कॅटेगरी: विचार

सीमाभागातील व्यथा

सीमाभागातील व्यथा ह्या आताच्या नाहीत. प्रश्न आहे तसाच वर्षानुवर्षे ठेवणे. तो चिघळत राहावा अशी योजना करणे आपल्या राजकारण्यांचा आवडता विषय. त्यावर तोडगा निघाला तर नवीन कोणत्या विषयावर राजकारण करायचं असं कदाचित त्यांना वाटत असावे!

राजकारण्यांना तरी का दोष द्यावा? मराठी भाषिकांना आजवर चुकीची माहिती देऊन ते मराठी कसे राहत नाहीत याचाच उद्योग गेली काही शतके केल्याने अनेक प्रश्न नाहक अजूनही सुटलेले नाही! त्यातीलच हा सीमाभागाचा विषय!

कानडी लोकांचा विचित्र स्वभाव. प्रत्येक गोष्ट ओरबाडण्याची सवयीने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. तुळू भाषिकांना संपवण्याचा प्रयत्न असो वा मराठी भाषिकांवर दंडेलशाही! इतकंच काय ह्या स्वभामुळे गोवा, महाराष्ट्र, तामिळनाडू, पूर्वीचा आंध्रप्रदेशसोबत सगळ्यांशी काही ना काही निमित्ताने वाद आहेतच!

इतिहासातही त्यांचे अस्तित्व आदिलशाहीच्या रूपाने होते. परंतु, तोही त्याच्या राज्यकारभार पर्शियन/फारसी भाषेतून हाकत असल्याने एका अर्थाने कानडी त्यांच्या गुलामीतच होते. पुढे त्याचा त्रास इतका वाढला की शिवरायांनी अनेकदा त्यांना आदिलशाही जाचातून त्यांना सोडवले.

पण कृतज्ञ असणे हा कानड्यांच्या स्वभावात नसल्याने त्यांचे पुतळे काढणे. त्याचे विटंबना करणे! स्वतंत्र कन्नडिगा राष्ट्रसारख्या देशद्रोही गोष्टी करणे. त्यांच्याकडून अव्याहतपणे सुरु आहेत. आजचा विषय त्यांच्याशी संबंधित असल्याने त्यांच्या स्वभावाची चर्चा करणे आवश्यक होते.

भाषावार प्रांतरचना करतांना अनेक चुका झाल्या. कदाचित त्या जाणून बुजून केल्या असेही आपण म्हणू शकतो. विशेषतः महाराष्ट्राबाबत उत्तरेच्या बादशाहांच्या द्वेषबाबत काय वर्णावे! त्यामुळे महाराष्ट्रापासून तत्कालीन भारत सरकारने मुंबई, गोवा आणि बेळगाव(सीमाभाग) असे अनेक भाग हेतुपुरस्कर वेगळे काढले.

पुढे संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापना व त्यापुढील शासनाकरवी रक्तरंजित विरोधानंतर मुंबई महाराष्ट्राला जोडणे भाग पडले. कर्नाटकाची स्थापना आधी झाली त्यात चुकून काही मराठी भाग जोडला गेला. तर मग ते दुरुस्ती करण्यास काय हरकत आहे? पण तिथं कानडी स्वभाव नडतो.

जे माझे आहे ते माझेच अन जे दुसऱ्यांचे तेही मला हवं. ह्या कानडी स्वभावामुळे सीमाभागातील मराठी भाषिक गेल्या ६५ वर्षांपासून मरणयातना भोगत आहे! बरं त्यांची मुजोरी इथपर्यंत की, मराठी माणसांवर हल्ले! त्यांचे मानबिंदू असलेले शिवरायांच्या पुतळ्याचा अवमानसोबत भगवा झेंडाही जाळण्यापर्यंत मजल गेली आहे.

आजचीच सकाळ वर्तमानपत्रातील बातमी बघाल तर कर्नाटकचे मुख्यमंत्री शिवरायांच्या पुतळ्याची अवहेलना म्हणजे शुल्लक बाब म्हणत आहेत! एकूणच हा विषय कानडी स्वभावामुळे कठीण बनलेला असून जोवर सर्व मराठी भाषिक आपल्या हक्कासाठी जागृत होत नाहीत तोवर सीमाभागातील व्यथा थांबणार नाही!!

मराठी कालगणना

मराठी कालगणना पुन्हा वापरात आणणे आवश्यक आहे. आपण मराठी आहोत. आणि आपली संस्कृती मराठी आहे. पण आपण आपली संस्कृती खऱ्या अर्थाने पाळतो का?

गंमत वाटेल पण, आपण जन्माने मराठी आहोत अन कर्माने अमराठी. आता ह्याला आपण जबाबदार आहोत असं मला म्हणायचं नाही. मला असं म्हणायचं आहे की, आजूबाजूच्या वातावरणामुळे आपण नकळत काळे ब्रिटिश झालो आहोत.

साधं कालगणनेच पहा ना. आज आपल्याला आपले महिने माहित नाही. न दिनांक! आपण जी दिनदर्शिका पाळतो ती अमराठी संस्कृतीची आहे. बरं आपली अचूक कालगणना सोडून जगाच्या बरोबर राहण्याच्या नादात आपण आपली प्राचीन कालगणना विसरून गेलो आहोत.

गुढीपाडवा हा आपल्या वर्षाचा पहिला दिवस. त्या दिवशी निसर्गाला नवीन पालवी फुटते! याच काळात फळांच्या राज्यच, आंब्याचं आगमन होत. याचा अर्थ निसर्गानुरूप आपली कालगणना आहे.

