाला सृष्टी कशी विनाशाकडे चालली आहे, हे तो सांगेल. एखाद्या समाजसेवकाला भेटा. तो तुम्हास अर्धे जग अर्धपोटी आहे. हे सांगेल.

प्रत्येकाची आवड, रस यावर आपण आपला दृष्टिकोन तयार करतो. त्यात येणारे अनुभव आपले मत तयार करतात. त्यामुळे यात चुकीचे असे काहीच नाही. माझ्या वडिलांना धार्मिक गोष्टींमध्ये रस. त्यांच्याशी ज्या ज्या वेळी चर्चा करतो त्या त्या वेळी ते वेगवेगळ्या धर्मग्रंथातील बोधप्रत गोष्टी व माहिती देतात. माझा एक मित्र आहे. त्याचा स्वभाव रोखठोक. त्याला समोरच्या व्यक्ती अचूक ओळखता येतो. माझ्या लहान बंधुराजांना देखील हे जमते. ह्या दोघांच्या दृष्टिकोनातून पाहाल तर तुम्हाला जगातील सर्व प्रकारची मंडळी सापडतील.

माझ्यासारख्या मराठीप्रेमीला विचाराल तर मराठीच्या बाबतीतील चांगल्या वाईट गोष्टी आपणास कळतील. सांगण्याचा मुद्दा इतकाच की, दृष्टी तशी सृष्टी असते. हे लक्षात आले की, मीच बरोबर हा अहंभाव नाहीसा होतो. तुकाराम महाराज म्हणतात, “तुका म्हणे जे दर्पणी बिंबले । ते तया बाणले निश्चयेसि ।।”. थोडक्यात, जसे आपण पाहू तसे आपल्याला दिसेल. जशी आपली संगत तसे आपण होतो. त्यामुळे चांगली संगत महत्वाची आहे.

भौगोलिक अर्थानं पाहाल तर ही सृष्टी हे ब्रह्मांड आपल्या कल्पनेच्या पलीकडील आहे. अगदी गेल्या काही दिवसांपूर्वी शास्त्रज्ञांना एक ४६ हजार वर्षांपूर्वीचा जीव आढळला. अन तो जिवंत आहे. थोडक्यात आपले पूर्वजच. त्यामुळे अशक्य असे काहीच नाही. सांगण्याचा हेतू इतकाच की जशी आपली दृष्टी तशी सृष्टी आपल्याला दिसेल. त्यामुळे इतरांची मतांचा देखील आपण आदर करायला हवा.

याचा अर्थ कुणाचे चुकत नाही असं नाही. परंतु, आपण आपल्या दृष्टिकोनात फरक केला तर जगही निर्मळ दिसेल. नाहीतर कोणत्या जीवाला भोग चुकले आहेत? लोकमान्य टिळक आणि समाजसुधारक आगरकर यांच्यातील वादही ह्याच दृष्टीकोनाचा होता. पण तो विवेक आता कुठेतरी हरवतोय. त्यामुळे आजचा हा लेखप्रपंच. ह्यातून स्व:विकास तर होईल पण ह्या जाणीवेने आपल्या व्यक्तिमत्व देखील फुलेल.

मला स्वतःला हे अनुभवाअंती पटले. तसे अनुभव मिळणे हेही सुदैवच म्हणायचं. बाकी, वेगवेगळे दृष्टिकोन पाहिल्यावर आपल्याला त्यातील सीमा व न दिसणारे फरकाची कारणे सापडतात. तेही आपल्याला नवे ज्ञान देते. तूर्तास इतकेच.

सुख

सुख

सुख मिळवण्यासाठी प्रत्येकजण झगडतो. सुखाची व्याख्या देखील प्रत्येकाची निराळी. अन ते मिळवण्यासाठी काय करावे. यासाठी अनेक मार्ग चोखंदळतात. पण सुख हे मानण्यात असत. हा माझा अनुभव आहे.

