कृतिविण वाचाळता व्यर्थ आहे!
मोदी सावकार
काय म्हणावं मोदी सावकारांना? उठता बसता दिसता मोदी सावकार सावकारी करण्यात गुंग! गेल्या आठवड्याचीच बातमी पहा. राज्यांचा करांचा हिस्सा गेल्या दोन वर्षांपासून मोदी सावकारांनी दिलेला नाही! खूपच प्रकरण ताणलं तर पाच दहा टक्के रक्कम वर्ग करतात! आता ती रक्कम २.३ लक्ष कोटी रुपये इतकी झाली!
आता कराचे दोन गोळे गट्टम केल्यावर राज्यांना कर्ज काढण्याचा उरफाटा सल्ला दिला! इतकंच काय त्याच व्याज देखील राज्यांच्याच गळ्यात मारले! तशी मोदी साहेबांची सावकारी नवीन नाही! गेल्यावेळी तीन अब्ज रुपयांचा चायनामेड पुतळा उभा करण्यासाठी जगात पन्नास पैसे प्रति बॅरल कच्चे तेलाचे भाव असतांना जनतेला नव्वदीच्या घरात इंधन खरेदी करायला लावले! पुढे तोच पैसा चीनला गेला अन आपण न हलणारा डुलणारा पुतळा खरेदी केला!
लबाडी देखील शब्द कमी म्हणावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे! जिथं मोदी साहेबांच्या पक्षाचे सरकार त्याला हवा तेवढा निधी! अन जिथं नाही त्या राज्यांशी सुडाची वागणूक! कशाचा देश अन कशाचं काय! आजचीच बातमी, मोदी सावकारांनी ४.३९ कोटी शिधाधारकरांना बनावट घोषित केले! बरं ते या देशाचे नागरिक नाहीत का? का ते करच भरत नाहीत? काय तर म्हणे आधारकार्ड नव्हतं!
आता मला सांगा, आधारकार्ड कधीपासून जन्माचा वा ओळखीचा पुरावा वा राष्ट्रीयत्वाचा पुरावा म्हणून साक्षांकित झाला? नाही म्हणजे त्याची संस्था देखील असा कोणताही दावा करत नाही! बर एक खासगी ओळखपत्राहून सरकारी योजना नाकारणं घटनाबाह्य नाही काय?
मोदी सावकारांच्या राज्यात कर दहशतवाद वाढला नव्हे तर बोकाळलाय! लोकांच्या आयुष्याची राखरांगोळी झाली तरी चालेल पण आपली सावकारी चालायला हवी! अगदीच निषेधार्ह आहे!
वेबसाईट
वेबसाईट बद्दल काही नव्याने सांगावं अशी परिस्थिती नाही. तरीही ज्ञानाची उजळणी करण्याचा यत्न करतो. आपण सर्वजण परिस्थितीमुळे म्हणा वा युगाची अपरिहार्यता आभासी जगाला आपलेसे केले आहे. या डिजिटल/आभासी जगाची पहिली पायरी म्हणजे वेबसाईट/संकेतस्थळ असं आपण म्हणू शकतो.
खाद्यान्नाच्या विश्वात झोमॅटो/स्वीगी सारख्या हॉटेलातील अन्न घरपोच देणाऱ्या कंपन्यांनाचा आधार हा वेबसाईट हाच आहे. आस्थापनांचे मुख्य चेहरा म्हणून संकेतस्थळ (वेबसाईट) नव्याने सांगायची गरज नाही. तुम्ही व्यवसाय सुरु करत आहात, तर तुम्हाला संकेतस्थळाची गरज भासणारच!
अगदी काही शोध घ्यायचा आहे. तर गुगल नावाचे संकेतस्थळ आपल्या सेवेसी अहोरात्र हजर आहे. काही वस्तू मागावयाच्या आहेत मग चाळा अमेझॉन,फ्लिपकार्ट सारखी संकेतस्थळे! मनोरंजनासाठी हॉटस्टार, नेटफ्लिक्स, युट्युब सारखी संकेतस्थळे! जवळपास सर्वच क्षेत्रांची गरज संकेतस्थळे झाली आहेत!