बरं, पृथ्वीच्या सूर्याभोवती आणि स्वतःभोवती फिरण्याच्या गतीवर आपण सर्व मनुष्यांनी आपली कालगणना ठरवली. स्वतःभोवती फिरण्यासाठी पृथ्वीला साधारणपणे २४ तास लागतात. बरं अचूक काढायला गेल्यास काही क्षणांचा फरक पडतो. हेच क्षण पुढे तास आणि दिवसांमध्ये वाढत जातात आणि ते सामावण्यासाठी अमराठी कालगणनेत दर तीन वर्षांनी काही दिवस वाढवले जातात.

सोप्या भाषेत, दिवस आणि रात्र ह्यात बदल होत असतात. त्याप्रमाणे न आपली घड्याळे चालतात न कालगणना! मराठी कालगणनेत सूर्य उगवल्यावर दिवस सुरु होतो. आणि मावळल्यावर रात्र! अमराठी कालगणनेत रात्री बारालाच दिवस सुरु होतो. इतकी अचूक कालगणना आपण आपलीच स्वीकारायला हवी!

आपले उत्सव आपली मराठी कालगणना स्वीकारतात. अन नेहमी गणपती उत्सवात हत्ती नक्षत्राच्या रूपाने निसर्ग धो धो जलधारा आसमंतातून कोसळतात. इतकी निसर्गानुरूप कालगणना क्वचितच दुसरी सापडेल!

जगात चिनी, इजिप्त, ज्यू, ग्रीक, रोमन, मध्य अमेरिका, ख्रिस्ती, मराठी(भारतीय) अशा अनेक कालगणना आहेत. आपल्याला व निसर्गाला पूरक गणना म्हणजे मराठी कालगणना. त्याचा आपण सणांसोबत दैनंदिन जीवनातही वापर व्हावा.

आपल्या महाराष्ट्रात आठवडी वेतन पद्धती होती. सात दिवसांचा आठवडा अशी सरळ मांडणी. ब्रिटिशांनी मासिक वेतन सुरु केले. एका वर्षात ५२ आठवडे असतात. प्रत्येक महिना चार आठवड्यांमध्ये विभागणी केल्यास १३ महिने होतात. पण ग्रेगोरियन कालगणनेत बाराच महिने असतात. सोप्या शब्दात तुम्ही १३ महिन्यांच्या बदल्यात १२ महिन्याचं वेतन घेता.

बक्षीस म्हणून जे दिवाळीत वेतन मिळते. ते बक्षीस नसून ते तेराव्या महिन्याचं वेतन आहे. आता हेही अधिकृत करून घेण्यामागे एका मराठी माणसाचाच हात आहे. आता मराठी कालगणना पुन्हा सर्वत्र करायची झाल्यास आधी स्वतःपासून ती वापरात आणणे आवश्यक आहे.

व्यक्तीपासून समाज आणि समाजापासून देश अन पुढे जग ते स्वीकारेल. त्यामुळे ह्या बदलासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवे इतकीच विनंती!!

राक्षसेंद्र

राक्षसेंद्र पेक्षा अन्य वाईट शब्द सुचेना म्हणून वापरला. मृत्यूयुग वाटावे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा जगातील सर्वाधिक मोठा फटका हा निःसंशय भारताला बसलेला आहे. शक्यतो मी ह्या विषयावर बोलायचे टाळतो. पण जिथं दिवसाला चार चार हजार लोक एका साथीच्या रोगाने मरत आहेत. तिथं हा विषय कसा टाळता येणार?

नियोजनशून्य अन कमालीचे बौद्धिक दारिद्रय असलेले देशाचे राजकीय नेतृत्व भारताला लाभल्याने ह्यापेक्षा वेगळे परिणाम होण्याची शक्यताही नव्हती. देशात राक्षसेंद्र आमच्या राज्यात उद्धवेन्द्र अन उत्तर भारतात योगिंद्र असे महान दिग्गज नेते. नियोजन म्हणजे टाळेबंदी हीच काय ते आमच्या सरकारची बौद्धिक मजल! बरं टीकेचाही तिटकारा यावा इतकी भयाण परिस्थती निर्माण करून ठेवलेली आहे.

राष्ट्रीय लसीकरण शक्य नाही पण आणीबाणीच्या काळात सरकारकडे नवीन दरबार (सेंट्रल व्हिस्टा) बांधायला पैसा आहे. सैन्य आर्थिक अडचणीत आलंय! भाड्याने शस्त्रास्त्रे अन उपकरणे घेऊन देशाची रक्षण करण्याची त्यांच्यावर वेळ आलेली आहे. पण आम्हाला काय आम्ही दाढी वाढवणार थाळ्या अन ताट बडवणार!

कोरोना स्वतः आलेला नाही! त्याला आमच्या राक्षसेंद्रने नियोजनशून्य कारभाराने आणलाय व त्याने तळ ठोकलाय! सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर काय बोलायचे? मुळात ती भारतात अस्तित्वातच नाही. ती सुधारणे आमच्याच्याने शक्य नाही. अन असती तरी आमच्या सांघिक सरकारने ती विकून टाकली असती किंवा अदानी अंबानीला एका रात्रीत भाड्याने दिली असती.