व्यक्ती तितक्या प्रकृती. कुणाला पैशात समाधान दिसते. कुणाला अमुक व्यक्ती मिळावी. तर कुणी प्रसिद्धीत आनंदी होते. तर कुणी वस्तूत समाधान शोधते. मी ज्यावेळी नोकरीच्या शोधात पुणे पिंपरी चिंचवड परिसर आलो. त्यावेळी मासिक पाच हजार हे माझे ध्येय होते. दुसऱ्याच महिन्यात दहा हजाराची नोकरी मिळाली. आता लाखभर रुपयांचे देखील कौतुक वाटत नाही! सुखाची नेमकी व्याख्या काय करावी?

गेल्या काही काळात कुणी सुखी आहे हेच मला दिसलंच नाही. प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या दुःखात. कुठल्या ना कुठल्या ताणात. बर हा त्रयस्थ व्यक्ती म्हणून अकारण वाटावा असा. पण त्यांच्यासाठी ते महत्वाचे. बर आपण अशा समाजात राहतो. तिथं सल्ले फुकटात मिळतात. त्यामुळे स्वतःहून सल्ला घेणे हा विषयच नाही. त्यात प्रत्येकाची परिस्थिती वेगळी. त्यामुळे, त्यांनाही दोष देण्यात काही अर्थ नाही.

कुटुंब इतकी अंगवळणी पडलेली गोष्ट. त्यामुळे ती एक संस्था आहे, ह्याचाच विसर पडतो. अहमिकेपायी अकारण ताण घरोघरी. कुणीच माघार घेत नाही. दुसरी बाजू समजून घेण्याची क्षमता सर्वांचीच संपली. पडती बाजू हेही दुःखाचं कारण झालंय. काहीजण तर शब्द देखील पकडतात. अन प्रत्येकात नसलेलं दुःख जन्माला घालतात. हेखेखोर नाहीत असे मला म्हणायचे नाही. मुद्दा इतकाच त्यामुळे मिळालेल्या यशाचा देखील आनंद घेता येत नाही.

व्यावसायिकांनी तर सुख म्हणजे वस्तू खरेदी अशी व्याख्या केली आहे. अगदी लहानशा चॉकलेटपासून ते आलिशान घरापर्यंत सगळ्याच गोष्टी म्हणजे आनंद असा समज पसरलेला आहे. शालेय शिक्षणात प्रगतीपुस्तकाच्या अंकात सुख शोधणारे देखील कोट्यवधी आहेत. बर यश मिळवण्याची भूक देखील अमर्याद. त्यामुळे मिळालेले यश देखील तात्कालिक.

माझ्यामते सुख ही आनंदाची आंतरिक भावना. आपण बाह्यजगात शोधतो आणि अधिकच दु:खी होतो. बाहेर सापडणारच नाही. सुख म्हणजे हवं ते मिळणे. पण अनेकदा इच्छा वाढत जातात. त्यात यशापशय असते. दुःख त्रास ताण येतो. काहीजण ह्या गोष्टींमध्ये इतके गुंततात की, मिळालेल्या गोष्टींचे ते सुख उपभोगत नाहीत! अन मग सगळं मिळून देखील समाधान मिळत नाही. त्यामुळे मिळालेल्या यशाचा आनंद घेणे. त्यातूनच पूर्णत्वाची अन सुखाची अनुभूती येते. नाहीतर सुखाच्या नादात दुःखाचे डोंगर ओलांडून देखील समाधान आनंद मिळणार नाही. तूर्तास इतकेच.

व्यक्तिमत्व

व्यक्तिमत्व

व्यक्तिमत्व चांगले असायलाच हवे. ते व्हावं यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील असतो. त्याचा प्रभाव अधिक. जितके तुम्ही प्रभावी तितकी तुमची पत वाढते. जितकी पत तितकी प्रसिद्धी. आपण आपल्या आर्थिक सामाजिक दृष्टिकोनातून पाहूया.