मनपा असो वा केंद्रीय आस्थापने! त्यांच्याही सेवा अन तक्रारीसाठी संकेतस्थळे बनवलेली आहेत! थोडक्यात, संकेतस्थळे आपल्यासाठी नवीन नाहीत! इतके काय बातम्या देणाऱ्या वृत्तपत्रे देखील आता संकेतस्थळावर अद्ययावत माहिती पुरवत असतात! इतकेच काय फेसबुक सारखी संकेतस्थळे जगाला एका धाग्यात गुंफत आहेत.
जगात अशी पावणे दोन संकेतस्थळे आहेत. मानवाच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी ती सहाय्यक ठरत आहेत. टाळेबंदीच्या काळात त्यांनीच जगाला दूर असूनही एकमेकांच्या संपर्कात ठेवले!
एकूणच आताच्या युगात संकेतस्थळे आपल्याला बहुपयोगी ठरत आहेत. आपण जर नवीन व्यवसाय सुरु करणार असाल तर त्याची माहिती जगाला मिळावी यासाठी नक्कीच संकेतस्थळ बनवणे नक्कीच फायदेशीर आहे. व्यवसायाच्या प्रसिद्धीसाठी खचितच ते हितवाह आहे!
प्रदूषण
प्रदूषण खरं तर शालेय जीवनापासून एक रटाळ विषय! त्यावर पुन्हा काय बोलायचं? पण त्याचे आपल्या दैनंदिन जीवनावर फार मोठा परिणाम होतो. हे मी अनुभवाने सांगत आहे!
फार काय बोलायचं! पाच एक वर्षांपूर्वीपर्यंत पुण्यात फिरतांना फक्त ऊन जाणवायचं! आता त्यासोबत धूर आणि धूळ जाणवते! सर्वेक्षणाअंती सर्व पुणेकर दिवसाला पाच सिगारेट ओढल्यावर जमा होईल इतका धूर घेतात असं निरीक्षण प्रसिद्ध झालेले आहे. एकूणच सर्वत्र कमी अधिक प्रमाणात हे स्पष्टपणे दिसत आहे!
जागतिक तापमानात लक्षणीय बदल होत आहेत हे सर्वांनाच माहिती आहे. परंतु, आपण सर्वांनी कधी आपल्याकडे पावसाळ्याचे निरीक्षण केले आहे का? शालेय जीवनात जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर म्हणजे पावसाळा हे आपण शिकलो! पण आजकाल निरीक्षण केले तर लक्षात येईल की, जूनमध्ये पावसाची शाश्वती नसते! अन गेल्यावर्षी तर तो डिसेंबरपर्यंत थांबलेला!
हे सगळं नैसर्गीक बदल आपल्या आयुष्यातील अनेक दृश्य अदृश्य बदल घडवतात! याची कारणे अन उपाय सांगण्याइतपत मी मोठा नाही. परंतु, प्रदूषणामुळे आपले जीवनमान धोक्यात येत आहे. अन आता कृती करण्याची गरज आहे इतकं नक्की.
अनेक मोठमोठी आस्थापने आपले ऊर्जेची गरज सूर्याच्या उर्जेवर भागवत आहेत. हे सकारात्मक असून यातून चांगल्या गोष्टी नक्कीच घडतील! पृथ्वी आणि शुक्र हे दोन्ही आकाराने समसमान! एकाच वेळी उत्पन्न झालेले! परंतु तिकडचे हवामान इतके भीषण आहे की तिकडे सजीवसृष्टी निर्माणच झाली नाही.
प्रचंड कार्बन डायॉक्साइड अन ७३० अंश सेल्सिअस तापमानमुळे ते सर्वार्थाने नरक बनलेलं आहे. सांगण्याचा हेतू इतकाच की आपण पृथ्वीचा शुक्र बनवण्याचे उद्योग सुरु केलेले आहेत! ते वेळीच थांबवणे आवश्यक आहे. तर अशा रटाळ परंतु महत्वाच्या विषयावर आपण नक्कीच काहीतरी सुधारणा करूयात! कृतिविण वाचाळता व्यर्थ आहे!
त्यामुळे आपण जोपर्यंत प्रत्यक्षात कृती करीत नाही तोवर यात बदल घडणे अशक्य आहे! त्यासाठी आता आपण शक्य तेवढे व आवश्यक प्रदूषण करणाऱ्या गोष्टींचा वापर करणे अनिवार्य आहे. त्यासोबतच आपल्याला प्रदूषण कमी करणाऱ्या निसर्गाची पुन्हा उपासना करणे देखील गरजेचे आहे. नाहीतर हौशी वजन कमी करणाऱ्या परंतु, खाण्यावर नियंत्रण नसलेल्या लोकांप्रमाणे होईल!