नोटबंदी वाईट वाटली. त्याहून भयानक टाळेबंदी निघाली. महाभयानक तर नियोजनशून्य सरकारची बौद्धिक दिवाळखोरी वाटत आहे. सगळा दोष जनतेला देऊन काय साध्य होणार? प्राणवायू/ऑक्सिजन संपणे. सैन्याला आर्थिक चणचण निर्माण होणे. पेट्रोल, डिझेल, गॅस अन खाद्यतेलाच्या किमती तर त्यांच्या हातात नाहीत ना!

आज दुपारी एका आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीवर एक परकीय देशाची महिला, जगाला कोरोनाची लस पुरवणारा देश स्वतःच्या नागरिकांना पुरवू शकत नाही ही शोकांतिका आहे असं म्हणत होती. काय खोटं आहे? स्वतःच घर आगीने वेढलेलं असतांना बाजूच्या घराची आग विझवण्यासाठी धडपडण्यात कसलं आलंय डोंबल्याच विश्वगुरूपणा? हा तर निव्वळ मूर्खपणा आहे!

मी मान्य करतो ह्यात एकट्या(?) सरकारचा सगळा दोष नाही. पण यश मिळालं तर बोक्यांप्रमाणे भांडणारी ही मनपा/राज्य/सांघिक सरकारे अपयश आल्यावर बिनदिक्तपणे जनतेवर ढकलून मोकळी होतात. हेही चुकीचं आहे.

जगभरात अनेक देशांनी टाळेबंदी केली. पण त्यांनी त्यांच्या नागरिकांना पोसले. प्रत्यक्ष आर्थिक भार उचलला! अमेरिकेचे सरकारने साधे ब्रॉडबँडचे बिल देण्यासाठी भत्ते दिले. इंग्लंडच्या सरकारने पगाराच्या ८०% आर्थिक साहाय्य केले. अन आमच्या राज्य सरकार असो वा सांघिक सरकार इंधन, वीज बिलाच्या किंमती तिप्पट करून जनतेला वेठीस धरले. माल्या सारख्या धनाढ्यांचे कर्ज माफ करणारे सर्वोच्च न्यायालयात प्रामाणिक जनतेला आर्थिक दिलासा देण्याची खोटी देखील वचने देत नाहीत.

हे सगळं सहन होण्यापलीकडचे आहे.

मराठी भाषा दिन अन मराठी भाषिक

मराठी भाषा दिन जसजसा जवळ येतो तस तसा अनेकांना मराठीचा उमाळा येतो. अन मग मराठी भाषिकांचे मराठीवर कसे प्रेम नाही. मराठी भाषिक कसा अप्पलपोटी अन मराठी शाळांमध्ये कसा आपल्या पाल्याला टाकत नाही वगैरे तत्वज्ञान झोडतील! हे दरवर्षीचे अन एका दिवसापुरते! पुढे हेच तज्ञ वर्षभर गायब असतात!

साधारण एका तपापासून मी मराठीची सेवा करतो आहे! ते करतांना अनेक गोष्टी अन बाबी लक्षात आल्या त्यावर मत मांडावे त्यासाठी हा लेखनप्रपंच! एखाद्या मराठी माणसाला पाकिस्तान अन चीनचे नाव काढले तर तरी तो चिडतो! त्यांना संपवण्याची भाषा करतो! याउलट तुम्ही अमराठी भाषिकाला तोच विषय काढा तो म्हणेल ते जाऊदे! आपलं काम बघ! थोडक्यात, मराठी भाषिक व्यक्ती हा देशभक्त असतो. देशप्रेम त्याच्या ओतप्रोत भरलेलं असतं!

मराठी भाषेची वस्तुस्थिती पाहिली तर मराठी भाषा कमी होत नसून ती वाढत आहे! देशात ती चौथ्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर पोहचली आहे. हिंदी भाषेच्या सरकारी आक्रमणाने गेल्या सत्तर वर्षात दोनशे वर्षे वय देखील नसलेली हिंदीचा वारू देशभर अक्षरशः उधळलेला आहे! त्या भाषेखेरीज अन्य कोणतीही भाषा इतक्या वेगाने वाढत नाही! उलट गेल्या सत्तर वर्षात २२० भारतीय भाषा त्यामुळे मृत झालेल्या आहेत!

त्यातल्या त्यात हिंदी खेरीज अन्य भारतीय भाषांचा विचार केल्यास मराठीची चांगली परिस्थिती आहे! इतकी चांगली म्हणावी की आभासी जगात तिने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे! गेल्या काही वर्षातील आपण आकडेवारी चालली तर आपल्या असं स्पष्ट लक्षात येईल की ती वाढत आहे! त्यामुळे मराठी वाचवा असं म्हणण्याऐवजी ती वाढवा असं म्हणले तर वावगं ठरणार नाही!

बरं हे झालं आभासी जगाचं (डिजिटल विश्वाचं) वस्तुस्थितीत काय परिस्थिती आहे हे आपण जाणून घ्येण्याचा प्रयत्न केल्यास महाराष्ट्रात साधारण दोन लाख शालेय संस्था आहेत! त्यापैकी सत्तर हजारी संस्था ह्या शासकीय आहेत! आता २००९ सालचे शासकीय परिपत्रक पाहिल्यास आपल्याला संपूर्ण विषय लक्षात येईल! शासनाने ठरवून शासकीय मराठी माध्यमांच्या शाळा बंद पाडण्याचा अफझली विडा उचललेला आहे.

