मार्गशीर्ष शुद्ध ५, १९४३

मार्गशीर्ष शुद्ध ५

शालिवाहन शके १९४३
शिवशक ३४८

८ डिसेंबर २०२१

#मराठीदिनांक #म

मार्गशीर्ष शुद्ध ४, १९४३

मार्गशीर्ष शुद्ध ४

शालिवाहन शके १९४३
शिवशक ३४८

७ डिसेंबर २०२१

#मराठीदिनांक #म

जोडणी मराठी

जोडणी मराठी ही ट्विटरवरील मराठीसाठी सुरु केलेली आभासी चळवळ आहे. साधारण २०१६ साली मी ट्विटरवर सक्रिय झालो. काळपट्टीवर देखील चुकून एखादे मराठी ट्विट दिसले तरी आनंद व्हायचा अशी परिस्थिती होती.

ट्विटरवर मराठी लोक त्याही काळी मोठ्या संख्येने यायचे. पण प्रोत्साहनाअभावी ते फार काळ टिकत नसायचे. ती अडचण दूर होण्यासाठी त्यावेळी ‘हॅशटॅग मराठी’ ह्या नावाने खात्याची निर्मिती झाली. त्यावेळेस ‘हॅशटॅग’ला मराठीत जोडणी म्हणतात हे माहित नसल्याने ते नाव दिले गेले.

मराठीत ट्विट टाकणारी मंडळींना त्यावेळी किमान प्रोत्साहन देण्याच्या संकल्पनेला आज पाच वर्षे लोटली आहेत. आजमातील ट्विटरवर साधारण दिवसाला पाच हजारांहून अधिक ट्विट प्रकाशित होतात. हे अत्यंत आनंदाचे आहे.

२०१६ मध्ये ट्विटरवर शब्दांची मर्यादा १४० शब्दांची मर्यादा होती. त्या मर्यादेचा विचार करून मराठी भाषेच्या नावातील पहिले अक्षर म्हणून ‘#म’ ठरवले गेले. मराठी भाषिकांच्या प्रेमामुळे आज किमान पाचशे मराठी ट्विट दिवसागणिक ‘#म’ जोडणी वापरून टाकले जातात.

सामाजिक उपक्रम असल्याने यात सरासरी १००-२०० ट्विटलाच प्रोत्साहन म्हणून पुनः ट्विट किंवा पसंती दिली जाते. आजपर्यंत १४० हुन अधिक पुनः ट्विटच्या दैनंदिन सरासरीने २.७ लक्ष ट्विट केले गेले आहेत. ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. मराठी भाषिकांच्या प्रेमामुळेच आज हा वटवृक्ष वाढत आहे.

जगभरातून साधारण क्षणाला ९५०० हुन अधिक ट्विट ट्विटरवरून प्रकाशित होतात. त्यात किमान एक ट्विट मराठी असावे ह्या ध्येयाने आज जोडणी मराठी कार्य करीत आहे. ते ध्येय गाठायचं झाल्यास दिवसाला मराठी ट्विटची संख्या ८६४०० असायला हवी. सुदैवाने ट्विटर वापर करणाऱ्या मराठी भाषिकांची संख्या त्याहून कितीतरी अधिक आहे.

प्रयत्न करीत राहिल्यास तेही शक्य होईल! शासकीय खात्यांची माहिती टाकण्याची संख्या लक्षात घेता ते किमान दिवसाकाठी दोन हजाराहून अधिक ट्विट टाकतात. त्यातील किमान अर्धे ट्विट ते मराठी भाषिकांच्या मागणीमुळे व नियमामुळे करतात! त्यांना प्रोत्साहित केल्यास किमान त्यात पाच ते दहापट वाढ होऊ शकेल!

सामान्य सक्रिय मराठी ट्विटरकरांचा विचार केल्यास त्यांची सध्याची संख्या दोन हजारांच्या आसपास आहे. त्यांना प्रोत्साहन देत राहिल्यास त्यांच्याकडूनही किमान दोन हजारांहून अधिक मराठी ट्विट येतील. खरंतर त्यांनी मनात आणलं तर आहे त्यात हजारोपट वाढ ते करू शकतात.

