टॅग: दृष्टी

दृष्टी तशी सृष्टी

दृष्टी तशी सृष्टी

दृष्टी तशी सृष्टी असते. कुणाला हे जग चांगले वाटते. तर कुणाला वाईट. एखाद्या पर्यावरणवाद्याला भेटा. तो तुम्हाला सृष्टी कशी विनाशाकडे चालली आहे, हे तो सांगेल. एखाद्या समाजसेवकाला भेटा. तो तुम्हास अर्धे जग अर्धपोटी आहे. हे सांगेल.

प्रत्येकाची आवड, रस यावर आपण आपला दृष्टिकोन तयार करतो. त्यात येणारे अनुभव आपले मत तयार करतात. त्यामुळे यात चुकीचे असे काहीच नाही. माझ्या वडिलांना धार्मिक गोष्टींमध्ये रस. त्यांच्याशी ज्या ज्या वेळी चर्चा करतो त्या त्या वेळी ते वेगवेगळ्या धर्मग्रंथातील बोधप्रत गोष्टी व माहिती देतात. माझा एक मित्र आहे. त्याचा स्वभाव रोखठोक. त्याला समोरच्या व्यक्ती अचूक ओळखता येतो. माझ्या लहान बंधुराजांना देखील हे जमते. ह्या दोघांच्या दृष्टिकोनातून पाहाल तर तुम्हाला जगातील सर्व प्रकारची मंडळी सापडतील.

माझ्यासारख्या मराठीप्रेमीला विचाराल तर मराठीच्या बाबतीतील चांगल्या वाईट गोष्टी आपणास कळतील. सांगण्याचा मुद्दा इतकाच की, दृष्टी तशी सृष्टी असते. हे लक्षात आले की, मीच बरोबर हा अहंभाव नाहीसा होतो. तुकाराम महाराज म्हणतात, “तुका म्हणे जे दर्पणी बिंबले । ते तया बाणले निश्चयेसि ।।”. थोडक्यात, जसे आपण पाहू तसे आपल्याला दिसेल. जशी आपली संगत तसे आपण होतो. त्यामुळे चांगली संगत महत्वाची आहे.

भौगोलिक अर्थानं पाहाल तर ही सृष्टी हे ब्रह्मांड आपल्या कल्पनेच्या पलीकडील आहे. अगदी गेल्या काही दिवसांपूर्वी शास्त्रज्ञांना एक ४६ हजार वर्षांपूर्वीचा जीव आढळला. अन तो जिवंत आहे. थोडक्यात आपले पूर्वजच. त्यामुळे अशक्य असे काहीच नाही. सांगण्याचा हेतू इतकाच की जशी आपली दृष्टी तशी सृष्टी आपल्याला दिसेल. त्यामुळे इतरांची मतांचा देखील आपण आदर करायला हवा.

याचा अर्थ कुणाचे चुकत नाही असं नाही. परंतु, आपण आपल्या दृष्टिकोनात फरक केला तर जगही निर्मळ दिसेल. नाहीतर कोणत्या जीवाला भोग चुकले आहेत? लोकमान्य टिळक आणि समाजसुधारक आगरकर यांच्यातील वादही ह्याच दृष्टीकोनाचा होता. पण तो विवेक आता कुठेतरी हरवतोय. त्यामुळे आजचा हा लेखप्रपंच. ह्यातून स्व:विकास तर होईल पण ह्या जाणीवेने आपल्या व्यक्तिमत्व देखील फुलेल.

मला स्वतःला हे अनुभवाअंती पटले. तसे अनुभव मिळणे हेही सुदैवच म्हणायचं. बाकी, वेगवेगळे दृष्टिकोन पाहिल्यावर आपल्याला त्यातील सीमा व न दिसणारे फरकाची कारणे सापडतात. तेही आपल्याला नवे ज्ञान देते. तूर्तास इतकेच.