त्यापुढे जाऊन गेल्या फडणवीस सरकारने शाळा बंद पाडण्याचे लक्ष वगैरे ठेवले! मग प्रत्यक्ष बंद करता येत नाही म्हणून संख्या कमी आहे म्हणून वर्ग बंद करणे. नवीन शिक्षणाच्या नियुक्त्या रोखणे. निधी न देणे. शासन व्यवहारात नियमबाह्यपणे इंग्रजीचा सर्रास वापर करणे असे नानाविविध क्ल्युप्त्या केल्या गेल्या! तशी माहिती जुनी आहे परंतु शासनाच्या १३ हजाराहून अधिक वर्गखोल्या निधीअभावी बंद करण्याचा पराक्रम राज्य सरकारने केलेला!

सोबत गेल्या तपापासून मागेल त्या इंग्रजी शाळांना मान्यता अन मराठी माध्यमांच्या शाळांना झुलवत ठेऊन त्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळा बनवण्यास भाग पाडले गेले! हे आरोप नसून वस्तुस्थिती आहे! अन दुसरीकडून हेच राष्ट्रीय पक्षांचे नेते मराठी भाषिक मराठी माध्यमांमध्ये आपल्या पाल्याला टाकत नाहीत अशी ओरड करतांना दिसतात!

शासकीय मराठी शाळांची दुरावस्था काय नव्याने सांगायची? शिक्षकांची कमतरता आहेच सोबत निधी अभावी इमारतींची दुरावस्था झाली आहे! स्वच्छतागृह अस्वच्छ आहेत! छप्पर कधी कोसळेल याचीही शाश्वती नाही! मग ते आपल्या पिल्लांसाठी जीवाचा धोका का पत्कारातील? सांगा ना यात मराठी भाषिक कुठं चुकतो?

बरं आधी संस्कृत म्हणजे देवभाषा म्हणून मराठीला दुय्यम स्थान दिले! अन आता इंग्रजी म्हणजे वाघिणीचे दूध वगैरे म्हणाले! खरं तर ज्यांना महाराष्ट्राच्या कड्या कपाऱ्यात अन दऱ्या खोऱ्यात निर्माण झालेली मराठी संस्कृतीचा अन महाराष्ट्राचा इतिहास माहीत नाहीत तेच हीच भाषा बोलतात! इंग्रजी चांगली म्हणजे नोकरी पक्की ह्या दूधखुळ्या प्रचाराने अनेकांनी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये टाकले! परंतु त्याचा फोलपणा लक्षात आल्यावर आपल्या पाल्याला चांगल्या मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये पुन्हा दाखल केले!

सरकारच्या आकडेवारीनुसार पावणे तीन लक्ष पालकांनी इंग्रजीतून मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश केलेला आहे! ह्या गोष्टी काय दर्शवतात? मराठी भाषिकांवर पिढ्यानपिढ्या खोट्या प्रचाराने गुंगवून आता त्यालाच दोष देता! बर मराठी माणूस आळशी वगैरे देणारी जमातही हेच उगाळत असते!

गेल्या अडीच हजार वर्षांचा ज्ञात इतिहास चाळला तर आपल्याला असं स्पष्ट लक्षात येईल की मराठी भाषिक हे अजेय आहेत! जिथं देशावर हजार वर्षांची परकीयांची गुलामी सहन करण्याची वेळ आली तिथं महाराष्ट्राने केवळ ४५० वर्षांची गुलामी सहन केली! जेंव्हा अन्य लोक झाडपाला गुंढाळून कंदमुळे शोधात रानावनात भटकत होती त्यावेळी महाराष्ट्र तत्कालीन रोमशी सागरी मार्गाने आंतरराष्ट्रीय व्यापार करीत होता!

मराठी भाषिक राज्ये दक्षिणाधिपती बिरुद लावायची! अगदी तीनशे वर्षाहून अधिक मुघलांचे साम्राज्य मराठी भाषिकांनी संपवले! अन आताच्या भारताच्या भूमी इतक्या भूभाग हिंदवी स्वराज्यात आणला! जगातील सर्वाधिक किल्ले/गड अन लेण्या महाराष्ट्रात आहेत! भारताचे नाविक दल देखील मराठी भाषिकांची देणं! आजही गुन्हेगारी अन प्रजननदर सोडल्यास सर्वच क्षेत्रात मराठी भाषिकांचा महाराष्ट्र उर्वरित देशाशी स्पर्धा करतो! अनेक क्षेत्रात दुसऱ्या क्रमांकाची राज्ये महाराष्ट्राच्या निम्मी देखील नाहीत! मग मराठी माणूस कोणत्या क्षेत्रात मागे आहे?

चाळीस वर्षे मराठ्यांशी लढल्यानंतर ब्रिटिशांना भारतावर एकछत्री अंमल करता आला! लक्षात घ्या, ब्रिटिशांच्या आधी मराठीचे ह्या देशाचे सम्राट होते! त्या ब्रिटिशांनी हुशारीने मराठी भाषिकांमध्ये न्यूनगंड पसरवले! अन तेच न्यूनगंड आजही काळे इंग्रज पसरवत राहतात! कोणतीही वस्तुस्थिती न पाहता भ्रम पसरवणे हा इतरांसाठी नव्हे तर स्वतःसाठी देखील एक धोका आहे!

आजचा मराठी भाषिकांचा महाराष्ट्र भारतीय सैन्याला लागणाऱ्या शस्त्रांची निर्मितीत खूप पुढे आहे! सैन्यदलातील एकूण शस्त्रांपैकी २५% शस्त्र ही महाराष्ट्रात बनलेली आहे! भविष्यात हा आकडा ह्याहून अधिक वाढेल! कोरोनाची लस असो वा सुपर कॉम्प्युटर मेड इन महाराष्ट्र आहेत!