स्वामी विवेकानंदांच्या मते, दुसऱ्या व्यक्तीवर आपल्या व्यक्तिमत्वाचा दोन, विचारांचा एक तृतीयांश प्रभाव पडतो. त्यामुळेच शास्त्रज्ञ, विचारवंत कितीही मोठा मुद्दा मांडला. तरी धार्मिक, राजकीय व्यक्तीच्या मानाने तो कमी ठरतो. कारण लोकांना जे प्रत्यक्ष दिसते. त्यावरून ते व्यक्तीचे चारित्र्य ठरवतात. समाजात सर्व प्रकारची माणसे असतात. त्यामुळे व्यक्तिमत्त्वाकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. चांगली शरीरयष्टी व्यक्तिमत्व सुधारते. योग्य पेहराव आणि चांगली देहबोली. हे इतरांवर अधिक परिणाम करतात.

आता चांगल्या शरीरयष्टीसाठी व्यायाम गरजेचा आहे. अन माझ्यामते तेच सर्वात अवघड आहे. कारण स्थूल शरीराला व्यायाम शत्रू वाटतो. मी तर व्यायाम करेन असे ठरवतो. पण त्यात यश फारसे लाभत नाही. हे झाल्यास पुढील बाबी बक्षीस स्वरूपात मिळतात. कारण चांगली शरीरयष्टी मनही कणखर बनवते. मन कणखर आव्हाने पेलण्यास सक्षम होते. आव्हानांना टाळून यश मिळत नाही. स्वभाव देखील सुधारतो. आत्मविश्वास दुणावतो. न्यूनगंड कमी होतो. ताणतणाव, चिडचिड कमी होते. इतके सारे व्यायाम देते. प्रभाव पडतो. इतका की, एखादा खोड्या काढणारा देखील चार वेळा विचार करतो. हा माझा अनुभव आहे.

चांगला व साजेलसा पेहराव. हेही व्यक्तिमत्वाचा एक पैलू आहे. परिसराला, वातावरणाला आणि आपल्या शरीराला साजेल असा पेहराव उत्तम असतो. दुसऱ्याची नक्कल करण्यात काहीच अर्थ नाही. कारण प्रत्येक व्यक्ती आणि भोवतालची परिस्थिती वेगळी असती. आजकाल कनिष्ठ महाविद्यालये, जाडजूड काळे डगळे सक्तीचे करीत आहे. एकतर आपण पृथ्वीवरील उष्ण कटिबंधीय प्रदेशात आहोत. अन त्यात तसे कपडे. शरीराची लाही लाही करणार. मग तो व्यक्ती कसा दुसरा विचार करू शकणार? याचा सारासार विचार शिक्षण संस्थांनी करावा.

चांगल्या वागणे व्यक्तिमत्व सुधारणेचे एक प्रतीक आहे. चांगले म्हणजे सहाय्य करणे. इतरांना प्रोत्साहन देणे. मदत करणे. किमान एक चांगला श्रोता होणे. शक्य असल्यास मोजक्या शब्दात मार्गदर्शन. विरोधी मतांचा देखील सन्मान करणे. लोकांना मदत करणारे लोक प्रिय असतात. अशी लोक मिळणे आजकाल देवाइतके दुर्मिळ झाले आहे.

सकारात्मक विचारसरणी व्यक्तिमत्वात भर घालते. ध्येय गाठण्यासाठी याचा उपयोग होतो. सकारात्मकता विचारांचा आवाका वाढवते. नवीन गोष्टी शिकणे हेदेखील सकारात्मक विचार अंगी रुजण्यास सहाय्यक ठरतात. अन ह्यामुळे व्यक्तिमत्वाचा विकास होतो. व प्रभाव वाढतो. माझ्यामते, सुरवात केली तर यात भरपूर वाव आहे. त्यामुळे, निसंकोचपणे स्वरूप पहा. अन त्यात बदल घडवा. आपणच आपले शिल्पकार आहोत!!