पुढारी, पक्ष, चित्रपट सृष्टीतील कलाकार आणि अन्य सत्यापित खात्यांकडून व त्यांच्या समर्थक अन विरोधकांच्या चर्चांमधून साधारण अडीच हजार ट्विट दिवसाकाठी प्रकाशित होतात. त्यांनाही प्रोत्साहन मिळाल्यास यात अनेक पटींनी वाढ होऊ शकते!

असेही मराठी भाषिकांना काय अशक्य? त्यामुळे ट्विटरवर मराठी वाढत आहे व वाढत जाईल हे नक्की!!

मराठी दिनांक – मार्गशीर्ष ३

मार्गशीर्ष शुद्ध ३

शालिवाहन शके १९४३
शिवशक ३४८

६ डिसेंबर २०२१

आभासी जीवन

आभासी जीवन अर्धे जग जगत आहे. जगाची साधारणतः लोकसंख्या आठ अब्जच्या घरात आहे. त्यापैकी ५.२ अब्ज आंतरजाळाशी जोडलेले आहेत. अन ४.२ अब्ज लोक कोणत्या ना कोणत्या समाज माध्यमांवर सक्रिय आहे!

सक्रिय इतके की, जगाच्या कोणत्याही देशापेक्षा अधिक क्रयशक्ती त्यांची होते. मध्यंतरी असाच मुलांच्या दूरदर्शन संचाच्या वेडाचा एक अहवाल पाहण्यात आलेला. साधारण १२ ते १८ वयोगटातील मुले दिवसाकाठी आठ तास दूरदर्शन संचासमोर असतात असं त्यात नमूद केलेलं!

सुरवातीला हे धक्कादायकच वाटलेलं. पण जगाला भ्रमणयोजक आणि आंतरजाळाने वेडसमोर तेही फिके! आजमितीला २ अब्जच्या घरात संकेतस्थळे आहेत. १.९ पद्म (१९०० अब्ज) विपत्र/ईमेल पाठवलेली आहेत. दर क्षणाला गुगल शोधयंत्रावर लाखभर शोध घेतले जातात!

आतापर्यंत ५४ लाख नोंदी/लेख लिहिले गेले आहेत. दर क्षणाला ९५००हुन अधिक ट्विट संदेश प्रकाशित होतात. क्षणाला युट्युबवर ९२ हजाराहून अधिक चित्रफिती पहिल्या जातात. आभासी जीवन इतके मोठे आहे.

क्षणाला ११००हुन अधिक इन्टाग्रामवर छायाचित्रे. तर क्षणाला टंब्लरवर दोन हजार संदेश प्रकाशित होतात. जवळपास ३ अब्ज फेसबुकचे वापरकर्ते आहेत. पिंटरेस्टचा वापर ४० कोटीहून अधिक लोक करतात. क्षणाला सहा हजाराहून अधिक स्कायपी संभाषणे होतात. वर्षाला लाखभर संकेतस्थळांवर आभासी दरोडा टाकला जातो.

क्षणाला लाखभर जीबी माहितीच्या पाहण्या होतात. दिवसाकाठी चार लक्ष संगणक/फुलणक खरेदी केले जातात. तीस लाखांहून अधिक भ्रमणयोजकांची विक्री होते. हे सगळं इतकं मोठं आहे की आपणच नव्हे तर सर्व जग हे आभासी जगत असल्याचे द्योतक आहे.

कोणतीही गोष्ट अकारण केली जात नाही. ज्यात काही फायदा नाही अशी कोणतीही गोष्ट फारकाळ टिकत नाही. आभासी जगाचा फायदा जोपर्यंत आहे तोवर ते असेल. त्याचा प्रत्यक्ष जीवनावरही परिणाम होतो.

आपण कितीही टाळले तरी आपण त्याचा भाग झालेलो आहोत. अनेक देशांचे सरकार आंतरजाळाचा वापर आपल्या नागरिकांवर नियंत्रणासाठी करतात. प्रत्येक गोष्टीच्या चांगल्या वाईट अशा दोन्ही बाजू असतात. सूचनांचा भडीमार मुळे अनेकांच्या दैनंदिन जीवनावर ह्याचे वाईट परिणाम घडले. अपुरी झोप, चिडचिडेपणा, ताण वाढण्यासारख्या गोष्टीही वाढल्या आहेत.

कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो. ‘अति तिथं माती’ ही म्हण सगळीकडे लागू पडते. त्यामुळे, ह्या आभासी जगात किती रममाण व्हायचे हे ठरवायला हवे. तूर्तास इतकेच. बाकी बोलूच!!

व्यक्ती तितक्या प्रकृती

व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. अन कितीही गमतीने घेतलं तरी हेच खरं आहे. प्रत्येकाला येणारे अनुभवावरून प्रत्येकजण त्याचा दृष्टिकोन ठेवतो. कुणाला अमुक विषय महत्वाचा वाटतो. तर कुणाला अमुक मत पटत नाही. माझ्यामते ह्यात काहीच गैर नाही.

एखादी व्यक्ती अशी का याचे उत्तर शोधायचं झाल्यास त्याचे अनुभव ऐका. आपल्याला कोडे उलघडेल. ते लक्षात आल्यास तो व्यक्ती असा का याची कारणे समजेल. अनेकदा त्यांच्या दृष्टिकोनामागील वस्तुस्थिती माहित नसल्यानं प्रश्न निर्माण होतात.

गमतीचा भाग असा की, प्रत्येकालाच आपण करतोय तेच योग्य वाटते. अन ते इतरांनाही वाटावे असा त्याचा आग्रह असतो. यात मी देखील मोडतो. पण इतरांनाही त्यांची मते असतात. अन तीही आपण स्वीकारायला हवीत. याबाबत मी व्यक्तिशः प्रयत्न करीत आहे.

खरं तर आपण स्वतःमध्ये या गोष्टी अंगिकारायला हव्यात. अनेकदा आपण एखाद्याविषयी अकारण गैरसमज निर्माण करून घेतो. त्यामागची पार्श्वभूमी समजून घेतली तर अनेक गोष्टींचे कोडे उलगडू शकते. खरं तर असं वैचारिक काही मांडव असा नोंदीचा हेतू नव्हता.

परंतु, आपल्याकडे गेल्या अनेक वर्षांपासून सगळं काही मनोरंजनात्मक! असं झाल्याने, प्रत्येक गोष्ट मनोरंजन म्हणून पाहिली जाते. मग त्या दैनंदिन घडामोडी असोत वा अन्य. वर्तमानपत्रांचे मथळे व बातम्या पाहिल्या की हे सहज लक्षात येण्याजोगे आहे. त्यामुळे अशा विषयावर अन अशा पद्धतीने व्यक्त व्हावे असा हेतूही नव्हता. असो!!

एकूणच पस्तीशीनंतर आपोआपच समजूतदारपणा वाढतो. हे मी माझ्या अनुभवावरून सांगत आहे. हा बदल खऱ्या अर्थाने चांगला आहे. समोरील व्यक्ती हा स्वतंत्र आहे अन त्याला त्याचे स्वातंत्र्य जपण्याचा अधिकार आहे. ह्याची आपल्या मनाला समजूत घातली तर अनेक गोष्टी सहजपणे सुटतात.

गेल्या काही काळापासून हवामान आश्चर्यकारकरीत्या बदलत आहे. त्याचा थेट परिणाम जीवसृष्टीवर होत आहे. त्यामुळे आजकाल प्रत्येकाच्या जीवनात तणाव फारच वाढलेला आहे. ह्याचा विचार करून आपण आपल्या सानिध्यात येणाऱ्या लोकांना कसे तणावमुक्त ठेऊ शकतो. आपली प्रेमळ बंधने किती कमीत कमी लादू याचा आपण सर्वांनी विचार करायला हवा.

माझ्या दोन्ही चिमुकल्यांचे स्वभाव अगदी भन्नाट आहेत. मोठ्या राणीसरकार कैवल्याचा पुतळा आहेत. तर लहान राणीसरकार दंगेखोर! त्यांच्या स्वभाव पाहता अनेकदा याचा प्रत्यय येतो. तूर्तास इतकेच. बाकी बोलूच!!

राष्ट्रभाषा मराठी

अठराव्या शतकात भारताची राष्ट्रभाषा मराठी होती. मराठेशाहीच्या टापा ज्यावेळी अफगाणिस्थानाच्या सीमेवर पडत होत्या त्यावेळी देशाचा सर्व व्यवहार मराठीमधून चालत असे. त्याकाळी नामधारी दिल्ली ही राजधानी मुघलांच्या ताब्यात होती.