गेल्या दशकाच्या जनगणनेनुसार मराठी भाषा चौथ्या स्थावरून तिसऱ्या स्थानावर आली! जगातील ७८+ देशांमध्ये मराठी भाषा बोलली जाते! काही देशांमध्ये मराठी शाळा आहेत तर काही देशांमध्ये विद्यापीठात मराठी शिकवली जाते! मग मराठी भाषा कुठं कमी होतेय? वा मराठी भाषिक कसा गुन्हेगार ठरतो हेच कळत नाही! माझ्यामते मराठी भाषेचे व मराठी भाषिकांचे भविष्य उज्वल आहे! आज मातृभाषिकांच्या संख्येचा विचार केल्यास जगात सहा हजार भाषांपैकी दहाव्या क्रमांकाची मराठी भाषा आहे! कृत्रिम शासकीय निधीवर न वाढता नैसर्गिक वाढ हीच मराठीची शक्ती आहे!

तरी सर्व एक दिवसाचा मराठीपणा आणणाऱ्या पर्शियन अन खडीबोलीच्या कलमी हिंदी भाषेच्या गुलामांनी तसेच काळ्या ब्रिटिशांनी प्राचीन मराठी भाषेची चिंता करणे सोडावे!

प्रदूषण

प्रदूषण खरं तर शालेय जीवनापासून एक रटाळ विषय! त्यावर पुन्हा काय बोलायचं? पण त्याचे आपल्या दैनंदिन जीवनावर फार मोठा परिणाम होतो. हे मी अनुभवाने सांगत आहे!

फार काय बोलायचं! पाच एक वर्षांपूर्वीपर्यंत पुण्यात फिरतांना फक्त ऊन जाणवायचं! आता त्यासोबत धूर आणि धूळ जाणवते! सर्वेक्षणाअंती सर्व पुणेकर दिवसाला पाच सिगारेट ओढल्यावर जमा होईल इतका धूर घेतात असं निरीक्षण प्रसिद्ध झालेले आहे. एकूणच सर्वत्र कमी अधिक प्रमाणात हे स्पष्टपणे दिसत आहे!

जागतिक तापमानात लक्षणीय बदल होत आहेत हे सर्वांनाच माहिती आहे. परंतु, आपण सर्वांनी कधी आपल्याकडे पावसाळ्याचे निरीक्षण केले आहे का? शालेय जीवनात जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर म्हणजे पावसाळा हे आपण शिकलो! पण आजकाल निरीक्षण केले तर लक्षात येईल की, जूनमध्ये पावसाची शाश्वती नसते! अन गेल्यावर्षी तर तो डिसेंबरपर्यंत थांबलेला!

हे सगळं नैसर्गीक बदल आपल्या आयुष्यातील अनेक दृश्य अदृश्य बदल घडवतात! याची कारणे अन उपाय सांगण्याइतपत मी मोठा नाही. परंतु, प्रदूषणामुळे आपले जीवनमान धोक्यात येत आहे. अन आता कृती करण्याची गरज आहे इतकं नक्की.

अनेक मोठमोठी आस्थापने आपले ऊर्जेची गरज सूर्याच्या उर्जेवर भागवत आहेत. हे सकारात्मक असून यातून चांगल्या गोष्टी नक्कीच घडतील! पृथ्वी आणि शुक्र हे दोन्ही आकाराने समसमान! एकाच वेळी उत्पन्न झालेले! परंतु तिकडचे हवामान इतके भीषण आहे की तिकडे सजीवसृष्टी निर्माणच झाली नाही.

प्रचंड कार्बन डायॉक्साइड अन ७३० अंश सेल्सिअस तापमानमुळे ते सर्वार्थाने नरक बनलेलं आहे. सांगण्याचा हेतू इतकाच की आपण पृथ्वीचा शुक्र बनवण्याचे उद्योग सुरु केलेले आहेत! ते वेळीच थांबवणे आवश्यक आहे. तर अशा रटाळ परंतु महत्वाच्या विषयावर आपण नक्कीच काहीतरी सुधारणा करूयात! कृतिविण वाचाळता व्यर्थ आहे!

त्यामुळे आपण जोपर्यंत प्रत्यक्षात कृती करीत नाही तोवर यात बदल घडणे अशक्य आहे! त्यासाठी आता आपण शक्य तेवढे व आवश्यक प्रदूषण करणाऱ्या गोष्टींचा वापर करणे अनिवार्य आहे. त्यासोबतच आपल्याला प्रदूषण कमी करणाऱ्या निसर्गाची पुन्हा उपासना करणे देखील गरजेचे आहे. नाहीतर हौशी वजन कमी करणाऱ्या परंतु, खाण्यावर नियंत्रण नसलेल्या लोकांप्रमाणे होईल!

उरतो मुद्दा याची सुरवात कोणी करायची अन कधी करायची! तर माझ्या आजवरचा अनुभवानुसार कशासाठी आपल्याला पटणाऱ्या गोष्टींच्या अनुकरणासाठी इतरांची वाट पाहायची? तर सुरवात करूयात!!

कोरोनापेक्षा टाळेबंदी वाईट

कोरोनापेक्षा टाळेबंदी वाईट! अन हेच सत्य आहे! हो मी आजच्या केंद्र सरकारच्या एकूणच संवेदना शून्य दिशाहीन हुकूमशाही कारभार बद्दल बोलत आहे. टाळेबंदी ज्या लोकांसाठी केली त्यांचेच जीव ह्या टाळेबंदीमुळे जाणार असतील तर कोरोनापेक्षा टाळेबंदी वाईट!

