टॅग: आर्थिक

काय बोलावं

काय बोलावं असा प्रश्न पडलेला आहे. इतके विषय आहे की, प्रत्येक विषयावर व्यक्त झालो तर एखादा ग्रंथ वगैरे तयार होईल. असो, गमतीचा भाग सोडला तर देश म्हणून आपण अपयशी ठरतोय असे वातावरण आहे.

ज्ञान मिळवणे प्रत्येकवेळी फायद्याचेच असते असे नाही. अज्ञानात सुख आहे. ह्या वाक्याची अनुभूती घेत आहे. आजकाल घरोघरी पदवीधर आहेत. अन जितके पदवीधर आहेत तितकेच बेरोजगार देखील आहेत. ही वस्तुस्थिती आहे. परंतु रोजचंच मढ, त्याला कोण रड? ह्या बेरोजगारांनी देश तयार करायचा ठरवला तर पाचपट ऑस्ट्रेलियाच्या अधिक लोकसंख्येचा तो देश असेल. महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या आसपास देशातील बेरोजगारांची संख्या आहे.

बेरोजगारीकडे दुर्लक्ष करावे अशी परिस्थिती संपलेली आहे. शासनाने गेल्या सहा वर्षांपासून कोणतीही भरती केलेली नाही. याचा अर्थ त्यांना उमेदवारांची गरज नाही. किंवा त्यांनी परीक्षा घेतल्या नाहीत. असा होत नाही. परीक्षा घेणे व त्यासाठी शुल्क आकारणे. अन त्या शुल्कावर देखील कर लावून वरकमाई करण्याचा त्यांनी आवडता उद्योग सुरु केला आहे. पूर्वी ह्या बेरोजगारांना नोकरीचे मृगजळ दाखवून अनेक खासगी संस्था व्यक्ती रोजगार मेळावाच्या नावाखाली लुटत होते. आता हाच उद्योग सरकारने देखील आरंभलेला आहे.

बरं, शासनाने गेल्या दशकात पेट्रोल, डिझेलवरील करातून अफाट संपत्ती मिळवली. इतका कर आकारणारा जगाच्या पाठीवर दुसरा कोणताही देश नाही. मग इतके श्रीमंत सरकार आहे असे म्हणावे अशीही परिस्थिती नाही. देशात २०१४ सालापर्यंत ५४ लक्ष कोटींचे कर्ज होते. आता ते २५०% पटींनी वाढून २०५ लक्ष कोटी इतके झाले. हे काय दर्शविते? काय बोलावं अन किती बोलावं?

भ्रष्टाचार संपला अशा वल्लागना कितीही होत राहोत. प्रत्यक्षात मात्र परिस्थिती गंभीर आहे. एका रात्रीत सात विमानतळांचे कंत्राट एकाच उद्योगपतीला मिळते. बर कागदी विमान सांभाळण्याचा देखील अनुभव नसलेल्या उद्योगपतीला कोणतीही निविदा, जाहिरात, प्रस्ताव न मागवता ताबडतोप कसे दिले जाते. हा खूप गंभीर विषय आहे. जागतिक पातळीवर मंदी असतांना त्या उद्योगपतीची वार्षिक उलाढाल ५ कोटी देखील नसतांना तीन वर्षात जगातील तिसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत उद्योगपती अशी गणना होते.

एक रुपयाचे देखील उत्पादन नसणाऱ्या पक्षाकडे आता सप्ततारांकित कार्यालये आहेत. एकही पुढारी वा पक्ष कर्जबाजारी होऊन आत्महत्या केल्याची घटना नाही. याऊलट ते महागड्या गाड्या घेऊन मिरवतात. हे सगळं कशाचं द्योतक आहे? अजून एक उदाहरण. ६५०० कोटींचे कर्ज असलेल्या उद्योगपतींचे कर्ज १५०० कोटींमध्ये रद्दबादल झाले. अन संबंधित उद्योगपतीला जप्त केलेली संपत्ती व उद्योग पुन्हा सुरु करण्याची अनुज्ञप्ती दिली गेली. मध्यंतरी ४८ हजार कोटींचे कर्ज असलेल्या उद्योगपतीला एक दिवसाची देखील शिक्षा नाही. उलट ४५५ कोटीत तो उद्योग विकला.


बातमीचा दुवा

यातील गमतीचा व सामायिक भाग असा की कर्ज देणाऱ्या सर्व संस्था ह्या शासकीय मालकीच्या होत्या. अन तोटा सहन करून त्या संस्था अवाक्षर देखील काढत नाही. विरोधक असोत की भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणाऱ्या अंमलबजावणी संचालनालयसारख्या संस्थांच्या ह्या आर्थिक गुन्ह्यांवर बोलण्याची देखील टाप नाही. कारवाई तर लांबचीच गोष्ट.