तर देशाचा सर्व व्यवहार तत्कालीन मराठेशाहीच्या राजधानी पुण्यातून चालत असे. पुढे ब्रिटिशांनी चाळीस वर्षे मराठ्यांशी लढून देशावर ताबा मिळाला. व देशाची शासकीय व्यवहाराची भाषा इंग्रजी झाली! मुघलांनी फारसी (पर्शियन) वापरलेली. तर मराठेशाहीच्या काळात सर्व शासकीय व्यवहार मराठीतून होत असे. त्यासाठी व्यवहारकोश निर्मितीचे काम हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवरायांच्या काळातच पूर्ण झाल्याने मराठी भाषेला सुवर्णकाळ प्राप्त झाला होता.

ब्रिटिशांच्या ताब्यात देश गेल्यावर कारकुनी कामासाठी शाळांची सुरवात देशात झाली. अन मराठीच नव्हे तर सर्व भारतीयांना ब्रिटिशांनी सांगितलेल शिक्षण शिकवले गेले! त्यातून त्यांनी मानसिक गुलामांची अशी एक पिढी निर्माण केली की ती बुद्धिवादी असेल परंतु मानसिकरीत्या ब्रिटिशांची गुलाम असेल. एवढ्या खंडप्राय देशाला सांभाळण्यासाठी त्यांनी ते केले.

दुर्दैवाने ब्रिटीशांनंतर अजूनही तेच शिक्षण पद्धती सुरु राहिल्याने आजही कारकुनी काम करू शकणाऱ्यांची व ब्रिटिशांची मानसिक गुलामी करणारी पिढीचाच सर्वत्र पूर आलेला आहे. त्याचा वापर तत्कालीन हिंदी भाषिक नेत्यांनी स्वतःच्या भाषेसाठी करून घेतला. व राष्ट्रभाषा नसतांनाही गेल्या ७५ वर्षांपासून हिंदी भाषा राष्ट्रभाषा असल्याचा खोटा प्रचार सरकारी खर्चाने केला. दुर्दैवाने आजही हा समज जनमानसात पसरलेला असून त्यामुळे इतर भारतीय भाषा मृत्युमुखी पडत आहेत.

ब्रिटिशांकडून स्वातंत्र्याच्या वेळी भारतातील ७८० हुन अधिक भारतीय भाषा बोलल्या जायच्या. आज त्यातील २२० हुन अधिक भाषा मृत झाल्याचा अहवाल भारत सरकारच्या भाषा विभागाने याआधीच प्रसिद्धीस दिलेला आहे. तसेच हीच परिस्थिती पुढे कायम राहिल्यास येत्या पन्नास वर्षात तेवढ्याच भाषा मृत होतील असाही अंदाज व्यक्त केलेला आहे.

खरं तर अखंड भारतावर राज्य करणाऱ्या मराठीला पुनः राष्ट्रभाषा म्हणून दर्जा मिळणे आवश्यक होते. परंतु, ब्रिटिशांच्या शिक्षणपद्धतीमुळे गुलाम झालेल्या तत्कालीन मराठी भाषिकांनी याचे स्मरणही झाले नाही! परंतु, तीची पुनर्स्थापना करण्याचे ध्येय ठेवल्यास जगभरातील १५ कोटी मराठी भाषकांना काहीही अशक्य नाही.

दोन हजार वर्षांपासून मनगटाने देशाचे व बुद्धी अन व्यवहार चातुर्याने आर्थिक संपन्नता निर्माण करणाऱ्या मराठी भाषिकांना सगळं शक्य आहे. असे नसते तर इसवीसनाच्या सुरवातीला शकांच्या लक्षावधींच्या फौजेला त्यांनी हरवले नसते! अन ब्रिटिशांना बंगालातून भारतात प्रवेश करणे क्रमप्राप्त झाले नसते. अन मुघलांचे साम्राज्यही नष्ट झाले नसते!

राष्ट्रभाषा मराठी करायची असेल तर सुरवातीला आपण ती राष्ट्रभाषा आहे असं स्वतःला व आपल्या वर्तुळातील इतरांना सांगणे आवश्यक आहे. जोपर्यंत आपण हे बिंबवणार नाही तोवर पुढचे पाऊल टाकता येणार नाही.