खरं तर राजकीय विषयावर बोलून आपल्याकडे काडीमात्रही फरक पडत नाही! परंतु तरीही ह्या निर्जीव अन निद्रिस्त समाजाला सांगण्यासाठी नव्हे तर मनाची घुसमट बाहेर काढण्यासाठी आजचा लेखनाचा प्रपंच करीत आहे!

देश अन प्रशासन स्वतः जनतेवर राज्य करण्यासाठीच जन्माला आलेल्या आहेत असा समज व्हावा अशी परिस्थिती आहे! हा अजस्त्र प्रशासनाचा नेमका उपयोग तरी काय असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे! साधारण दोन महिन्यांपासून सगळा देश घरात खितपत पडलेला आहे. ह्या देशाचे शेवटची व महत्वाचा घटक म्हणजे श्रमिक वर्ग आज जगण्यासाठी स्वगृही जाण्यासाठी मरायालाही तयार झालेला आहे!

कोणत्याही हुकूमशाही देशात नसेल एवढी अनागोंदी आज देशात सुरु असून नियोजनशून्यतेचा मूर्तिमंत पुतळा म्हणून आजच्या केंद्र सरकारला आपण म्हणू शकतो. बांगलादेश सारख्या अविकसित देशाने टाळेबंदी करण्याआधी लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी वेळ दिला! हे आपल्या सरकारला करणे अशक्य होत?

आज मजूर असोत वा टाळेबंदीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे मरणाऱ्यांचे सारे श्रेय ह्या केंद्र सरकारचे आहे! काय साधलं ह्याने? लोकांचे जीव वाचवण्यासाठी टाळेबंदी होती की मारण्यासाठी! बरं माझ्यासारखे जे आज नियम पाळून घरी बसलेले आहेत त्यांच्या प्रश्नावर बोलायचे झाल्यास अनेक कंगोरे बाहेर येतील!

सगळी कामे ठप्प आहेत! नावापैसा म्हणून कुणाकडे नाही! मी मध्यमवर्गीय जातीविषयी बोलतो आहे! ज्यांचे पोट हातावर आहेत त्याचे जीवन अत्यंत खडतर झाले आहे! केंद्राच्या अन रिझर्व्ह बँकेच्या मंजुरीशिवाय अतार्किक अन मूळ मुद्दलात वाढवण्याचा अधिकार थोडक्यात ‘अधिस्थगन'(moratorium) करून अक्षरशः टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार केला आहे!

ज्या ट्रम्पला आपण मूर्ख म्हणून हिणवतो त्याने त्या अमेरिकेत टाळेबंदीच्या काळात ज्यांचे रोजगार गेले. ज्यांना रोजगार नाहीत, अशांना मासिक १२०० डॉलर भत्ता त्याने सुरु केला आहे. इंग्लड तर त्याहून पुढे असून जाहीर केलेल्या उत्पन्नाच्या ८०% रक्कम ते जमा करीत आहे! आपल्या सरकारला केवळ कर्जबाजारी राष्ट्र बनवण्यात रस आहे!

केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या एकूणच वीस लाख कोटींच्या गप्पांच्या मागील गोष्टी पाहिल्या तर सहज लक्षात येईल की हा केवळ एका खिशातून दुसऱ्या खिशात पैसे टाकण्याचा विषय आहे! एक देश म्हणून सरकार आपल्या लबाड्या करणे कधी बंद करणार देव जाणे!

आपल्या सरकारकडे पैसे नाहीत म्हणावे तर जागतिक बँकेने व जागतिक आरोग्य संघटनेने केलेली मदत पाहिली तर डोळे विस्फारणारी आहे! पण त्यातील एक कवडीदेखील महाराष्ट्र राज्याला मिळाली नाही! असाही केंद्राला महाराष्ट्र भारताचा भाग वाटतो का हाच संशोधाचा विषय आहे! परंतु, त्यावर तूर्तास चर्चा नको!

मुद्दा इतकाच की ज्या देशात दिवसाला ७३०० हुन अधिक जण क्षय रोगाने, ३१७८+ कर्करोगाने, ४१० हुन अधिक रस्ते अपघातात बळी जातात. त्याने कोरोनासाठी अख्खा देश वेठीस धरावा हा निव्वळ हास्यास्पद प्रकार आहे! बाकी आपण सुज्ञच!!

मध्यमवर्गीय

जगातील सर्वात तुच्छ जीव म्हणजे मध्यमवर्गीय. हा तुच्छ जीव पूर्वी चाळीचाळीत सापडायचा. आता गृहसंकुलात सापडतो. ह्या जीवाची घाणेरडी सवय म्हणजे हा जीव आपल्या अडचणींना आपले भाग्य समजतो!

ह्या जीवाची लक्षणे सहजगत्या लक्षात येतील. ह्याच्या खात्यात चुकूनही सरकार पैसे जमा करीत नाही. अन ना ह्याचे गृहकर्जाचे वा वाहनकर्जाचे हप्ते माफ होतात. तरीही हा जीव सरकारच्या प्रत्येक गोष्टीचे नेटाने समर्थन करतो.

शेतकरी निदान आपल्या हक्कासाठी भांडतो. परंतु, हा मध्यमवर्गीय जीव रस्त्यावर उतरण्याला अन आपले प्रश्न मांडायला तयार नसतो. त्यावर कितीही संकट येऊ दे! अगदी बँकेनं घराबाहेर जरी काढलं तरी हा नशीबच फुटकं म्हणून त्याला दोष देईल!