काय बोलावं पासून सुरवात करून बरंच बोललॊ. बोलता बोलता बरंच काही बोललो. असो, सुज्ञास अधिक सांगणे न लगे.

योग्य दिशा

योग्य दिशा

योग्य दिशा मिळण्यासाठी बराच काळ लागतो. बराच विचार अन खल करावा लागतो. हे अनुभव आज येतोय. व्यवसाय उभा करायचे ध्येय बाळगून २०१६ साली ठरवलेलं. त्यावेळेसही कठीण काळ सुरु होता. आताही सुरु आहे.

परंतु, आता गेल्या काही काळातील अनुभवातून व मिळालेल्या ज्ञानातून हेही एका देवळातील देवाच्या भेटीप्रमाणे आहे. एखाद्या विषयात तुम्ही पारंगत आहात याचा अर्थ तुम्ही स्वबळावर आर्थिक स्वातंत्र्य मिळवू शकता. पण त्यासाठी जसे तुम्ही तुमच्या क्षेत्रात शिक्षण आणि सराव केला. तसेच शिक्षण आणि सराव हा व्यवसाय नावाच्या विषयात देखील ते मिळवणे आवश्यक आहे.

त्यासाठी तुम्हाला व्यवसाय काय विषय आहे. त्यासाठी काय करणे आवश्यक आहे. सोबत व्यवसाय सुरु करण्यासाठी व नंतर लागणाऱ्या आर्थिक भांडवलाच नियोजन अशा अनेक गोष्टी येतात. मी अभिमन्यूप्रमाणे ह्या आर्थिक स्वातंत्र्याच चक्रव्यूह भेदले. पण त्यातून यशस्वी बाहेर कसे पडावे. हे मात्र माहित नसल्याने संकट ओढवून घेतले. संकट आल्यावर जे घडायचे ते सगळं घडले. आनंदाची बाब अशी की, यातून लाख मोलाचे ज्ञान मात्र मिळाले.

व्यवसाय करणे आणि तुमचे कार्यक्षेत्र ह्या दोन भिन्न बाबी असतात. व्यवसाय म्हणजे माणसे. त्यांच्याशी संवाद. त्यांच्या अडचणी सोडवण्याची संधी म्हणजे तुमचे काम. अन यातून तुम्हाला अन त्याला दोंघांना फायदा झाला तर झाला यशस्वी व्यवहार. नाहीतर यापैकी एकदा जरी तोट्यात गेला. तर मात्र वितुष्टता निर्माण होते. मी माझ्या कारकिर्दीत अनेक कामे एकहाती सांभाळली. त्यामुळे माझ्या क्षेत्रात मी पारंगत होतो. याची मला जाणीव होती. परंतु, मी ज्या आस्थापनेत कामाला होतो. त्यांचे सर्व ग्राहक अमेरिकादी देशातील होते.

तेथील लोक मी वास्तव्य करतो त्या देशाच्या मानाने सर्वच बाबतीत पुढारलेले. त्यामुळे त्याच्यासोबत काम करण्याचा फारसा फायदा मला इथं झाला नाही. त्यामुळे काही मोजके अपवाद वगळता अनेक अडचणी येत गेल्या. केलेल्या कामाचे पैसे काढणे हे तर वाघाच्या तोंडातील घास काढण्याइतके कठीण काम. सुदैवाने मला बहुतांशी ग्राहकांनी यात मला साहाय्य केले. आता जाऊन वेळेचे महत्व, प्रकल्प स्वीकारण्याआधी त्याचा सखोल अभ्यास. प्रकल्पाची नीट रूपरेषा. अन सगळ्यात महत्वाचं ग्राहकाची इच्छा. अन ते करण्यासाठी आपल्याला परवडेल अशी रक्कम. ह्या बाबी अतिशय महत्वाच्या आहेत. नाहीतर संकटांचे टोळके तुम्हाला हैराण केल्याखेरीज रहात नाही. यासाठी योग्य दिशा मिळणे महत्वाचे आहे.

शिवराय

शिवराय

शिवराय म्हणजे स्वराज्यसूर्य. कधीकाळी महाराजांचा एवढा गवगवा का? राजकारण सार असं वाटायचं. पण वैयक्तिक आयुष्यातील अडचणी पहिल्या. मग महाराजांचे मोठेपण पटले. प्रत्येकाने महाराजांचा आदर्श घ्यावा.