उरतो मुद्दा याची सुरवात कोणी करायची अन कधी करायची! तर माझ्या आजवरचा अनुभवानुसार कशासाठी आपल्याला पटणाऱ्या गोष्टींच्या अनुकरणासाठी इतरांची वाट पाहायची? तर सुरवात करूयात!!
आत्मपरीक्षण
आत्मपरीक्षण प्रत्येकाने सातत्याने करायला हवे. त्याचा चांगला फायदा होतो. स्वतःच्या प्रत्येक गोष्टीचा त्रयस्थ व्यक्ती म्हणून केलेला अभ्यास अनेक पैलू उलगडतो. अनेकदा आपण अनेक गोष्टी बोलतो. अनेक ध्येय समोर ठेऊन काम करतो. कधी यश तर कधी अपयश मिळते. पण या पलीकडे जाऊन विचार केल्यास आपण केलेल्या कामाचे विश्लेषण अनेक चांगल्या गोष्टी दर्शविते! (more…)
कोरोनाचे माहात्म्य
कोरोनाचे माहात्म्य वर्णावे इतका काही तो मोठा नाही. परंतु, त्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता त्याचे माहात्म्य वर्णावे असे वाटते. मी मी म्हणणाऱ्या अनेक स्वयंभूना ज्याने चितपट करून वस्तुस्थितीचे दर्शन घडवले तो हा कोरोना विषाणू!
त्याच्यामुळे म्हणा वा अन्य कारणामुळे म्हणा या पृथ्वीवर माणूस हा सर्वशक्तिमान नाही. ह्याची स्पष्ट जाणीव होते! तसेच अशी परिस्थिती भविष्यात कधीही उद्भवू शकते! त्यामुळे आपल्यासाठी यातून धडा घेण्याचा एकच गोष्ट आहे ती म्हणजे वर्तमानात जगा.
वर्तमानात यासाठी म्हणतोय कारण भूतकाळ आपण बदलू शकत नाही. भविष्यकाळाची कल्पना केली जाऊ शकते! अन भविष्यकाळ वर्तमानावर आधारलेला आहे. त्यामुळे आपल्याला जे हवंय ते वर्तमानातच हवंय ह्या विचाराने केल्यास अनेक मोठे बदल घडवून आणले जाऊ शकतात.
आज कोरोना आहे. उद्या काहीतरी नवीन असेल. ह्या नश्वर जगात पुढे काय वाढून ठेवलंय हे कोणीच सांगू शकत नाही. त्यामुळे, आपण आहे त्या वेळेचं योग्य नियोजन व अंमलबजावणी करणे अधिक संयुक्तिक राहील!
जर, एखादा नैसर्गिक हल्ला माणसांनाच काय देशाला हादरवून टाकू शकतो तर आपण भविष्याचा विचार करावाच कशाला? अन त्याच्या कल्पनेत वर्तमान का दवडावा?
मुळात आपल्याला भविष्यकाळ आहे ह्या संकल्पनेने अनेक संकल्पना कधी सत्यात येतच नाहीत. अन त्या याव्यात ह्या सद्हेतूने कोरोनाने माणसाला अशा पेच प्रसंगात टाकलेलं आहे की काय अशी शंका यावी अशी परिस्थिती आहे. त्यामुळे ह्यातून आपण आपले काम आजचे आजच संपण्याचा निर्धार जरी केला तरी अनेक मोठे बदल घडू शकतील!
माझ्याबद्दल सांगायचे झाले तर ह्या संकटातून जे शिकायला हवं ते मी शिकलो आहे! ते म्हणतात ना, जो दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला. आता विसंबणे हाच खरा धोका आहे. मग ते एखाद्या व्यक्तीवर असो वा वेळेवर. सगळंच गडबड गोंधळ निर्माण करते.
अन मग आपण टाहो फोडतो त्या बिचार्या नशिबावर. त्यामुळे कोरोनाच्या संकटात शिकण्यासारखी हीच गोष्ट आहे की, जे आहे ते आताच आहे. अशा पद्धतीने प्रयत्न केल्यास अडचणींच्या दोन पाऊल पुढे उभे राहता येईल! हा केवळ संकल्प न राहता रोजच्या जीवनाची सवय केली तर कोरोनाचे माहात्म्य साठा उत्तरी संपन्न होईल! अन भविष्यातील संकटरूपी वादळे झेलण्याच सामर्थ्य उभे राहील!