कायदा मोडणं वा वाकवणे उच्चभृ जमातीला सहजशक्य! पण हा कायदे पाळणार अन पाळा असा जगाला सल्ला देणार! पाहायला गेलं तर त्याच न उच्चभ्रू ऐकतो न गरीब! प्रशासन तर ह्याला रोजच लुबाडतो! तरीही हा नशिबात आहे म्हणून शांत!

भांडण तंटे करायला आपल्याला वेळ आहे का? नोकरी गेली तर? अशा विचारांचा हा भाबडा जीव! ह्याला फक्त मानवाची उत्क्रांती माहिती! जीवनात कुणी क्रांती आणलीच तर ते बायकोच्या नावापलीकडे काहीही नसते!

कितीही चुकीची गोष्ट घडो! अगदी समोर घडली वा खुद्द त्याच्या बाबतीत जरी घडली तरीही हा जीव ‘आपल्याला कुणाशी वैर करायचं नाही’ ह्या उदात्त हेतूने सोडून देतो.

ह्या जीवाच्या ह्या वृत्तीमुळे धनाढ्य महाधनाढ्य अन टवाळखोर नेता बनतो! मग कर्जबुडव्यांची अब्जावधींची कर्जमाफीचे निर्णय सहजगत्या होतात. अन बँका त्याची डोळ्यादेखत लूट करतात! पण हा तरीही शांत!

असा जीव पृथ्वीवर मोठ्या प्रमाणावर आढळत असला तरी निरुद्रवी असल्याने ह्याची कुणाला भीती नाही! ह्या जीवाशी साधर्म्य असणारे अजून एक जीव पृथ्वीवर आहे अन तो म्हणजे गांडूळ! ह्या गांडूळांना तुम्ही कितीही डिवचा पण हे कैवल्याचे अवतार.

हा जीव जोपर्यंत आपला मूळ स्वभाव बदलत नाही तोवर न त्यांच्या आयुष्यात न पृथ्वीच्या भूभागावर कोणताही बदल घडेल! बहुदा अन्न साखळीतील हा जीव दुसऱ्यासाठी भक्षणाचे अवीट भक्ष्य असण्याची शक्यता. बँका, प्रशासन, राजकारण्यांसाठी तर हा जीव म्हणजे मेजवानीच!

कशाला नसत्या फंदात पडायचं? कशाला धोपट मार्ग सोडायचा? कुणाशीही वाईटपणा घ्यायचा नाही अशा महान विचारांमुळे ह्या जीवात काही बदल घडेल अशी तूर्तास शक्यता नाही! अन जर बदल घडलाच तर तो ह्या गटात मोडणारही नाही!!

एक देश एक भाषा संकल्पना

एक देश एक भाषा संकल्पना ही मुळातच भारतीय नाही. एका जर्मन तत्वज्ञ जोहान गोटलिब सतराव्या शतकात मांडली. व तिला अधिकृत स्वरूप मिळवून दिले.
दुवा- https://babelzine.co.uk/wp-content/uploads/2018/11/No25-Article-Language-and-nationalism.pdf

(more…)

दुष्काळ राजकीय इच्छाशक्तीचा

खरा दुष्काळ राजकीय इच्छाशक्तीचा आहे. सोपं उदाहरण देतो. २००८ साली मुंबई हल्ला झाला. भयंकर चर्चा झाली. अनेकजण मारले गेले. त्यात पोलीस देखील होते.

बरीच खलबते झाल्यावर मुंबई पोलिसांना बुलेटप्रूफ जॅकेट का नाहीत याबाबत विचारणा झाली. आज अकरा वर्षे उलटून देखील मुंबई पोलिसांना बुलेटप्रूफ जॅकेट नाहीत.

अकरा वर्षात सत्तांतर झाले पण मानसिकता तीच. काय अडचण आहे? जॅकेटची किंमत रफाएल विमानांपेक्षा अधिक आहेत का?

बुलेटट्रेनसाठी ८८ हजार कोटींचे कर्जे घेतली. हजारो चौरस किमीचे जंगल उद्धवस्त केले. पुतळ्यासाठी ३००० कोटी रुपये उभे केले जाऊ शकतात. पण बुलेटप्रूफ जॅकेटसाठी शून्य!

सैनिकांच्या बाबतीतही तेच! त्या पुलवामाच्या हल्ल्याआधी गुप्तहेर खात्याने इशारा दिलेला! पण ज्या देशात पंतप्रधानांच्या हौशेखातर विमान खरेदी केले जाऊ शकते तिथे सैनिकांना कसला मान अन कसला जीव!

सैन्याला विमानाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायला काहीच अशक्य नाही. अडचण आहे ती राजकीय इच्छाशक्तीची!

चाळीस सैनिक ठार झाले! त्यांचे दुःख सोडा त्यांच्या हौतात्म्याचा वापर करून घेतला ह्या निर्ढावलेल्या सत्ताधाऱ्यांनी!

देशातील दरवर्षी किमान ४०% भूभाग हा दुष्काळग्रस्त असतो. ६८% भूभाग हा दुष्काळप्रवण क्षेत्र म्हणून देखील चिन्हांकित केला गेला आहे.

पण गेल्या पाच वर्षांत किती धरण बांधली? उत्तर एक असे आहे! गेल्या पाच वर्षात आठ कोटींनी देशातील लोकसंख्येत वाढ झाली अन त्यांच्या तहान भागवण्यासाठी एक प्रकल्प केला!