लहानपणी घरी जाणता राजा नाटकाच्या श्राव्यफिती होत्या. अगदी पाठ झालेलं. पुढे शिक्षण अन नोकरीसाठी पिंपरी चिंचवडमध्ये येणं झालं. सुरवातीचा काळ कठीण गेला. पुढे यशाचा काळ सुरु झाला. सुरवातीला दोन खोल्यांचं घर घेतलं. ते विकून तीन खोल्यांच घेतलं. भागातील पाणीप्रश्न वाढला. ते विकून नव्या ठिकाणी तीन खोल्यांचं घर घेतलं. गाडी, घर सगळं अगदी छान. नोकरीतील घुसमट कुणाला होत नाही? एके दिवशी राजीनामा देऊन स्वतःची संस्था उभी करण्याचा विचार केला.

अन तिथून खरं आयुष्य जगू लागलो. आर्थिक बाजू जेमतेम. शिते संपले म्हटल्यावर भुते कशाला राहतील? सोबत आजुबाजेचे वलय संपले. जीवनाच्या घाट वाटा मध्यरात्रीशी झुंज सुरु झाली. रोज एक नवीन संकट. जितकं स्वातंत्र्य तितकाच ताण. गृहकर्जरूपी औरंगजेब नाकाबंदी करू लागला. अचानक येणारी संकटे अक्षरशः धूळधाण उडवू लागली. काळरात्र संपेनाचं. सगळीकडे ताणच ताण. ताणाने एक आठवडा आजारीच पाडले.

व्यायाम नाही. आर्थिक अडचणी अन त्यात नवीन उद्योग चालू ठेवण्याचे आव्हान. मग आजारपण येणारच होते. सहज विचार करत असतांना महाराजांचा विचार आला. चार माणसांचे कुटुंब सांभाळणे इतकं कठीण असेल. तर महाराजांनी तीन लाखांच सैन्य. एक लाख घोडदळ. साडेतीनशेहुन अधिक गड कसे सांभाळले असतील. सहा सहा क्रूर शाह्या. त्यांच्यासमोर मूठभर सहकारी. कसा चमत्कार केला. उत्सुकता वाढली. इतिहासकारांच्या व्याख्यानातून महाराजांबाबत अधिकच कुतूहल वाढू लागले.

नुसत्या लढाया नव्हे तर शिवरायांचे दुर्ग विज्ञान. बलाढ्य गनिमांवर गनिमी चाल. वेगाचा व व्यक्तींचा अचूक उपयोग. अनेकदा संकटे आली. पण लढा सुरूच राहिला. बुद्धीचा आणि शक्तीचा अद्भुत संगम म्हणजे शिवराय. पंधराव्या वर्षी स्थापन केलेली स्वराज्य नावाची संस्था पन्नाशीत ३५० हुन अधिक गडांची अन तळांची झाली. तीन लक्ष सहकारी. मग काय माझ्या मनातील ताण कुठं गेला माहित नाही. अन आजवर सापडला नाही.

शिवरायांनी याच भूमीत स्वराज्य उभे केले. तेही आपल्याप्रमाणेच ह्याच मातीत जन्मले. मग त्यांच्या पाइकांना काय अशक्य? मग आयुष्याशी लढतोय. तेही निर्भीडपणे. आर्थिक काय सर्वच आघाड्यांवर यश मिळेपर्यंत लढा सुरु राहील. महाराजांनी परिस्थिती समोर हार मानली नाही. महाराजांच्या नावानेच दगड देखील जिवंत होईल. मग आपण तर माणसे आहोत. छत्रपतींचे नाव घेऊन पहा बारा हत्तीचे बळ संचारेल. शिवराय हा मंत्र आहे. महाराज म्हणजे मराठी माणसांसाठी महामृत्युंजय मंत्र!!

राक्षसेंद्र

राक्षसेंद्र पेक्षा अन्य वाईट शब्द सुचेना म्हणून वापरला. मृत्यूयुग वाटावे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा जगातील सर्वाधिक मोठा फटका हा निःसंशय भारताला बसलेला आहे. शक्यतो मी ह्या विषयावर बोलायचे टाळतो. पण जिथं दिवसाला चार चार हजार लोक एका साथीच्या रोगाने मरत आहेत. तिथं हा विषय कसा टाळता येणार?

नियोजनशून्य अन कमालीचे बौद्धिक दारिद्रय असलेले देशाचे राजकीय नेतृत्व भारताला लाभल्याने ह्यापेक्षा वेगळे परिणाम होण्याची शक्यताही नव्हती. देशात राक्षसेंद्र आमच्या राज्यात उद्धवेन्द्र अन उत्तर भारतात योगिंद्र असे महान दिग्गज नेते. नियोजन म्हणजे टाळेबंदी हीच काय ते आमच्या सरकारची बौद्धिक मजल! बरं टीकेचाही तिटकारा यावा इतकी भयाण परिस्थती निर्माण करून ठेवलेली आहे.