तुमचं कुटुंब तुमची जबाबदारी

तुमचं कुटुंब तुमची जबाबदारी ह्याच हेतूने आमच्या लाडक्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी‘ ही योजना राज्यात लागू केली. ह्या योजनेचा हेतू स्पष्ट होता. तुमचं तुम्ही बघा अन वेळेवर कर मात्र भरा.

खरं तर ह्या योजनेप्रमाणे याआधीच आमच्या लाडक्या पंतप्रधानांनी ‘स्वावलंबी भारत’ नावाची योजना आणलेली. म्हणजे सरकार टाळेबंदी खेरीज काहीच करणार नाही. जनतेने आपआपले पाहावे. मेले तरी चालतील पण कर मात्र भरा. गेल्यावर्षी देखील न मनपाने मालमत्ता कर सोडला. न कोणत्या बँकेने कर्जाचे हप्ते सोडले. न राज्य सरकारने कोणता वाढीव कर कमी केला. उलट तीनपट जास्त वीजबिल आकारून जनतेला गोत्यात आणले.

आता विषय माल्या किंवा अंबानींचा असता तर तो आमच्या संघराज्य सरकारने स्वतःहून लक्ष घालून तडीस नेला असता. एका रात्रीत गुजरात मधील सर्व विमानतळे सांभाळण्याचे कंत्राट जसे खेळण्याचे विमान सांभाळायचा देखील अनुभव नसलेल्या अनिल अंबानींच्या दिवाळखोरीत गेलेल्या रिलायन्स कंपनीला दिल. पण इथं जनतेचा विषय! त्यांना काय ‘जय श्रीराम म्हणा’ विषय मिटला!

कर भरा. वीजबिल भरा ह्याचे संदेश मात्र विपत्र(ईमेल) अन मोबाईल संदेश (एसएमएस) वेळेवर पाठवून मानसिक छळ मात्र सुरु आहे. कोणतीही सवलत नाही. वारंवार वीज खंडित केली जाते. नियमबाह्यपणे इंग्रजी वापरून मराठी भाषिकांना राज्य सरकार मराठी भाषिकांना खिजवत. मुळात ह्या राज्याचा पाया मराठी भाषा असतांना तीच वापरायचं नाही असं राज्य अन संघराज्य सरकारने ठरवलेलं आहे.

तुमचं कुटुंब, संस्कृती, भाषा, तुमच्या आर्थिक अडचणी, तुमचं राज्य अन एकूणच तुमचे जीवन तुमची जबाबदारीपर्यंत प्रवास येऊन थांबेल अशीच परिस्थती आहे. सरकार केवळ टाळेबंदी करायला अन उरलेल्या वेळेत कर गोळा करण्यासाठी आहे.

टीका करण्याला देखील मर्यादा आहेत. पण सरकार नावाचा राक्षस जनतेचे जीव घेण्यासाठी आसुसलेला आहे. मग विषय आरोग्य यंत्रणेचा असो वा बेरोजगारीचा. मग राज्य असो वा संघराज्य सरकार. दोन्हीही गुन्हेगार आहेत.

सरकार अन जनतेत एक अघोषित करार असतो. सरकारने सुरक्षा, चांगले रस्ते, अखंडित वीजपुरवठा, वस्तूंचा योग्य पुरवठा व योग्य दर अन उत्साही अन उद्योगस्नेही वातावरण देणे आवश्यक असते. अन त्याबदल्यात जनतेने कर भरायचा. इथं जनता असुरक्षित आहे. चांगले सोडा रस्तेच नाहीत. महागाईने सर्वोच्च पातळी गाठलेली आहे. वारंवार विजेचे भारनियमन सुरु असते. उत्साही अन उद्योगस्नेही सोडा इथं घरातून बाहेर पडण्याला बंधने घातलेली आहेत. पण कर मात्र चालू!!

कमाई शून्य अन कर हजार अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.

फेसबुकच्या सूचना

फेसबुकच्या पानाला पसंती द्या. मैत्रीची विनंती अशा आशयाच्या शेकडो सूचना दिवसाकाठी येतात. त्यांचे विपत्र/ईमेलच्या खचात कामाच्या गोष्टी शोधणे अवघड होते. बरं ह्या सूचना वजा विनंती आपल्याच ओळखीची लोक करत असल्याने अनेकदा नाईलाज होतो.