मुळात देशातील पाणीप्रश्न निव्वळ सत्ताधाऱ्यांनी दाखवलेल्या उदासीनतेमुळे आहे. हाच काय अनेक गोष्टी केवळ राजकीय इच्छाशक्तीच्या अभावाने होत नाहीत.

मग ते सरकारी आरोग्य व्यवस्था असो वा रस्त्यांचे जाळे. बेरोजगारीवर तर न बोललेलं बर! सरकारी बँका बुडवण्याचा चंगच सरकारने बांधला आहे की काय अशी शंका यावी अशी परिस्थिती निर्माण केली आहे.

हे प्रश्न राजकीय इच्छाशक्ती नसल्याचे द्योतक आहे. हा इच्छाशक्तीचा दुष्काळ कधी संपणार देव जाणे. देवावरून आठवलं! आमचे लाडके मुख्यमंत्री पाणीप्रश्न सोडवण्यासाठी उज्जेनला गेले आहेत.

जर उज्जेन पाणीप्रश्न सोडवू शकले असते तर मध्यप्रदेशात आजमातीला ४००० गावे दुष्काळग्रस्त का घोषित झाली असती!

सर्व प्रश्न सुटू शकतात. निव्वळ राजकीय इच्छाशक्ती हवी! पैसा उभा केला जाऊ शकतो. कधीकाळी पुणे ते मुंबई प्रवास करण्यासाठी सहा सात तास लागायचे! स्वर्गीय बाळासाहेबांनी इच्छाशक्ती बोलून दाखवली.

अन तत्कालीन बांधकाम मंत्री नितीन गडकरी साहेबांनी द्रुतगती महामार्गाचा प्रकल्प एकहाती पूर्ण केला. तेही सरकारी पैसे न वापरता! म्हणूनच म्हणतो राजकीय इच्छाशक्तीचा दुष्काळ मिटायला हवा!

ऑडिओ ब्लॉग:

आवाजामध्ये नोंद ऐका

काटकसर

काटकसर खरं तर कठीण गोष्ट आहे. मी बऱ्याच दिवसांपासून ते शिकण्याचा प्रयत्न करतोय. काटकसर म्हणजे कंजुषी नव्हे!

एकदा ‘वीजेची बचत’ नावाचा धडा वडील वाचून दाखवत होते. आमचे छोटे बंधुराज त्यावेळी बाजूला बसून ऐकत होते. त्यावेळी मी तिसरी-चौथीत असेल अन बंधुराज पहिली-दुसरीत!

एकतर बंधुराज एकपाठी! त्यातून बचतीचे महत्व ऐकले! मग काय पुढे उन्हाळ्याच्या सुट्टीत मामा बऱ्याच दिवसांनी आमच्या घरी आलेला. उष्ण वातावरणामुळे तो पंख्याचा वेग वाढवायचा. गप्पा गोष्टी करतांना एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जायचा!

त्याने खोली बदलली की, बंधुराज त्या खोलीतील पंखा बंद करून टाकायचे! असा खेळ बराच वेळ चाललेला! मी व माझ्या वडिलांचे मनोरंजन होत होते. तेंव्हापासून आजपर्यंत टोकाची काटकसर करण्यात साहेब पटाईत आहेत!

पुढे नोकरीसाठी पुण्यात आलो. साधारण पाच एक वर्षात अनुभवाच्या आधारावर पगाराचे आकडे वाढले. लग्नानंतर सुखवस्तू प्रवास सुरु झाला. क्षेत्रातील अनुभवाच्या नऊ वर्षानंतर व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला.

तिथून पुढे खऱ्या अर्थाने काटकसरीचे महत्व लक्षात आले. विचार करा. आपण माध्यम वर्गीय लोक पैसे येण्याआधीच खर्चाच्या योजना आखतो. मग कसे शिल्लक राहतील पैसे?

हा आपला स्वभाव प्रत्येक गोष्टी आहे. खरंच एखाद्या गोष्टीची गरज आहे का हा प्रश्न आपण स्वतःला कधी करत नाही.

कोणत्याही मध्यमवर्गीय व्यक्तीच्या घरी जा. तिथे तुम्हाला जवळपास सर्वच वस्तू आढळतील. त्यातील किती गोष्टी आवश्यक होते? मी टीका करत नाही. मी देखील याच गोष्टीतून गेलेलो आहे.

हवं तर अनुभव म्हणा! सोफा, किचन ट्रॉली! भला मोठा टीव्ही हवाच का? दर दोन चार महिन्यात कपड्यांची खरेदी आवश्यक आहे का? हाहा! असा विचार केला तर निम्याहून अधिक गोष्टी अनावश्यक वाटतील.

हौस करण्यात आपण बराचसा खर्च करतो. मग खर्च वेळेचा असो वा पैशाचा! दोन्हीही एकच! आपण अनावश्यक खर्च करून स्वतःलाच अडचणीत आणतो!

अन ते तेंव्हा लक्षात येते जेंव्हा आपण अडचणीत येतो. त्यामुळे कोणतीही गोष्ट करतांना ‘मला याची खरंच गरज आहे का?’ हा प्रश्न स्वतःला विचारा!

मध्यंतरी उदयनराजे भोसलेंची मुलाखत पाहिली. राजघराण्यातील व्यक्ती! पण फोन पहाल तर फिचर फोन! ह्या गोष्टीतून आपण बराच बोध घेऊ शकतो!

काटकसर ही एक वृत्ती आहे. जी भविष्य उज्वल बनवू शकते!

ऑडिओ:

ब्लॉग आवाजाच्या स्वरूपात ऐका!