लोकशाहीला श्रद्धांजली द्यावी, अशी स्थिती निर्माण झाली आहे. जे जे राज्यघटना व तत्व म्हणून राजकारणात आहे. त्याच्या नेमकं उलट घडत आहे. एक देश म्हणून आपण दररोज अधोगती करीत आहोत. ज्याप्रमाणे पाकिस्तान, म्यानमार, इंडोनेशिया, बांग्लादेश धर्माधतेच्या चिखलात डुंबत आहे तिकडे आपली वेगाने वाटचाल होत आहे.
फक्त धर्मांधता नाही तर नीतिमत्तेचा देखील कोणताही विचार सत्तापिपासू सत्ताधारी करीत नाहीत. असंगाशी संग हाही तोकडा वाटावा अशी परिस्थिती आहे. बेबंदशाही सुरु झालेली आहे. चार चार पक्ष बदललेला राहुल नार्वेकर हा व्यक्ती हा पक्षांतर बंदीवर निर्णय देतो. यातून लोकशाहीची वाताहत स्पष्टपणे दिसते. सर्वोच्च न्यायालयाला ह्या नुरा कुस्तीत कसली मजा येते हेही अनाकलनीय आहे. (more…)
नोंदी लिहिण्यासाठी सुचावं लागत. अन त्याहून मोठं त्यासाठी वेळ द्यावा लागतो. मध्यंतरीच्या बराच मोठा काळ दोन पैकी एक गोष्ट नसल्याने काहीही होत नव्हतं. अगदी ठरवून देखील. परंतु, गेल्या काही दिवसातील परिस्थिती पुन्हा लिहिण्यास उद्युक्त करीत आहे.
एक चीड, विचार मनात वादळ निर्माण करतो. अन नोंद तयार होते. प्रत्येकाला मन मोकळं करावस वाटत. मन मोकळं करण्यासाठी प्रत्येकाचे मार्गही वेगेवेगळे. मी नोंद खरडून सुखावतो. इथ जे स्वातंत्र्य आहे ते समाजमाध्यमांवर नाही. तिथं प्रत्येकाची तोंड वेगवेगळ्या दिशेला. अन राजकीय पक्षांच्या सुळसुळाट झाल्यापासून तिथं कुविचारांचं प्रदूषणच अधिक. त्यामुळे या न त्या कारणाने इकडे येणं होत!
हजारो विषय आहे. हजारो संकल्पना आहेत. अनेक विषयावर मत मांडायचं आहे. पण कुठून सुरवात करावी हेच कळेना. शेवटी आज तो दिवस उगवला. कोणतीही गोष्ट सातत्याने करण्याचा अयशस्वी प्रयत्न मी करीत असतो. चुकून एखाद्या विषयात यश येते. नोंदीत देखील यश येतेय का ते पाहूया.
आजूबाजूच्या घटना अगदी तापदायक आहेत. एकूणच परिस्थती अधिकच गंभीर होत आहे. व्यावसायिक पातळीवर आशेचा किरण दिसतोय. पण देशातील परिस्थितीमुळे मनःशांती नाही. प्रत्येकजण विचारांचा चष्मा घालून जग पाहतोय. मोकळ्या डोळ्याने जे दिसत तेच त्यांना त्यामुळे दिसेनासे झाले आहे. तीच खदखद ह्या नोंदी खरडण्यास प्रवृत्त करते. परिस्थतीत सुधारणा होईना. अन लोकांना सुधारणा व्हाव्या असेही वाटेना. सगळेच चिखलात यथेच्छ डुंबत आहेत. कुणास सांगावे तर तोही चिखलात ये म्हणतो!
सकारात्मक विचार करायचा असं मी रोज ठरवतो. पण रस्त्यांवरील खड्डे दादा चिडवतात. रस्त्यांच्या कडेला असलेले अनधिकृत आडवे तिडवे फलक अन त्यातून डोकावून हसणारे दादा, मामा, नाना, कार्यसम्राट खिजवतात असाच भास होतो.
अनधिकृत टपऱ्या, हातगाड्या आणि नियमबाह्य शासकीय कारभार एकेदिवशी माझाही माधव आपटे करणार हे नक्की. तक्रारींना शासन जुमानेना. आजूबाजूची परिस्थिती अन त्यात महागाईने आर्थिक यश देखील गोड लागेना. इतर देशांमध्ये जसा महागाई आणि सार्वजनिक प्रश्नांनी उद्रेक होतो तसा आपल्याकडे होईल का? बर वर्तमानाचं नसेल तर भविष्यासाठी कुठवर आशावादी राहायचं?
