टॅग: कोरोना

कोरोनाच्या विश्वात

कोरोनाच्या विश्वात कधीकधी इतर प्रश्न शिल्लक आहेत का असा प्रश्न पडतो. दिवसातून किमान शंभर वेळा कोरोना शब्द या न त्या कारणाने कानी पडतो. बर कोरोना सगळ्या जगाला होणार आहे हेही का कुणाच्या लक्षात येत नाही देव जाणे. त्यातून सरकारचा इतका ढिसाळ कारभार आहे की, कोरोना रुग्णांचे शेकड्यांमध्ये अंत्यसंस्कार होत आहेत. काही नदीकाठी कुत्री ओरबाडून खात आहेत.

दिवसेंदिवस आर्थिक ताण वाढत आहे. जनतेच्या सहनशीलतेच्या सर्व सीमा गेल्याच वर्षी ओलांडल्या गेल्या आहेत. त्यामुळे ह्या नावडत्या पण आर्थिक प्रश्नांशी निगडित विषयावर बोलायला भाग पडते. बरं, लसीकरण हे उत्तर आहे. तरी स्वयं घोषित साधू मोदी साहेबांना काही जमेना असंच दिसत आहे.

एव्हाना पेट्रोलच्या किंमती शतक ओलांडून गेलेल्या आहेत. खाद्यतेल दोनशे अन चहा चारशे रुपयांच्या घरात पोहचलेला आहे. डाळी देखील महागाईच्या घरी पाहुण्या गेलेल्या आहेत! सिलेंडर देखील आठशेच्या वर अन जनतेच्या खिशात कवडी नाही. अनेकांचे आर्थिक परिस्थिती बिकट झालेली आहे. बाळ कोरोनाने तर अनेकांचे जीव देखील घेतले.

आता त्यांच्या मृत्यू कोरोनमुळे झाला की सरकारी निष्काळजीपणामुळे हा वादाचा विषय होऊ शकतो. पण किमान दोन महिन्यांपासून घरात बसून माझ्यासारख्या अनेकांना आता बंदच्या विरोधात बंड करण्याची इच्छा होत आहे. संकट कधीही सांगून येत नाही. अन आल्यावर सावरायला वेळही देत नाही. त्यामुळे आहे तो वेळ आपल्या चुका सुधारण्याला द्यावा. पण इथं कुणाला सांगणार? सगळेच अतिशहाणे!!

वारंवार वीजपुरवठा खंडीत होत होता. त्यात आमच्या लाडक्या ब्रिटिश ठाकरेंनी गेल्या सव्वा वर्षातील नववी कोरोनासंदर्भातील टाळेबंदीची नियमावली जाहीर केली. नेहमीप्रमाणे तीही ब्रिटिशांच्या मातृभाषेत. बरं कितीदा तक्रारी कराव्या अन त्यावर कामधंदे सोडून किती वेळ दवडावा?

बाकी घसरलेली अर्थव्यवस्थेवर बोलण्यासारखं काहीच शिल्लक राहिलेलं नाही. जे शिल्लक आहे ते मोदी साहेबांनी टिकवलं तरी मोठी गोष्ट होईल. तर विषय इतकाच की कोरोनाच्या विश्वात आता मरणे सोपे अन जगणे अत्यंत महागडे झाले आहे. असच चालू राहील तर लवकरच भारताला सीरिया बुद्रुक म्हटले जाईल इतकं नक्की. काश्मीर प्रश्न सोपा अन उर्वरित भारत अवघड प्रश्न बनलेला आहे.

तर अशा रीतीने कोरोनाचा दुसरा अध्याय सुरु आहे. एकूणच भारताने जगात सर्वात मोठा फटका खाल्लेला आहे.

कोरोनाचे माहात्म्य

कोरोनाचे माहात्म्य वर्णावे इतका काही तो मोठा नाही. परंतु, त्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता त्याचे माहात्म्य वर्णावे असे वाटते. मी मी म्हणणाऱ्या अनेक स्वयंभूना ज्याने चितपट करून वस्तुस्थितीचे दर्शन घडवले तो हा कोरोना विषाणू!

