मराठी कालगणना पुन्हा वापरात आणणे आवश्यक आहे. आपण मराठी आहोत. आणि आपली संस्कृती मराठी आहे. पण आपण आपली संस्कृती खऱ्या अर्थाने पाळतो का?
गंमत वाटेल पण, आपण जन्माने मराठी आहोत अन कर्माने अमराठी. आता ह्याला आपण जबाबदार आहोत असं मला म्हणायचं नाही. मला असं म्हणायचं आहे की, आजूबाजूच्या वातावरणामुळे आपण नकळत काळे ब्रिटिश झालो आहोत.
साधं कालगणनेच पहा ना. आज आपल्याला आपले महिने माहित नाही. न दिनांक! आपण जी दिनदर्शिका पाळतो ती अमराठी संस्कृतीची आहे. बरं आपली अचूक कालगणना सोडून जगाच्या बरोबर राहण्याच्या नादात आपण आपली प्राचीन कालगणना विसरून गेलो आहोत.
गुढीपाडवा हा आपल्या वर्षाचा पहिला दिवस. त्या दिवशी निसर्गाला नवीन पालवी फुटते! याच काळात फळांच्या राज्यच, आंब्याचं आगमन होत. याचा अर्थ निसर्गानुरूप आपली कालगणना आहे.
बरं, पृथ्वीच्या सूर्याभोवती आणि स्वतःभोवती फिरण्याच्या गतीवर आपण सर्व मनुष्यांनी आपली कालगणना ठरवली. स्वतःभोवती फिरण्यासाठी पृथ्वीला साधारणपणे २४ तास लागतात. बरं अचूक काढायला गेल्यास काही क्षणांचा फरक पडतो. हेच क्षण पुढे तास आणि दिवसांमध्ये वाढत जातात आणि ते सामावण्यासाठी अमराठी कालगणनेत दर तीन वर्षांनी काही दिवस वाढवले जातात.
सोप्या भाषेत, दिवस आणि रात्र ह्यात बदल होत असतात. त्याप्रमाणे न आपली घड्याळे चालतात न कालगणना! मराठी कालगणनेत सूर्य उगवल्यावर दिवस सुरु होतो. आणि मावळल्यावर रात्र! अमराठी कालगणनेत रात्री बारालाच दिवस सुरु होतो. इतकी अचूक कालगणना आपण आपलीच स्वीकारायला हवी!
आपले उत्सव आपली मराठी कालगणना स्वीकारतात. अन नेहमी गणपती उत्सवात हत्ती नक्षत्राच्या रूपाने निसर्ग धो धो जलधारा आसमंतातून कोसळतात. इतकी निसर्गानुरूप कालगणना क्वचितच दुसरी सापडेल!
जगात चिनी, इजिप्त, ज्यू, ग्रीक, रोमन, मध्य अमेरिका, ख्रिस्ती, मराठी(भारतीय) अशा अनेक कालगणना आहेत. आपल्याला व निसर्गाला पूरक गणना म्हणजे मराठी कालगणना. त्याचा आपण सणांसोबत दैनंदिन जीवनातही वापर व्हावा.
आपल्या महाराष्ट्रात आठवडी वेतन पद्धती होती. सात दिवसांचा आठवडा अशी सरळ मांडणी. ब्रिटिशांनी मासिक वेतन सुरु केले. एका वर्षात ५२ आठवडे असतात. प्रत्येक महिना चार आठवड्यांमध्ये विभागणी केल्यास १३ महिने होतात. पण ग्रेगोरियन कालगणनेत बाराच महिने असतात. सोप्या शब्दात तुम्ही १३ महिन्यांच्या बदल्यात १२ महिन्याचं वेतन घेता.
बक्षीस म्हणून जे दिवाळीत वेतन मिळते. ते बक्षीस नसून ते तेराव्या महिन्याचं वेतन आहे. आता हेही अधिकृत करून घेण्यामागे एका मराठी माणसाचाच हात आहे. आता मराठी कालगणना पुन्हा सर्वत्र करायची झाल्यास आधी स्वतःपासून ती वापरात आणणे आवश्यक आहे.
व्यक्तीपासून समाज आणि समाजापासून देश अन पुढे जग ते स्वीकारेल. त्यामुळे ह्या बदलासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवे इतकीच विनंती!!
महाराष्ट्राचा इतिहास हा जितका वैभवशाली आहे तितकाच तो अंधारातही आहे! शालेय शिक्षणात आपल्याला हा इतिहास शिकवला तर महाराष्ट्राचे भविष्य उज्वल आहे!