 

सकारात्मकता

सकारात्मकता

सकारात्मकता ही आजच्या काळातील सर्वात कठीण बाब. नकारात्मक राहावे अशी परिस्थिती. महागाई, रस्त्यांची दुरावस्था, स्त्रियांवर अत्याचार, गुन्हेगारी. यामुळे कठीण झालं आहे.

कोरोनाच्या काळातील अनुभव. त्याकाळी कोरोनाने मरणाऱ्या लोकांपेक्षा त्याच्या भीतीनं अधिकजण गेले. शासकीय आणि वृत्तसंस्थांनी ती भीती पराकोटीला नेली. माझ्या घरात वृत्तवाहिन्या फारशा लोकप्रिय नसल्याने त्रास कमी झाला. भीती पाठी ब्रह्मराक्षस. हे खरंय. नवीन गोष्टी शिकणे हा सकारात्मक राहण्याचा सोपा उपाय. नवीन गोष्टी सकारात्मकता निर्माण करतात. नाविण्य नसेल तर नकारात्मकता वाढते. हे माझे निरीक्षण आहे. नकारात्मकता वाद आणि अशांततेची जननी आहे. अन त्यातून क्वचितच चांगले साध्य होते. बदल देखील आयुष्य सुकर करतात. मग ते बदल कितीही लहानसे का असेनात.

प्रकाश देखील सकारात्मता वाढवतो. जिथं अंधार तिथं आरोग्याला धोका. जिथं आरोग्य नाही तिथं समाधान नाही. आणि जिथं समाधान नाही तिथं नकारात्मता वाढते. समाधान हा मोठा विषय आहे. त्यावर कधीतरी सविस्तर चर्चा करूयात. थोडक्यात, प्रकाश महत्वाचा आहे. सातत्याने एकाच गोष्टीचा विचार करणेही त्रासदायक असते. एकच विचारांमुळे मानसिक आरोग्य बिघडते. अतिरेक वाईटच असतो. मनात विचार येतात. विचार मनाला पटतात. अन त्यातून कृती होते. अन कृतीतून बदल घडतात. त्यामुळे चांगले विचार अंगी बाळगायला हवे.

अशा अनेक लहान लहान गोष्टीतून सकारात्मकता वाढू शकते. चांगली संगत आयुष्याला आकार देते. चांगल्या लोकांच्या संगतीत राहिल्याने सकारात्मक दृष्टिकोन बनतो. त्यामुळे चांगल्या संगतीत राहावे. दिवसाचे चक्र लवकर सुरु केल्याने देखील अनेक लहान सहान प्रश्न सुटतात. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. अनेकदा वेळेअभावी अनेक गोष्टी करायच्या राहतात. त्यामुळे लवकर उठणे फायद्याचे ठरते. स्वतःसाठी वेळ दिला तर चिंतन करणेही शक्य होते. काम रेंगाळली की ताण येतो. ताण नकारात्मकता आणि चिडचिडेपणा वाढवते. त्यामुळे सकाळी लवकर उठण्याची सवय चांगली आहे. सुखद सकाळ दिवस चांगला जाण्यास मदत करतो.

नकारात्मकता हा रोग आहे. असे चाणक्य सांगतो. कितीही कठीण परिस्थिती येवो. सकारात्मकच राहायला हवे. दिल्ल्लीश्वरो वा जगदीश्वरोवा म्हणणारे असतांना सहा शाह्या उलथून मराठी स्वराज्य उभे ठाकले. ह्यापेक्षा प्रेरणादायी अन्य काय गोष्ट? त्यामुळे कायम सकारात्मकच रहा. हाच यश मिळवण्याचा मार्ग आहे. यश म्हणजे काय हाही एक मोठा विषय आहे. त्यावर नंतर सविस्तर बोलूया.