त्याच्यामुळे म्हणा वा अन्य कारणामुळे म्हणा या पृथ्वीवर माणूस हा सर्वशक्तिमान नाही. ह्याची स्पष्ट जाणीव होते! तसेच अशी परिस्थिती भविष्यात कधीही उद्भवू शकते! त्यामुळे आपल्यासाठी यातून धडा घेण्याचा एकच गोष्ट आहे ती म्हणजे वर्तमानात जगा.

वर्तमानात यासाठी म्हणतोय कारण भूतकाळ आपण बदलू शकत नाही. भविष्यकाळाची कल्पना केली जाऊ शकते! अन भविष्यकाळ वर्तमानावर आधारलेला आहे. त्यामुळे आपल्याला जे हवंय ते वर्तमानातच हवंय ह्या विचाराने केल्यास अनेक मोठे बदल घडवून आणले जाऊ शकतात.

आज कोरोना आहे. उद्या काहीतरी नवीन असेल. ह्या नश्वर जगात पुढे काय वाढून ठेवलंय हे कोणीच सांगू शकत नाही. त्यामुळे, आपण आहे त्या वेळेचं योग्य नियोजन व अंमलबजावणी करणे अधिक संयुक्तिक राहील!

जर, एखादा नैसर्गिक हल्ला माणसांनाच काय देशाला हादरवून टाकू शकतो तर आपण भविष्याचा विचार करावाच कशाला? अन त्याच्या कल्पनेत वर्तमान का दवडावा?

मुळात आपल्याला भविष्यकाळ आहे ह्या संकल्पनेने अनेक संकल्पना कधी सत्यात येतच नाहीत. अन त्या याव्यात ह्या सद्हेतूने कोरोनाने माणसाला अशा पेच प्रसंगात टाकलेलं आहे की काय अशी शंका यावी अशी परिस्थिती आहे. त्यामुळे ह्यातून आपण आपले काम आजचे आजच संपण्याचा निर्धार जरी केला तरी अनेक मोठे बदल घडू शकतील!

माझ्याबद्दल सांगायचे झाले तर ह्या संकटातून जे शिकायला हवं ते मी शिकलो आहे! ते म्हणतात ना, जो दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला. आता विसंबणे हाच खरा धोका आहे. मग ते एखाद्या व्यक्तीवर असो वा वेळेवर. सगळंच गडबड गोंधळ निर्माण करते.

अन मग आपण टाहो फोडतो त्या बिचार्या नशिबावर. त्यामुळे कोरोनाच्या संकटात शिकण्यासारखी हीच गोष्ट आहे की, जे आहे ते आताच आहे. अशा पद्धतीने प्रयत्न केल्यास अडचणींच्या दोन पाऊल पुढे उभे राहता येईल! हा केवळ संकल्प न राहता रोजच्या जीवनाची सवय केली तर कोरोनाचे माहात्म्य साठा उत्तरी संपन्न होईल! अन भविष्यातील संकटरूपी वादळे झेलण्याच सामर्थ्य उभे राहील!

कोरोनापेक्षा टाळेबंदी वाईट

कोरोनापेक्षा टाळेबंदी वाईट! अन हेच सत्य आहे! हो मी आजच्या केंद्र सरकारच्या एकूणच संवेदना शून्य दिशाहीन हुकूमशाही कारभार बद्दल बोलत आहे. टाळेबंदी ज्या लोकांसाठी केली त्यांचेच जीव ह्या टाळेबंदीमुळे जाणार असतील तर कोरोनापेक्षा टाळेबंदी वाईट!

खरं तर राजकीय विषयावर बोलून आपल्याकडे काडीमात्रही फरक पडत नाही! परंतु तरीही ह्या निर्जीव अन निद्रिस्त समाजाला सांगण्यासाठी नव्हे तर मनाची घुसमट बाहेर काढण्यासाठी आजचा लेखनाचा प्रपंच करीत आहे!