कोरोनापेक्षा टाळेबंदी वाईट
कोरोनापेक्षा टाळेबंदी वाईट! अन हेच सत्य आहे! हो मी आजच्या केंद्र सरकारच्या एकूणच संवेदना शून्य दिशाहीन हुकूमशाही कारभार बद्दल बोलत आहे. टाळेबंदी ज्या लोकांसाठी केली त्यांचेच जीव ह्या टाळेबंदीमुळे जाणार असतील तर कोरोनापेक्षा टाळेबंदी वाईट!
खरं तर राजकीय विषयावर बोलून आपल्याकडे काडीमात्रही फरक पडत नाही! परंतु तरीही ह्या निर्जीव अन निद्रिस्त समाजाला सांगण्यासाठी नव्हे तर मनाची घुसमट बाहेर काढण्यासाठी आजचा लेखनाचा प्रपंच करीत आहे!
देश अन प्रशासन स्वतः जनतेवर राज्य करण्यासाठीच जन्माला आलेल्या आहेत असा समज व्हावा अशी परिस्थिती आहे! हा अजस्त्र प्रशासनाचा नेमका उपयोग तरी काय असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे! साधारण दोन महिन्यांपासून सगळा देश घरात खितपत पडलेला आहे. ह्या देशाचे शेवटची व महत्वाचा घटक म्हणजे श्रमिक वर्ग आज जगण्यासाठी स्वगृही जाण्यासाठी मरायालाही तयार झालेला आहे!
कोणत्याही हुकूमशाही देशात नसेल एवढी अनागोंदी आज देशात सुरु असून नियोजनशून्यतेचा मूर्तिमंत पुतळा म्हणून आजच्या केंद्र सरकारला आपण म्हणू शकतो. बांगलादेश सारख्या अविकसित देशाने टाळेबंदी करण्याआधी लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी वेळ दिला! हे आपल्या सरकारला करणे अशक्य होत?
आज मजूर असोत वा टाळेबंदीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे मरणाऱ्यांचे सारे श्रेय ह्या केंद्र सरकारचे आहे! काय साधलं ह्याने? लोकांचे जीव वाचवण्यासाठी टाळेबंदी होती की मारण्यासाठी! बरं माझ्यासारखे जे आज नियम पाळून घरी बसलेले आहेत त्यांच्या प्रश्नावर बोलायचे झाल्यास अनेक कंगोरे बाहेर येतील!
सगळी कामे ठप्प आहेत! नावापैसा म्हणून कुणाकडे नाही! मी मध्यमवर्गीय जातीविषयी बोलतो आहे! ज्यांचे पोट हातावर आहेत त्याचे जीवन अत्यंत खडतर झाले आहे! केंद्राच्या अन रिझर्व्ह बँकेच्या मंजुरीशिवाय अतार्किक अन मूळ मुद्दलात वाढवण्याचा अधिकार थोडक्यात ‘अधिस्थगन'(moratorium) करून अक्षरशः टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार केला आहे!
ज्या ट्रम्पला आपण मूर्ख म्हणून हिणवतो त्याने त्या अमेरिकेत टाळेबंदीच्या काळात ज्यांचे रोजगार गेले. ज्यांना रोजगार नाहीत, अशांना मासिक १२०० डॉलर भत्ता त्याने सुरु केला आहे. इंग्लड तर त्याहून पुढे असून जाहीर केलेल्या उत्पन्नाच्या ८०% रक्कम ते जमा करीत आहे! आपल्या सरकारला केवळ कर्जबाजारी राष्ट्र बनवण्यात रस आहे!
केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या एकूणच वीस लाख कोटींच्या गप्पांच्या मागील गोष्टी पाहिल्या तर सहज लक्षात येईल की हा केवळ एका खिशातून दुसऱ्या खिशात पैसे टाकण्याचा विषय आहे! एक देश म्हणून सरकार आपल्या लबाड्या करणे कधी बंद करणार देव जाणे!