शाळेत असतांना मला एकच मित्र होता. पुढील शिक्षणात व त्यापुढे नोकरी व्यवसायात चार पाचपेक्षा आकडा वाढला नाही. पण त्या सुमार बुध्यांक असलेल्या फेसबुकवर मात्र सहाशेपेक्षा कमी मित्र असलेला कुणी असेल वाटत नाही. आधी मैत्रीची विनंती येते. ती स्वीकारली की लगेच पानाला पसंती देण्याची आर्जव!

संख्येचे महत्व इतके झालेय की सट्ट्यानंतर फेसबुकच्या पानाच्या पसंतीचा क्रमांक लागतो. अद्ययावत अन तंत्रानुकूल आभासी जगात यापेक्षा दुसरा निर्बुद्धपणा दुसरा नसेल. आजकाल तर पानाच्या पसंती देखील विकत मिळतात. बिटकॉइनला देखील जेवढी मागणी नाही तेवढी त्या फेसबुकच्या पानाला विनंतीची आहे.

अचानक एवढी लोक आलीत कुठून अन का धडपडतात हेही अनाकलनीय आहे. प्रसिद्धीची नशा गांजापेक्षा जास्त असते हेच खरं. पण सांगणार कुणाला! जो तो प्रसिद्धीच्या मागे धावतोय. तुमचा व्यवसाय आहे ते ठीक पण उगाच ‘गावाचा कट्टा’ अन ‘आईच्या गावात’ अशा नावाची पाने ह्याच तंत्राने प्रसिद्धीस आलेली आहेत. त्यांनी मेहनत घेतली नाही असे माझे चुकूनही म्हणणे नाही.

तोही एक व्यवसाय झाला आहे. याबाबत दुमत नाही. पण नेमका किती जणांना त्याचा फायदा होतोय? मग इतका वेळ त्यावर देणे योग्य आहे का? बरं तुमचा वेळ तुम्ही हवा तसा घालवाल, पण तुमच्या हौशेपायी किती जणांचा वेळ दवडणार?

बरं पानाची/मैत्रीची विनंती पसंती दिली नाही की रुसवे फुगवे सुरु होतात. तू माझ्या फेसबुकच्या पानाची विनंती स्वीकारली नाही आता मीही तेच करणार! असं अनुसरणाच्या बाबतीत ट्विटर अन इंस्टाग्रामवर चालत. मुद्दा इतकाच की स्वतःचा वेळ वाचावा अन इतरांचाही. सूचना बंद कराव्यात तर त्यातही हेवेदावे येतात.

मध्यंतरी इंस्टाग्रामवर लाखभर अनुसारक असलेल्या एका तरुणाने टाळेबंदीच्या नैराश्याने आत्महत्या केली. झालं ते वाईटच. पण हा आकड्यांचा खेळ काय फायद्याचा अन किती महत्वाचा ह्याचाही विचार करणे महत्वाच आहे. उगाच स्वतःचा ताण वाढवून अन इतरांना मानसिक छळून काय साध्य?

बाकी सगळं जाऊद्या. अन आधी आपल्या फेसबुकहं खात्याच्या रचनेत (सेटिंग्स) जा अन पहिल्यांदा त्या फेसबुक पानाची/मैत्रीची आमंत्रणे/विनंती बंद करण्याची काही पर्याय मिळतोय का ते पहा..

मराठी भाषिकांचे प्रभावक्षेत्र

मराठी भाषिकांचे प्रभावक्षेत्र त्यांच्या लोकसंख्येवर आधारलेले असावे. जगाची लोकसंख्या साधारण आठ अब्जच्या घरात आहे. अन मराठी भाषिकांची संख्या पंधरा कोटींच्या घरात. याचा अर्थ मराठी भाषिकांची संख्या ही जगाच्या लोकसंख्येच्या २ टक्के आहे.

जितक्या प्रमाणात मराठी भाषिकांची लोकसंख्या तितकाच त्यांचा प्रभाव असायला हवा. खरं तर प्राचीन संस्कृत ग्रंथांच्या मते मराठा/मराठी याची क्षमता दहा हजार पट आहे. त्यावर वेगळी चर्चा केली जाऊ शकते. परंतु, आहे तेवढा जरी प्रभाव टाकला तर अनेक क्षेत्रात मराठीचा शिरकाव होईल. अन पर्यायाने मराठी भाषिकांना याचा फायदा होईल.