इतिहासाचे मुख्य तीन भागात विभागणी होते. एक ज्ञान नाही असा इतिहास. एक माहिती आहे पण त्याचे फारसे उपलब्ध नाही. अन एक भाग ज्याची लिखित साधने उपलब्ध आहे. पहिल्या भागाला प्राचीन! दुसऱ्या भागाला मध्ययुगीन अन तिसऱ्या भागाला आधुनिक संबोधतो.
महाराष्ट्राच्या इतिहासाचा विचार केला तर साधारण एकूण ज्ञात दोन हजार वर्षांचा इतिहास आहे! पूर्वी महाराष्ट्राला रठ्ठ, महारठ्ठ, अश्मक वगैरे नावे होती! साधारण इसवीसनाच्या सुरवातीचा इतिहास पहिला तर संपूर्ण दक्षिण भारतावर राज्य असलेले मावळचे सातवाहनांना दक्षिणाधिपती म्हटले जायचे! हे तेच वीर आहेत ज्यांच्यामुळे शालिवाहन शकाची कालगणना मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाली.
सातवाहन
तत्कालीन इराण, अफगाणीस्थातून आजच्या पाकिस्तानात उदयास आलेल्या शक नावाच्या बलशाली जमातीने भारतात दिग्विजय करत महाराष्ट्रावर चाल केली! अन आताच्या पंढरपूर भागात ती लाखोंच्या सेनेसोबत पराक्रमी सातवाहनांशी ते लढले. अन तो दिवस म्हणजे शालिवाहन शके सुरु झाले! त्याच विजयाचे प्रतीक म्हणजे मराठी संस्कृतीचे नववर्ष अर्थात गुढीपाडवा!!
महाराष्ट्र हा मुळातच देशाचा अनभिषिक्त सम्राट! रक्षणकर्ता अन राष्ट्रपती! रठ्ठ या संस्कृत शब्दाचा अर्थ मुळी मार देणारा असा होतो. आता महारठ्ठचा अर्थ तुम्ही लावलाच! दंड देण्याचा अधिकार राजाला असतो या अर्थाने महाराष्ट्र हा देशाचा मुख्य अन रक्षणकर्ता होतो.
महाराष्ट्र इसवीसनाच्या दुसऱ्या शतकात आंतरराष्ट्रीय व्यापार करीत होता. याचे पुरावे आजही उपलब्ध आहेत! हे यासाठी सांगतो कारण काही भेळपुरी अन पाणीपुरीच्या दुकानांना विकास म्हणत असतात! देशातील गुप्त साम्राज्यातही गुप्तांनी महाराष्ट्राशी स्नेहाचे संबंध राखले व राजकीय डावपेचांनी महाराष्ट्राच्या तत्कालीन बलदंड वाकाटकांच्या साम्राज्याला आपल्यावर चाल करू दिली नाही!
तेराव्या शतकाच्या अखेरीस देवगिरीच्या यादवांचा पराभव पाताळयंत्री अल्लाउद्दीन खिल्जीने करून हा अजेय भूभाग पहिल्यांदा काबीज केला! लक्षात घ्या देशाच्या दीड हजार वर्षांच्या गुलामीच्या काळापैकी महाराष्ट्र केवळ ४५० वर्षे गुलामीत होता!
पुढील साडे तीनशे वर्षे महाराष्ट्र गुलामीच्या अंधकारात खिचपत पडला! पुढील इतिहास थोडाफार आजही माहिती आहे! स्वराज्यसूर्य शिवरायांच्या आगमनाने महाराष्ट्राने जुने कापडे फेकावीत तशी गुलामीच्या साखळदंड फेकले अन त्रिखंडावर अधिपत्य गाजवणाऱ्या मुघलांच्या सत्तेला सुरुंग लावला.
शिवरायांच्या गमनानंतर दख्खन काबीज करण्याच्या हेतूने मुघल बादशहा औरंगजेब स्वतःला पाच लाखांच्या अन मोठ्या खजिन्यासह महाराष्ट्रात तळ ठोकला. दगाफ़टक्यामुळे महाराष्ट्राचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज त्याच्या तावडीत सापडले! मुघलांना साजेल अशी क्रूर अन निर्घृण हत्या त्याने करवली!
त्यानंतर न राजा न राजधानी पण महाराष्ट्राचे मराठा वाघ अतिविराट अशा शत्रूशी झुंज देत होते! पुढे बोलण्याआधी एक गोष्ट सांगतो. जो बोलायचा राहून गेला. प्राचीन रघुकुल नावाच्या संस्कृत ग्रंथात नमूद केल्यानुसार असा योद्धा जो दहा हजार योध्यांशी लढू शकतो असा मराठा! अशा मराठ्यांचे राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र!!