मग पुन्हा विचार येतो महाराजांचा. सहा शाह्या असतांना त्यांना भेदून स्वराज्य उभं राहील! एक न अनेक संकटे आली! अन मराठी वाघांनी ती पेलली! अन आताच्या तीन देशांवर स्वराज्य उभं केलं. अन पुन्हा आशेचा किरण दिसतो. लढण्याची उमेद जागी होते. हीच उर्मी आर्थिक आणि सामाजिक स्वराज्य, स्वातंत्र्याची पहाट आणेल! असो, अजूनही शब्दांच्या माळा मनातून ह्या नोंदीत उतरत आहेत! पण अतिरेकही वाईट! वाचकाला छळून कसे चालेल? तूर्तास इथं थांबतो! बाकी बोलूच!!
नवी सुरवात अनेकदा झाली. म्हणता म्हणता तास, दिवस, महिने अन वर्षे संपतात. अनुभव सांगतो, वेळ म्हणजे अमूल्य!. त्यापेक्षा मौल्यवान काहीच नाही. आता हे कळायला बराच काळ लोटला. ती गोष्ट वेगळी. हाहा! असो! आता ठरवलेली कामे करायची. त्यातीलच एक भाग म्हणजे नोंदी.
बघायला गेलं तर फारसे मोठे वाटत नाही. परंतु, एका कालखंडानंतर हा मनाचा आरसा होतो. त्या काळाची परिस्थितीचा आरसा! सध्या सगळ्याच पटलांवर निराशेने ग्रासले आहे. आर्थिक संकट ओढवले आहे. परंतु, नेहमीप्रमाणे यातूनही मार्ग निघेल अशी आशा आहे. संकट कायमच येत असतात. संकटे, कधी आल्यावर कळतात. तर कधी त्याची आधीच जाणीव होते. मी काही लेखक नाही. त्यामुळे माझ्या नोंदीतून आपल्याला फारसे ज्ञान मिळणार नाही. परंतु, एक सामान्य मराठी भाषिकांच्या मनाची जाणीव नक्कीच होईल.
खरं तर हा काळ चित्रफितीचा, युट्युबकरांचा! जुन्या काळातील नोंदीकरांचा आता काय निभाव लागणार? तरीही यत्न करतोय! शक्य झाल्यास श्राव्यकर, युट्युबकर होण्याचाही प्रयत्न करेल. गेला काही काळ ट्विटरकर झालेलो! तिथलं जग वेगळच! जगाच्या राजकारणावर व्यक्त होता होता तिथेही राजकारण चालत! आता ते सगळीकडेच चालणार! त्यामुळे नवीन असे काही नाही! पण त्यापेक्षा नोंदीत अधिक स्वातंत्र्य! टीकाकार कमी असतील म्हणून नाही. परंतु मनसोक्त व्यक्त होता येत.
विषयच बंधन नाही. शब्दांची मर्यादा नाही! सुरवातीला अस सुचायचे! नंतर फारशी सुचण्यासाठी अन व्यक्त होण्यासाठी वेळेची मर्यादा यायची. आता पुन्हा कदाचित तो काळ आला आहे. सुचतंय पण अन वेळही द्यावासा वाटतोय! पाहुयात किती काळ हे चालतंय! म्हणून पुन्हा नोंदीच्या रूपाने व्यक्त होण्याचे ठरवलं आहे!
आता पुन्हा सुरवात करतांना, उत्साह आहे. पण उत्साहाच्या पुरात काय बोलायचं हे मात्र सुचेनासे झाले आहे. त्यामुळे आधी मन मोकळं करावं असं ठरवलेल. अनेक विषय आहेत. अनेक विषयांवर अनेक मते आहेत! बऱ्याच गोष्टी सांगायच्या, बोलायच्या आहेत. जगाच्या पटलावर अन स्वतःच्या कौटुंबिक पातळ्यांवर अनेक गोष्टी घडत आहेत. त्यामुळेच की काय, व्यक्त होण्याचा उत्साह निर्माण झाला.