आपल्या सरकारकडे पैसे नाहीत म्हणावे तर जागतिक बँकेने व जागतिक आरोग्य संघटनेने केलेली मदत पाहिली तर डोळे विस्फारणारी आहे! पण त्यातील एक कवडीदेखील महाराष्ट्र राज्याला मिळाली नाही! असाही केंद्राला महाराष्ट्र भारताचा भाग वाटतो का हाच संशोधाचा विषय आहे! परंतु, त्यावर तूर्तास चर्चा नको!
मुद्दा इतकाच की ज्या देशात दिवसाला ७३०० हुन अधिक जण क्षय रोगाने, ३१७८+ कर्करोगाने, ४१० हुन अधिक रस्ते अपघातात बळी जातात. त्याने कोरोनासाठी अख्खा देश वेठीस धरावा हा निव्वळ हास्यास्पद प्रकार आहे! बाकी आपण सुज्ञच!!
मुक्तांगण
मुक्तांगण म्हणजे तरी काय? जिथं तुम्हाला हवं तस व्यक्त होता येत ती जागा. माझ्या लिखाणाचा प्रवास भयंकर मजेशीर! परंतु, ह्या ब्लॉग/अनुदिनीमध्ये जसे व्यक्त होता येते असे कुठेच व्यक्त होता येत नाही हे नक्की!
एका संशोधनानुसार प्रत्येक व्यक्तीच्या मनात साधारणतः दिवसाला बारा ते अठरा हजार विचार प्रत्येक दिवसाला येतात. व त्यातील अंशी टक्के विचार हे नकारात्मक असतात. मग असं असतांना शांत राहणे कसे शक्य आहे? अन त्यात माझ्यासारख्या जमदग्नीला ते पाळणेही असह्य!
ह्याच असाह्यतेतून जन्माला आले हे लिखाणाचे वेड! साधारण २००८ सालाचा तो काळ! त्यावेळी मी नुकताच मुंबईत नोकरी निमित्ताने होतो. रोजचा बोरिवली ते चर्चगेट असा लोकलचा प्रवास! त्यावेळी प्रत्यक्षात घडणाऱ्या घडामोडी अन वर्तमान पत्रात छापून येणाऱ्या गोष्टींमध्ये भयंकर अंतर! मग मी वर्तमानपत्रांच्या संकेतस्थळावर जाऊन प्रतिक्रियांच्या रकान्यात वस्तुस्थिती मांडायचो. पण ती प्रतिक्रिया कधी प्रसिद्धच होत नसायची.
पुढे २००९ मध्ये कामानिमित्त वर्डप्रेस ह्या माहिती व्यवस्थापन प्रणालीशी संबंध आला. अन माझा पहिला वाहिला ब्लॉग/नोंद जन्माला आला! पुढील इतिहास तुम्ही वाचू शकता. परंतु २०१५च्या आधीच त्याच नावीन्य संपलेलं! २०१६ मध्ये ट्विटर या मुक्त(?) व्यासपीठाशी गट्टी जमली अन भराभर वर्ष उलटली अन २०२० मध्ये तर त्याचा भलताच शीण आला. जातीपाती अन पक्षीय भेदाभेदापेक्षा त्याच्या व्यवस्थापन मंडळाच्या पूर्वग्रह कारवाईचा त्रास नकोसा झाला!
अन पुन्हा हा मोर्चा ब्लॉगकडे वळला! मध्यंतरीच्या काळात इंस्टाग्राम, फेसबुक अन लिंक्डइनसारख्या प्रकारावर फेरफटका मारला पण फारसा काही रस त्यात उत्पन्न झाला नाही. प्रत्येकाची मते अन आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात. त्यातून माझ्यासारख्या व्यक्तीबाबतीत सांगायचे ठरले तर माझा त्रास सहन करणाऱ्यांचाच मोठेपणा वर्णावा अशी परिस्थिती! हाहा!!
त्यामुळे साधारण एका तपाच्या आभासी जगात ब्लॉग हेच सर्वोत्तम आहे हे नमूद करावेसे वाटते! हवे तसे व्यक्त होता येते अन तुमच्या लिखाणावर तुमचाच मालकी हक्क असतो. उगाच कोणाच्या लहरीपणाचा फटका बसण्याचा संबंध मुळीच नसतो! खरं तर या सर्व समाज माध्यमांवर प्रत्येकजण व्यक्त होण्यासाठी जातो. पण तिथे ते सोडून सगळं काही शक्य आहे. असे माझे अनुभवाअंती ठाम मत झाले आहे!