मराठा या शब्दाचे संस्कृत रुप महाराष्ट्र आहे अर्थात ज्यांचे राष्ट्र मोठे आहे ते मराठे. मरहट्टा, महारठ्ठा,रठ्ठा म्हणजे राष्ट्र,रठ्ठा मार देणे,महारथ, महारथी म्हणजे मराठा उर्फ राष्ट्रपती या संज्ञा प्राचीनकाळी अत्यन्त शौर्यशाली रणधुरन्धर क्षत्रिय राजबिण्ड्या पुरुषांनाच लावीत असत. याला आधार रघुवंशाच्या ६व्या सर्गामधील पुढील श्लोक आहे-
“‘एको दस सहस्राणि योधयेद्यस्तु धान्विनाम। शस्त्रशास्त्रप्रवीणश्च स वै प्रोक्तो महारथ:। अमितान्योधयेद्यस्तु संप्रोक्तोऽतिरथस्तु स:। रथस्त्वेकेन योद्धा स्यात्तन्न्यूनोऽर्द्धरथ: स्मृत:।’ !!
भावार्थ – शस्त्रशास्त्रात म्हणजे रणविद्येत प्रवीण होऊन जो एकथा क्षत्रिय दहा हजार योद्ध्यांबरोबर लढू शकतो त्या रणधुरन्धरासच मरहट्टा- महारथ महारथी म्हणतात.”
२७ वर्षे अखंड युद्धानंतर मुघलांच्या पाच लाखांची सेना कापली तर गेलीच पण सातत्याने होणाऱ्या मराठ्यांच्या हल्ल्याने मुघल बादशाह हैराण झाला व गतप्राण झाला! अन तिथून महाराष्ट्राने मागे पाहिले नाही! अगदी दिल्ली अन पुढं आताचा पाकिस्तानही ताब्यात घेत महाराष्ट्राने देशातील परकीय शक्तींना नष्ट केले! दिल्लीचा बादशहा नामधारी बनला! महाराष्ट्राच्या वाघांनी अफगाणीस्थाच्या सीमेवर गुरगुरायला सुरवात केलेली. दुवा: https://en.wikipedia.org/wiki/Maratha_Empire
मराठेशाही
लक्षात घ्या! शिवरायांच्या युद्धनीतीमुळे ब्रिटीश व युरोपियन सत्ता मराठेशाहीत खिळखिळ्याच नव्हे तर जमही बसवू शकल्या नव्हत्या. पुढे आपल्याच उत्तर भारताने घात केला अन पाठ दाखवून पळून गेलेला अब्दाली पानिपतात भारी पडला! तीन आठवड्यांच्या उपासमारीने महाराष्ट्राचे वाघ पानिपतात तहानभुकेने चक्कर येऊन कोसळत होते!
जगातील सर्वात भीषण लढायांमधील ती एक भीषण लढाईत अफगाणी अब्दाली शिल्लक राहिला ह्यायोगे विजयी ठरला! शेकडो मराठी स्त्रिया व मुले गुलाम बनवल्या गेल्या. त्यातील बहुतांश व्यक्ती पुढे शिखांनी अब्दालीकडून सोडवून घेतल्या. परंतु, त्या युद्धानंतर महाराष्ट्राची अख्खी तरुणाई कामी आली! अन ह्या देशाचा वाघ कमकुवत झाला!
त्याचाच फायदा घेऊन ब्रिटिशांनी मराठ्यांशी चाळीस वर्षे झुंजून देश ताब्यात घेतला! लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की महाराष्ट्र बलदंड होता तर परकीय पाय ठेऊ शकत नव्हता! उत्तर भारतीयांच्या गद्दारीने देश दीडशे तर महाराष्ट्र शंभर वर्षांसाठी गुलामीत गेला.
मग माझ्या मराठी वाघांनो, तुम्ही ठरवूनही सामान्य राहू शकत नाही! चारशे मावळ्यानिशी उभा कडा चढणारा अन दोन हजाराच्या सेनेला पराभूत करणारा नरवीर तान्हाजी मालुसरे असो वा अख्ख्या सेनेला खिंडीत गाठणारा स्वयं यमराज झालेला बाजीप्रभू देशपांडे असो! वा शत्रूला युद्धाची दाणादाण उडवणारे संताजी धनाजी असोत! हे वाघ ह्या महाराष्ट्राच्या मातीत जन्मले!
हा इतिहास आहे महाराष्ट्राचा! सोनं पिकवणारी जमीन अन पहाडाच्या छातीची माणसं ही ह्या महाराष्ट्राची ओळख! आता लक्षात आलं असेलच का हा इतिहास शाळेत शिकवत नाहीत! महाराष्ट्राचा इतिहास चे बाळकडू घेणारा कारकून म्हणून नव्हे तर वाघ बनून बाहेर पडेल!!