राष्ट्रीय लसीकरण शक्य नाही पण आणीबाणीच्या काळात सरकारकडे नवीन दरबार (सेंट्रल व्हिस्टा) बांधायला पैसा आहे. सैन्य आर्थिक अडचणीत आलंय! भाड्याने शस्त्रास्त्रे अन उपकरणे घेऊन देशाची रक्षण करण्याची त्यांच्यावर वेळ आलेली आहे. पण आम्हाला काय आम्ही दाढी वाढवणार थाळ्या अन ताट बडवणार!

कोरोना स्वतः आलेला नाही! त्याला आमच्या राक्षसेंद्रने नियोजनशून्य कारभाराने आणलाय व त्याने तळ ठोकलाय! सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर काय बोलायचे? मुळात ती भारतात अस्तित्वातच नाही. ती सुधारणे आमच्याच्याने शक्य नाही. अन असती तरी आमच्या सांघिक सरकारने ती विकून टाकली असती किंवा अदानी अंबानीला एका रात्रीत भाड्याने दिली असती.

नोटबंदी वाईट वाटली. त्याहून भयानक टाळेबंदी निघाली. महाभयानक तर नियोजनशून्य सरकारची बौद्धिक दिवाळखोरी वाटत आहे. सगळा दोष जनतेला देऊन काय साध्य होणार? प्राणवायू/ऑक्सिजन संपणे. सैन्याला आर्थिक चणचण निर्माण होणे. पेट्रोल, डिझेल, गॅस अन खाद्यतेलाच्या किमती तर त्यांच्या हातात नाहीत ना!

आज दुपारी एका आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीवर एक परकीय देशाची महिला, जगाला कोरोनाची लस पुरवणारा देश स्वतःच्या नागरिकांना पुरवू शकत नाही ही शोकांतिका आहे असं म्हणत होती. काय खोटं आहे? स्वतःच घर आगीने वेढलेलं असतांना बाजूच्या घराची आग विझवण्यासाठी धडपडण्यात कसलं आलंय डोंबल्याच विश्वगुरूपणा? हा तर निव्वळ मूर्खपणा आहे!

मी मान्य करतो ह्यात एकट्या(?) सरकारचा सगळा दोष नाही. पण यश मिळालं तर बोक्यांप्रमाणे भांडणारी ही मनपा/राज्य/सांघिक सरकारे अपयश आल्यावर बिनदिक्तपणे जनतेवर ढकलून मोकळी होतात. हेही चुकीचं आहे.

जगभरात अनेक देशांनी टाळेबंदी केली. पण त्यांनी त्यांच्या नागरिकांना पोसले. प्रत्यक्ष आर्थिक भार उचलला! अमेरिकेचे सरकारने साधे ब्रॉडबँडचे बिल देण्यासाठी भत्ते दिले. इंग्लंडच्या सरकारने पगाराच्या ८०% आर्थिक साहाय्य केले. अन आमच्या राज्य सरकार असो वा सांघिक सरकार इंधन, वीज बिलाच्या किंमती तिप्पट करून जनतेला वेठीस धरले. माल्या सारख्या धनाढ्यांचे कर्ज माफ करणारे सर्वोच्च न्यायालयात प्रामाणिक जनतेला आर्थिक दिलासा देण्याची खोटी देखील वचने देत नाहीत.

हे सगळं सहन होण्यापलीकडचे आहे.

विरोध कशासाठी..

काळा पैसा संपवण्याच्या दृष्टीने आपल्या पंतप्रधान मोदीनीं पाचशे व हजाराच्या नोटा रद्द करण्याची एका रात्री घोषणा केली. मग काय देशभर आर्थिक हिशोब गडबडले. कुणाला पटले तर कुणी त्याचा विरोध केला. तसा मुद्दा व निर्णय पटण्याजोगे आहे. पण त्याचा परिणाम माझ्यासारख्या सामान्य माणसावर फारच मोठा झालाय. कृपया हा विषय देशभक्तीशी जोडू नका ही विनंती. (more…)

भविष्य

प्रसिद्ध ज्योतिषाचार्य पांडित्य भूषण हेमंत आठल्ये यांचा नमस्कार. गेल्या अनेक दिवसांपासून नित्यनियमाने ‘राशी आणि स्वभाव’ या नोंदीवर अनेक जण आपले भविष्य जाणून घेण्यासाठी आतुरलेले आहेत. म्हणून आज सोमवार फाल्गुन शुक्लं ९ शके १९३२ रोजीच्या शुभमुहूर्तावर बोलावं म्हणतो. ज्यांचा जन्म १९५० ते १९८५या काळात झालाय त्यांना बालपण उत्तम जाईल. तारुण्यात आणि म्हातारपणी त्यांना त्रास संभवतो. ज्यांचा जन्म १९८५ सालानंतर झाला आहे, त्यांना मनमोहन योगामुळे त्रास संभवतो. देशाचेही जवळपास असेच भविष्य आहे. (more…)