हवे तसे मुक्तपणे मनाच्या लाटांना बागडू द्यायचे असेल तर नक्कीच स्वतःच्या हक्काचा एक ब्लॉग/अनुदिनी बनवा अन मुक्तपणे संचार करा. इथं ना चाच्यांची भीती न कुणाच्या हद्दीचा वाद! खऱ्या अर्थाने मुक्तांगण! म्हणजे माझ्यासारख्या व्यक्त होणार्याला अन प्रतिक्रियावाद्याला हा जणू स्वर्गच! एकदा प्रयत्न नक्की करून पहा!!
मध्यमवर्गीय
जगातील सर्वात तुच्छ जीव म्हणजे मध्यमवर्गीय. हा तुच्छ जीव पूर्वी चाळीचाळीत सापडायचा. आता गृहसंकुलात सापडतो. ह्या जीवाची घाणेरडी सवय म्हणजे हा जीव आपल्या अडचणींना आपले भाग्य समजतो!
ह्या जीवाची लक्षणे सहजगत्या लक्षात येतील. ह्याच्या खात्यात चुकूनही सरकार पैसे जमा करीत नाही. अन ना ह्याचे गृहकर्जाचे वा वाहनकर्जाचे हप्ते माफ होतात. तरीही हा जीव सरकारच्या प्रत्येक गोष्टीचे नेटाने समर्थन करतो.
शेतकरी निदान आपल्या हक्कासाठी भांडतो. परंतु, हा मध्यमवर्गीय जीव रस्त्यावर उतरण्याला अन आपले प्रश्न मांडायला तयार नसतो. त्यावर कितीही संकट येऊ दे! अगदी बँकेनं घराबाहेर जरी काढलं तरी हा नशीबच फुटकं म्हणून त्याला दोष देईल!
कायदा मोडणं वा वाकवणे उच्चभृ जमातीला सहजशक्य! पण हा कायदे पाळणार अन पाळा असा जगाला सल्ला देणार! पाहायला गेलं तर त्याच न उच्चभ्रू ऐकतो न गरीब! प्रशासन तर ह्याला रोजच लुबाडतो! तरीही हा नशिबात आहे म्हणून शांत!
भांडण तंटे करायला आपल्याला वेळ आहे का? नोकरी गेली तर? अशा विचारांचा हा भाबडा जीव! ह्याला फक्त मानवाची उत्क्रांती माहिती! जीवनात कुणी क्रांती आणलीच तर ते बायकोच्या नावापलीकडे काहीही नसते!
कितीही चुकीची गोष्ट घडो! अगदी समोर घडली वा खुद्द त्याच्या बाबतीत जरी घडली तरीही हा जीव ‘आपल्याला कुणाशी वैर करायचं नाही’ ह्या उदात्त हेतूने सोडून देतो.
ह्या जीवाच्या ह्या वृत्तीमुळे धनाढ्य महाधनाढ्य अन टवाळखोर नेता बनतो! मग कर्जबुडव्यांची अब्जावधींची कर्जमाफीचे निर्णय सहजगत्या होतात. अन बँका त्याची डोळ्यादेखत लूट करतात! पण हा तरीही शांत!
असा जीव पृथ्वीवर मोठ्या प्रमाणावर आढळत असला तरी निरुद्रवी असल्याने ह्याची कुणाला भीती नाही! ह्या जीवाशी साधर्म्य असणारे अजून एक जीव पृथ्वीवर आहे अन तो म्हणजे गांडूळ! ह्या गांडूळांना तुम्ही कितीही डिवचा पण हे कैवल्याचे अवतार.
हा जीव जोपर्यंत आपला मूळ स्वभाव बदलत नाही तोवर न त्यांच्या आयुष्यात न पृथ्वीच्या भूभागावर कोणताही बदल घडेल! बहुदा अन्न साखळीतील हा जीव दुसऱ्यासाठी भक्षणाचे अवीट भक्ष्य असण्याची शक्यता. बँका, प्रशासन, राजकारण्यांसाठी तर हा जीव म्हणजे मेजवानीच!
कशाला नसत्या फंदात पडायचं? कशाला धोपट मार्ग सोडायचा? कुणाशीही वाईटपणा घ्यायचा नाही अशा महान विचारांमुळे ह्या जीवात काही बदल घडेल अशी तूर्तास शक्यता नाही! अन जर बदल घडलाच तर तो ह्या गटात मोडणारही नाही!!