नवी सुरवात करण्याचा अन यावेळी सातत्य ठेवण्याचा प्रयत्न नक्कीच होईल! पाहुयात, किती यश मिळतंय ते! मराठी दिनांक थांबलेलं आहे! मराठी दिनांक म्हणजे दैनंदिन दिवस. मराठी महिना, दिवस कोणता ते. तेही पुन्हा सुरु करण्याचा विचार आहे. बाकी बोलूया!!
व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. अन कितीही गमतीने घेतलं तरी हेच खरं आहे. प्रत्येकाला येणारे अनुभवावरून प्रत्येकजण त्याचा दृष्टिकोन ठेवतो. कुणाला अमुक विषय महत्वाचा वाटतो. तर कुणाला अमुक मत पटत नाही. माझ्यामते ह्यात काहीच गैर नाही.
एखादी व्यक्ती अशी का याचे उत्तर शोधायचं झाल्यास त्याचे अनुभव ऐका. आपल्याला कोडे उलघडेल. ते लक्षात आल्यास तो व्यक्ती असा का याची कारणे समजेल. अनेकदा त्यांच्या दृष्टिकोनामागील वस्तुस्थिती माहित नसल्यानं प्रश्न निर्माण होतात.
गमतीचा भाग असा की, प्रत्येकालाच आपण करतोय तेच योग्य वाटते. अन ते इतरांनाही वाटावे असा त्याचा आग्रह असतो. यात मी देखील मोडतो. पण इतरांनाही त्यांची मते असतात. अन तीही आपण स्वीकारायला हवीत. याबाबत मी व्यक्तिशः प्रयत्न करीत आहे.
खरं तर आपण स्वतःमध्ये या गोष्टी अंगिकारायला हव्यात. अनेकदा आपण एखाद्याविषयी अकारण गैरसमज निर्माण करून घेतो. त्यामागची पार्श्वभूमी समजून घेतली तर अनेक गोष्टींचे कोडे उलगडू शकते. खरं तर असं वैचारिक काही मांडव असा नोंदीचा हेतू नव्हता.
परंतु, आपल्याकडे गेल्या अनेक वर्षांपासून सगळं काही मनोरंजनात्मक! असं झाल्याने, प्रत्येक गोष्ट मनोरंजन म्हणून पाहिली जाते. मग त्या दैनंदिन घडामोडी असोत वा अन्य. वर्तमानपत्रांचे मथळे व बातम्या पाहिल्या की हे सहज लक्षात येण्याजोगे आहे. त्यामुळे अशा विषयावर अन अशा पद्धतीने व्यक्त व्हावे असा हेतूही नव्हता. असो!!
एकूणच पस्तीशीनंतर आपोआपच समजूतदारपणा वाढतो. हे मी माझ्या अनुभवावरून सांगत आहे. हा बदल खऱ्या अर्थाने चांगला आहे. समोरील व्यक्ती हा स्वतंत्र आहे अन त्याला त्याचे स्वातंत्र्य जपण्याचा अधिकार आहे. ह्याची आपल्या मनाला समजूत घातली तर अनेक गोष्टी सहजपणे सुटतात.
गेल्या काही काळापासून हवामान आश्चर्यकारकरीत्या बदलत आहे. त्याचा थेट परिणाम जीवसृष्टीवर होत आहे. त्यामुळे आजकाल प्रत्येकाच्या जीवनात तणाव फारच वाढलेला आहे. ह्याचा विचार करून आपण आपल्या सानिध्यात येणाऱ्या लोकांना कसे तणावमुक्त ठेऊ शकतो. आपली प्रेमळ बंधने किती कमीत कमी लादू याचा आपण सर्वांनी विचार करायला हवा.
माझ्या दोन्ही चिमुकल्यांचे स्वभाव अगदी भन्नाट आहेत. मोठ्या राणीसरकार कैवल्याचा पुतळा आहेत. तर लहान राणीसरकार दंगेखोर! त्यांच्या स्वभाव पाहता अनेकदा याचा प्रत्यय येतो. तूर्तास इतकेच. बाकी बोलूच!!
राक्षसेंद्र पेक्षा अन्य वाईट शब्द सुचेना म्हणून वापरला. मृत्यूयुग वाटावे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा जगातील सर्वाधिक मोठा फटका हा निःसंशय भारताला बसलेला आहे. शक्यतो मी ह्या विषयावर बोलायचे टाळतो. पण जिथं दिवसाला चार चार हजार लोक एका साथीच्या रोगाने मरत आहेत. तिथं हा विषय कसा टाळता येणार?