मराठी भाषिकांचे प्रभावक्षेत्र वाढवण्यासाठी काही ध्येयाची आखणी महत्वाची वाटते. म्हणजे आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक अन शैक्षणिक अशा काही विभागांमध्ये आपण विभागणी करू शकतो. चला तर एक एक मुद्दा सविस्तरपणे घेऊया.

आर्थिक

मराठी भाषिक सरस्वती अन पूजक असल्याने त्यांचा ओढा कलेकडे सुरवातीपासून अधिक आहे. तरीही आता मराठी भाषिकांनी त्यासोबतच लक्ष्मीची देखील पूजा सुरु करावी. स्पष्ट भाषेत बोलायचे झाल्यास, मराठी भाषिकांनी आर्थिक विषय अधिक गांभीर्याने घेतल्यास ते त्यातही सर्वोच्च स्थान निश्चितच गाठतील. वर्तमानाचा विचार केल्यास फोर्ब्स या नियतकालिकाच्या मते जगभरातील अब्जाधीशांची २०२१ मधील संख्या २७५५ आहे.

याच संख्येचा विचार केल्यास मराठी भाषिक अब्जाधीशांची संख्या किमान ४० तरी असायला हवी. आता किर्लोस्कर, गरवारे, अशोक खाडे, रामदास माने, आदर पुनावाला, धनंजय दातार अशी असंख्य नावे आहेतच. त्यामुळे हा आकडा गाठला गेल्याचीही शक्यता नाकारता येणार नाही! परंतु प्रत्येक मराठी भाषिकाने आपल ध्येय अब्जाधीश होण्याचे ठेवले तर किमान एकही मराठी भाषिक आपल्याला गरीब म्हणून पाहायला मिळणार नाही.

सामाजिक

सामाजिक दृष्टया मराठी भाषिक हा खूप पुढाऱ्याला आहेच. पण आपल्या स्वतःबद्दल न्यूनगंड ठायी बाळगल्याने तितकासा प्रभाव जाणवत नाही. तो न्यूनगंड पूर्वीच्या ब्रिटिशांच्या द्वारे तयार केलेल्या शैक्षणिक धोरणामुळे व दिल्लीशाहीने तोच कित्ता गिरवल्यामुळे निर्माण झालेला आहे. मराठी भाषिकांनी स्वतःबद्दल कमीपणा बाळगण्याचे कोणतेही कारण नसून उलट अभिमान बाळगाव्या असा असंख्य गोष्टी इतिहासात त्याने कोरून ठेवलेल्या आहेत. त्याची उजळणी केल्या हा समाज नक्कीच जगावर फार मोठा प्रभाव पाडू शकतो.

सांस्कृतिक

मराठी भाषिक सांस्कृतिक दृष्टयाही खूप पुढारलेले आहेत. मुळात योध्यांची ही जमात आपले प्रत्येक सण अन उत्सव जयाचे साजरे करते. इतकी अचूक कालगणना आहे की मराठी नवीन वर्षालाच निसर्गाला पालवी फुटते अन गणपतीत हमखास पाऊस कोसळतो. खरं तर याचा अंदाज लावणे आजच्या अत्याधुनिक जगालाही जमलेलं नाही. अशा महान संस्कृतीचा प्रभाव सहजगत्या पडण्याजोगा आहे.

शैक्षणिक

मला वाटते वरील सर्व गोष्टींची गंगोत्री म्हणजे शिक्षण आहे. एकतर आपण मराठी कोण आहोत याची आपल्याला कल्पना नाही. बरं कल्पना आली तर आपल्याला आपला दैदिप्यमान इतिहास माहित नाही. तल्लख अन कुशाग्र बुद्धिमत्ता लाभलेले मराठी भाषिकांना रुद्ररूपी बलाढ्य शारीरिक क्षमताही लाभलेली आहे. ह्याचा विचार केल्यास मराठी भाषिक शिक्षणाच्या जोरावर सर्वकाही साध्य करू शकतात.

मराठी भाषिकांनी मनावर घेतल्यास, जगातील ज्ञानाच्या किमान २% ज्ञान मराठीत उपलब्ध असेल. जगातील सर्वच क्षेत्रात किमान २% टक्के प्रभाव मराठी भाषिकांचा असेल.