देश अन प्रशासन स्वतः जनतेवर राज्य करण्यासाठीच जन्माला आलेल्या आहेत असा समज व्हावा अशी परिस्थिती आहे! हा अजस्त्र प्रशासनाचा नेमका उपयोग तरी काय असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे! साधारण दोन महिन्यांपासून सगळा देश घरात खितपत पडलेला आहे. ह्या देशाचे शेवटची व महत्वाचा घटक म्हणजे श्रमिक वर्ग आज जगण्यासाठी स्वगृही जाण्यासाठी मरायालाही तयार झालेला आहे!

कोणत्याही हुकूमशाही देशात नसेल एवढी अनागोंदी आज देशात सुरु असून नियोजनशून्यतेचा मूर्तिमंत पुतळा म्हणून आजच्या केंद्र सरकारला आपण म्हणू शकतो. बांगलादेश सारख्या अविकसित देशाने टाळेबंदी करण्याआधी लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी वेळ दिला! हे आपल्या सरकारला करणे अशक्य होत?

आज मजूर असोत वा टाळेबंदीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे मरणाऱ्यांचे सारे श्रेय ह्या केंद्र सरकारचे आहे! काय साधलं ह्याने? लोकांचे जीव वाचवण्यासाठी टाळेबंदी होती की मारण्यासाठी! बरं माझ्यासारखे जे आज नियम पाळून घरी बसलेले आहेत त्यांच्या प्रश्नावर बोलायचे झाल्यास अनेक कंगोरे बाहेर येतील!

सगळी कामे ठप्प आहेत! नावापैसा म्हणून कुणाकडे नाही! मी मध्यमवर्गीय जातीविषयी बोलतो आहे! ज्यांचे पोट हातावर आहेत त्याचे जीवन अत्यंत खडतर झाले आहे! केंद्राच्या अन रिझर्व्ह बँकेच्या मंजुरीशिवाय अतार्किक अन मूळ मुद्दलात वाढवण्याचा अधिकार थोडक्यात ‘अधिस्थगन'(moratorium) करून अक्षरशः टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार केला आहे!

ज्या ट्रम्पला आपण मूर्ख म्हणून हिणवतो त्याने त्या अमेरिकेत टाळेबंदीच्या काळात ज्यांचे रोजगार गेले. ज्यांना रोजगार नाहीत, अशांना मासिक १२०० डॉलर भत्ता त्याने सुरु केला आहे. इंग्लड तर त्याहून पुढे असून जाहीर केलेल्या उत्पन्नाच्या ८०% रक्कम ते जमा करीत आहे! आपल्या सरकारला केवळ कर्जबाजारी राष्ट्र बनवण्यात रस आहे!

केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या एकूणच वीस लाख कोटींच्या गप्पांच्या मागील गोष्टी पाहिल्या तर सहज लक्षात येईल की हा केवळ एका खिशातून दुसऱ्या खिशात पैसे टाकण्याचा विषय आहे! एक देश म्हणून सरकार आपल्या लबाड्या करणे कधी बंद करणार देव जाणे!

आपल्या सरकारकडे पैसे नाहीत म्हणावे तर जागतिक बँकेने व जागतिक आरोग्य संघटनेने केलेली मदत पाहिली तर डोळे विस्फारणारी आहे! पण त्यातील एक कवडीदेखील महाराष्ट्र राज्याला मिळाली नाही! असाही केंद्राला महाराष्ट्र भारताचा भाग वाटतो का हाच संशोधाचा विषय आहे! परंतु, त्यावर तूर्तास चर्चा नको!

मुद्दा इतकाच की ज्या देशात दिवसाला ७३०० हुन अधिक जण क्षय रोगाने, ३१७८+ कर्करोगाने, ४१० हुन अधिक रस्ते अपघातात बळी जातात. त्याने कोरोनासाठी अख्खा देश वेठीस धरावा हा निव्वळ हास्यास्पद प्रकार आहे! बाकी आपण सुज्ञच!!