नियोजनशून्य अन कमालीचे बौद्धिक दारिद्रय असलेले देशाचे राजकीय नेतृत्व भारताला लाभल्याने ह्यापेक्षा वेगळे परिणाम होण्याची शक्यताही नव्हती. देशात राक्षसेंद्र आमच्या राज्यात उद्धवेन्द्र अन उत्तर भारतात योगिंद्र असे महान दिग्गज नेते. नियोजन म्हणजे टाळेबंदी हीच काय ते आमच्या सरकारची बौद्धिक मजल! बरं टीकेचाही तिटकारा यावा इतकी भयाण परिस्थती निर्माण करून ठेवलेली आहे.
राष्ट्रीय लसीकरण शक्य नाही पण आणीबाणीच्या काळात सरकारकडे नवीन दरबार (सेंट्रल व्हिस्टा) बांधायला पैसा आहे. सैन्य आर्थिक अडचणीत आलंय! भाड्याने शस्त्रास्त्रे अन उपकरणे घेऊन देशाची रक्षण करण्याची त्यांच्यावर वेळ आलेली आहे. पण आम्हाला काय आम्ही दाढी वाढवणार थाळ्या अन ताट बडवणार!
कोरोना स्वतः आलेला नाही! त्याला आमच्या राक्षसेंद्रने नियोजनशून्य कारभाराने आणलाय व त्याने तळ ठोकलाय! सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर काय बोलायचे? मुळात ती भारतात अस्तित्वातच नाही. ती सुधारणे आमच्याच्याने शक्य नाही. अन असती तरी आमच्या सांघिक सरकारने ती विकून टाकली असती किंवा अदानी अंबानीला एका रात्रीत भाड्याने दिली असती.
नोटबंदी वाईट वाटली. त्याहून भयानक टाळेबंदी निघाली. महाभयानक तर नियोजनशून्य सरकारची बौद्धिक दिवाळखोरी वाटत आहे. सगळा दोष जनतेला देऊन काय साध्य होणार? प्राणवायू/ऑक्सिजन संपणे. सैन्याला आर्थिक चणचण निर्माण होणे. पेट्रोल, डिझेल, गॅस अन खाद्यतेलाच्या किमती तर त्यांच्या हातात नाहीत ना!
आज दुपारी एका आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीवर एक परकीय देशाची महिला, जगाला कोरोनाची लस पुरवणारा देश स्वतःच्या नागरिकांना पुरवू शकत नाही ही शोकांतिका आहे असं म्हणत होती. काय खोटं आहे? स्वतःच घर आगीने वेढलेलं असतांना बाजूच्या घराची आग विझवण्यासाठी धडपडण्यात कसलं आलंय डोंबल्याच विश्वगुरूपणा? हा तर निव्वळ मूर्खपणा आहे!
मी मान्य करतो ह्यात एकट्या(?) सरकारचा सगळा दोष नाही. पण यश मिळालं तर बोक्यांप्रमाणे भांडणारी ही मनपा/राज्य/सांघिक सरकारे अपयश आल्यावर बिनदिक्तपणे जनतेवर ढकलून मोकळी होतात. हेही चुकीचं आहे.
जगभरात अनेक देशांनी टाळेबंदी केली. पण त्यांनी त्यांच्या नागरिकांना पोसले. प्रत्यक्ष आर्थिक भार उचलला! अमेरिकेचे सरकारने साधे ब्रॉडबँडचे बिल देण्यासाठी भत्ते दिले. इंग्लंडच्या सरकारने पगाराच्या ८०% आर्थिक साहाय्य केले. अन आमच्या राज्य सरकार असो वा सांघिक सरकार इंधन, वीज बिलाच्या किंमती तिप्पट करून जनतेला वेठीस धरले. माल्या सारख्या धनाढ्यांचे कर्ज माफ करणारे सर्वोच्च न्यायालयात प्रामाणिक जनतेला आर्थिक दिलासा देण्याची खोटी देखील वचने देत नाहीत.
पुनःश्च हरी ओम आता कितवा आहे ते सांगता येणार नाही. पण पुन्हा नोंदी लिहिण्याचा यत्न करणार आहे. अनेकदा ठरवूनही यात सातत्य काही येईना. ज्या गोष्टीने दशकभरापूर्वी वेड लावलेलं आज ती गोष्ट कृतीत आणण्याचा काही योग येत नाहीये.
खरं तर टाळेबंदी अन कोरोनाच्या कृपेने अनेक विषय डोक्यात येतात. परंतु पूर्वी (पूर्वीचा अर्थ दहा वर्षे आधी) प्रमाणे ते काही मांडता येत नाही. माझ्या लहानपणी बहुतांश मुलांप्रमाणे माझ्यातही न्यूनगंड होता. प्रत्येक गोष्ट आपण करतो ती चुकीची असते वा होते असा माझा ठाम समज गैरसमज होता. शालेय जीवनात असतांना तर मला दुसरा करतोय ते बरोबर अन मला वाटते ते चुकीच असं वाटायचं! त्यातून व्यावसायिक जीवनात आल्यावर अगदी उलटा स्वभाव बनला.
सुदैवाने अनेक गोष्टी सकारात्मक घडत गेल्याने त्या स्वभावाची काही अडचण निर्माण झाली नाही. परंतु आता पस्तीशी ओलांडल्यावर मध्यबिंदूवर असावे असं वाटत. तसं अवघड आहे. पण प्रयत्न करत असतो. आक्रमक स्वभावाला मुरड घालतो. तात्काळ प्रतिक्रियावादी न होण्याकडे भर देतो. समजूतदारपणा खरं तर सगळ्यांकडेच असतो परंतु आजूबाजूचे वातावरण अन परिस्थिती आपल्या स्वभाव अन वागण्यावर फार मोठा प्रभाव पाडते.
खरं तर आज ह्या गोष्टी बोलण्याचा तसा काही विशेष अर्थ नाही. परंतु, आपण जे ठरवतो ते कृतीत यायलाच हवं असा दंडक गेल्या काही वर्षे केलाय. काही बाबतीत ते यशस्वी देखील झालंय. परंतु सगळ्याच क्षेत्रात अजून यश मिळालेलं नाही. त्यापैकीच एक म्हणजे नोंदी/ब्लॉग चा प्रपंच!
अनेक गोष्टी करायच्या आहेत. अनेक गोष्टींवर मते मांडावीशी वाटतात. परंतु, प्रापंचिक माणसाला प्रपंच नेटका करण्यात बराचसा वेळ खर्ची घालावा लागतो. अन अनेक संकल्पना अन गोष्टी पुढे ढकलल्या जातात! तसं अशक्य काहीच नाही. प्रयत्न केल्यास यश मिळते. काही वेळेस तुम्हाला झुंज द्यावी लागते. पण प्रयत्न करीत राहिल्यास यश मिळण्याचा हमखास योग्य! हे सगळे अनुभव आहेत. तर त्याच अनुभवाच्या ज्ञानावर रोज किमान एक नोंद लिहिण्याचं प्रयोजन केलेलं आहे.
पाहुयात यावेळी तरी यश मिळवता येतंय का ते! ते कुणीतरी म्हटलंय ना ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे’. फारच पिळलं का? बऱ्याच दिवसांनी असं मनमोकळं बोलतोय त्यामुळं समजून घ्याल ही अपेक्षा करतो.
काय म्हणावं मोदी सावकारांना? उठता बसता दिसता मोदी सावकार सावकारी करण्यात गुंग! गेल्या आठवड्याचीच बातमी पहा. राज्यांचा करांचा हिस्सा गेल्या दोन वर्षांपासून मोदी सावकारांनी दिलेला नाही! खूपच प्रकरण ताणलं तर पाच दहा टक्के रक्कम वर्ग करतात! आता ती रक्कम २.३ लक्ष कोटी रुपये इतकी झाली!
आता कराचे दोन गोळे गट्टम केल्यावर राज्यांना कर्ज काढण्याचा उरफाटा सल्ला दिला! इतकंच काय त्याच व्याज देखील राज्यांच्याच गळ्यात मारले! तशी मोदी साहेबांची सावकारी नवीन नाही! गेल्यावेळी तीन अब्ज रुपयांचा चायनामेड पुतळा उभा करण्यासाठी जगात पन्नास पैसे प्रति बॅरल कच्चे तेलाचे भाव असतांना जनतेला नव्वदीच्या घरात इंधन खरेदी करायला लावले! पुढे तोच पैसा चीनला गेला अन आपण न हलणारा डुलणारा पुतळा खरेदी केला!
लबाडी देखील शब्द कमी म्हणावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे! जिथं मोदी साहेबांच्या पक्षाचे सरकार त्याला हवा तेवढा निधी! अन जिथं नाही त्या राज्यांशी सुडाची वागणूक! कशाचा देश अन कशाचं काय! आजचीच बातमी, मोदी सावकारांनी ४.३९ कोटी शिधाधारकरांना बनावट घोषित केले! बरं ते या देशाचे नागरिक नाहीत का? का ते करच भरत नाहीत? काय तर म्हणे आधारकार्ड नव्हतं!
आता मला सांगा, आधारकार्ड कधीपासून जन्माचा वा ओळखीचा पुरावा वा राष्ट्रीयत्वाचा पुरावा म्हणून साक्षांकित झाला? नाही म्हणजे त्याची संस्था देखील असा कोणताही दावा करत नाही! बर एक खासगी ओळखपत्राहून सरकारी योजना नाकारणं घटनाबाह्य नाही काय?
मोदी सावकारांच्या राज्यात कर दहशतवाद वाढला नव्हे तर बोकाळलाय! लोकांच्या आयुष्याची राखरांगोळी झाली तरी चालेल पण आपली सावकारी चालायला हवी! अगदीच निषेधार्ह आहे!
आत्मपरीक्षण प्रत्येकाने सातत्याने करायला हवे. त्याचा चांगला फायदा होतो. स्वतःच्या प्रत्येक गोष्टीचा त्रयस्थ व्यक्ती म्हणून केलेला अभ्यास अनेक पैलू उलगडतो. अनेकदा आपण अनेक गोष्टी बोलतो. अनेक ध्येय समोर ठेऊन काम करतो. कधी यश तर कधी अपयश मिळते. पण या पलीकडे जाऊन विचार केल्यास आपण केलेल्या कामाचे विश्लेषण अनेक चांगल्या गोष्टी दर्शविते! (more…)
संकट आणि आपण! संकट येतात आणि जातात! संकटे आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. तरीदेखील आपण संकट आले म्हणून घाबरतो!
मला सांगा जगात असे कोण आहे ज्यावर कधीच संकट आले नाही? असे कोण आहे ज्याचे जीवन सुखात गेले? मुळात संकटे ही सुखाचे महत्व समजावतात व आयुष्याला नवी दिशा देतात.
दिवसानंतर रात्र व रात्रीनंतर पुन्हा दिवस येतो. त्यामुळे जर आयुष्य संकटांनी अंधारले असेल तर लक्षात ठेवा आनंदनाचा प्रकाश येण्याची वेळ झाली आहे!
कोणतीही गोष्ट कधीही कायम नसते! त्यामुळे संकटे येतील जातील! त्यासाठी मनाची तयारी हेच सर्वात मोठं हत्यार आहे! शिवरायांनी ज्यावेळी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतलेली त्यावेळी त्यांचे वय तरी असे किती होते? अन त्यांचे स्वप्न तर हिमालयाएवढे!
स्वराज्य स्थापन झाल्यानंतर देखील थोडीच संकटे थांबली! अनेकदा जीवावर बेतेल अशी व्यवस्था नियतीने केलेली! पण स्वराज्य उभे राहीले व ते पुढे जाऊन शत्रूचा कर्दनकाळ ठरले! मग विचार करा! आपल्यावर असलेले संकट त्याहून मोठे आहे का?
संकटावर मात केली जाऊ शकते! संकटे देखील संकटात सापडतात! कोणतेही संकटावर उपाय हा असतोच! इवलीशी मेणबत्ती अंधाराला चिरून टाकते! आपण तर माणसे आहोत!
संकटे आली म्हणून कोणीही कमी होत नसतो! उलट संकटे आपल्याला अधिक मजबूत बनवतात! आपली परीक्षा आहे असे समजा! लोखंडाला हवा तो आकार घेण्यासाठी आगीच्या भट्टीत तावून सुलाखूनच जावे लागते!
रामाला देखील वनवासात जावं लागलेलं! संकटे ही प्रत्येकाच्याच आयुष्यात येतात! त्यामुळे माझ्यासोबतच असं का हा विचार मनातून काढून टाका! त्याच्याशी लढा! संकटांवर तुटून पडा! संकटे संकटात नक्की येतील!
आयुष्य सुंदर आहे! नसेल तर ते बनावता येऊ शकते! आपण सकारात्मक राहिलो तर नक्कीच बदल घडविला जाऊ शकतो! संकटे केवळ आपल्या क्षमतेची चाचणी घेत असतात! संकटे कितीदा आले तरी ते आपल्या फायद्याचेच! आपण स्वतःची सुधारणा करण्याची उत्तम संधी!
त्यामुळे संकटे आली म्हणून किंवा नाही आली म्हणून आयुष्यात स्वतःला सुधारणांनी सुधारा! आयुष्य एकदाच मिळते! हे कधीही विसरू नका! संकटकाळात स्वतःला कधीही कमी समजू नका. मेहनतीवर संपूर्ण लक्ष केंद्रित करा!
कोणताही विजय दैनंदिन केलेल्या श्रमाचे फळ असते व हेच सत्य आहे! जीवनाला आकार देण्यासाठी ही संकटे येतात!
काटकसर खरं तर कठीण गोष्ट आहे. मी बऱ्याच दिवसांपासून ते शिकण्याचा प्रयत्न करतोय. काटकसर म्हणजे कंजुषी नव्हे!
एकदा ‘वीजेची बचत’ नावाचा धडा वडील वाचून दाखवत होते. आमचे छोटे बंधुराज त्यावेळी बाजूला बसून ऐकत होते. त्यावेळी मी तिसरी-चौथीत असेल अन बंधुराज पहिली-दुसरीत!
एकतर बंधुराज एकपाठी! त्यातून बचतीचे महत्व ऐकले! मग काय पुढे उन्हाळ्याच्या सुट्टीत मामा बऱ्याच दिवसांनी आमच्या घरी आलेला. उष्ण वातावरणामुळे तो पंख्याचा वेग वाढवायचा. गप्पा गोष्टी करतांना एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जायचा!
त्याने खोली बदलली की, बंधुराज त्या खोलीतील पंखा बंद करून टाकायचे! असा खेळ बराच वेळ चाललेला! मी व माझ्या वडिलांचे मनोरंजन होत होते. तेंव्हापासून आजपर्यंत टोकाची काटकसर करण्यात साहेब पटाईत आहेत!
पुढे नोकरीसाठी पुण्यात आलो. साधारण पाच एक वर्षात अनुभवाच्या आधारावर पगाराचे आकडे वाढले. लग्नानंतर सुखवस्तू प्रवास सुरु झाला. क्षेत्रातील अनुभवाच्या नऊ वर्षानंतर व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला.
तिथून पुढे खऱ्या अर्थाने काटकसरीचे महत्व लक्षात आले. विचार करा. आपण माध्यम वर्गीय लोक पैसे येण्याआधीच खर्चाच्या योजना आखतो. मग कसे शिल्लक राहतील पैसे?
हा आपला स्वभाव प्रत्येक गोष्टी आहे. खरंच एखाद्या गोष्टीची गरज आहे का हा प्रश्न आपण स्वतःला कधी करत नाही.
कोणत्याही मध्यमवर्गीय व्यक्तीच्या घरी जा. तिथे तुम्हाला जवळपास सर्वच वस्तू आढळतील. त्यातील किती गोष्टी आवश्यक होते? मी टीका करत नाही. मी देखील याच गोष्टीतून गेलेलो आहे.
हवं तर अनुभव म्हणा! सोफा, किचन ट्रॉली! भला मोठा टीव्ही हवाच का? दर दोन चार महिन्यात कपड्यांची खरेदी आवश्यक आहे का? हाहा! असा विचार केला तर निम्याहून अधिक गोष्टी अनावश्यक वाटतील.
हौस करण्यात आपण बराचसा खर्च करतो. मग खर्च वेळेचा असो वा पैशाचा! दोन्हीही एकच! आपण अनावश्यक खर्च करून स्वतःलाच अडचणीत आणतो!
अन ते तेंव्हा लक्षात येते जेंव्हा आपण अडचणीत येतो. त्यामुळे कोणतीही गोष्ट करतांना ‘मला याची खरंच गरज आहे का?’ हा प्रश्न स्वतःला विचारा!
मध्यंतरी उदयनराजे भोसलेंची मुलाखत पाहिली. राजघराण्यातील व्यक्ती! पण फोन पहाल तर फिचर फोन! ह्या गोष्टीतून आपण बराच बोध घेऊ शकतो!
काटकसर ही एक वृत्ती आहे. जी भविष्य उज्वल बनवू शकते!