टॅग: मत

निर्भीडपणा

निर्भीडपणा

निर्भीडपणा हा एक गुण आहे. कसलीही भीती न बाळगता स्पष्टपणे बोलणे. हा गुण अंगी बाळगण्यासाठी अनेक बाबी आधी असणे आवश्यक आहे. असे व्यक्ती अगदी क्वचितच असतात. अन अशा व्यक्तींची भीती लबाडांना अधिक असते.

अनेकदा इतरांना दुखवायचे नाही म्हणून शब्द जपून वापरले जातात. अनेकदा यात अर्धसत्य सांगितले जाते. यातून दिशाभूल होते. काहीजण सोज्वळ भाषेत मत मांडतात. वादंग नको ही त्यामागील भूमिका. निर्भीडपणा गुण यासाठीच आहे. कुठलाही भीडभाड न ठेवता स्पष्टपणे मत मांडणे. यातून समोरच्या व्यक्तीला थेट मत कळते. हे खरेपणाचे लक्षण आहे.

अनेकदा निर्भीड व्यक्तीला अपरिपक्व समजतात. परंतु, निर्भीड व्यक्तीच्या मतामुळे अनेकदा सत्य समोर येते. काहीजण गोड शब्दात सांगण्याचा प्रयत्न करतात. पण त्यातून समोरच्या व्यक्तीवर परिणाम होईलच असे नाही. त्यामुळे निर्भीडपणे अधिक योग्य ठरते. लोकमान्य टिळक हे एक निर्भीड व्यक्तिमत्व. जे आहे ते सरळ स्पष्ट शब्दात.

मध्यंतरी त्यांचावर एक चित्रपट येऊन गेला. त्यातील त्यांची अनेक बेधक भूमिका दर्शवणारी वाक्ये होती. दुर्दम्य इच्छाशक्ती काय असते हेही त्यांच्याकडून घेण्यासारखे आहे. ताजे उदाहरण द्यायचं झालं तर जर्मनीच्या ॲनालेना बेरबॉक. काल परवाच त्या एका मुलाखतीत निर्भीडपणे चीनच्या शी जिंग पिंगला हुकूमशहा म्हणाल्या. इतक्या मोठ्या पदावरील व्यक्ती इतकी स्पष्ट भूमिका क्वचितपणे घेतात.

आचार्य अत्रेसारखे पत्रकार न डगमगता सरकारच्या विरोधात अशी मते मांडत. अन त्यांची मते सत्ताधारी देखील तितक्याच गांभीर्याने आणि आदराने घेत असत. चुकीला चूक म्हणणे म्हणजे निर्भीडपणा. आजकाल असे पत्रकार मंडळी अगदी तुरळक झाली आहेत. अन सरकार देखील अशा पत्रकारांवर गुन्हे दाखल करून दडपशाही करते. यावर मी अनेक दाखले देऊ शकतो. पण त्यावर नंतर सविस्तर चर्चा करूया.

निर्भीड लोक असणे हे समाजास, देशास हितकारक असते. ते दीपस्तंभाप्रमाणे असतात. हा गुण मात्र विद्वान लोकांनाच शोभून दिसतो. नाहीतर निव्वळ हा अतिशहाणपणा ठरतो. राजकारणातील सध्याची मंडळी मूर्ख शब्दाच्याही पलीकडे गेली आहे. त्यामुळे अतिशहाणपणा तसा बरा म्हणावा. एकूणच हा गुण कसा अंगिकारावा यासाठी अशी साधी सोपी पद्धत नाही.

आपण इतरांना त्रास न देता आपले मत स्पष्टपणे मांडले तरी तो निर्भीडपणा ठरतो. बाकी आपल्याला काय वाटते हेही आपण नमूद करावे. तुर्तास इतकेच.

नोंदी

नोंदी

नोंदी लिहिण्यासाठी सुचावं लागत. अन त्याहून मोठं त्यासाठी वेळ द्यावा लागतो. मध्यंतरीच्या बराच मोठा काळ दोन पैकी एक गोष्ट नसल्याने काहीही होत नव्हतं. अगदी ठरवून देखील. परंतु, गेल्या काही दिवसातील परिस्थिती पुन्हा लिहिण्यास उद्युक्त करीत आहे.

एक चीड, विचार मनात वादळ निर्माण करतो. अन नोंद तयार होते. प्रत्येकाला मन मोकळं करावस वाटत. मन मोकळं करण्यासाठी प्रत्येकाचे मार्गही वेगेवेगळे. मी नोंद खरडून सुखावतो. इथ जे स्वातंत्र्य आहे ते समाजमाध्यमांवर नाही. तिथं प्रत्येकाची तोंड वेगवेगळ्या दिशेला. अन राजकीय पक्षांच्या सुळसुळाट झाल्यापासून तिथं कुविचारांचं प्रदूषणच अधिक. त्यामुळे या न त्या कारणाने इकडे येणं होत!

हजारो विषय आहे. हजारो संकल्पना आहेत. अनेक विषयावर मत मांडायचं आहे. पण कुठून सुरवात करावी हेच कळेना. शेवटी आज तो दिवस उगवला. कोणतीही गोष्ट सातत्याने करण्याचा अयशस्वी प्रयत्न मी करीत असतो. चुकून एखाद्या विषयात यश येते. नोंदीत देखील यश येतेय का ते पाहूया.

आजूबाजूच्या घटना अगदी तापदायक आहेत. एकूणच परिस्थती अधिकच गंभीर होत आहे. व्यावसायिक पातळीवर आशेचा किरण दिसतोय. पण देशातील परिस्थितीमुळे मनःशांती नाही. प्रत्येकजण विचारांचा चष्मा घालून जग पाहतोय. मोकळ्या डोळ्याने जे दिसत तेच त्यांना त्यामुळे दिसेनासे झाले आहे. तीच खदखद ह्या नोंदी खरडण्यास प्रवृत्त करते. परिस्थतीत सुधारणा होईना. अन लोकांना सुधारणा व्हाव्या असेही वाटेना. सगळेच चिखलात यथेच्छ डुंबत आहेत. कुणास सांगावे तर तोही चिखलात ये म्हणतो!

सकारात्मक विचार करायचा असं मी रोज ठरवतो. पण रस्त्यांवरील खड्डे दादा चिडवतात. रस्त्यांच्या कडेला असलेले अनधिकृत आडवे तिडवे फलक अन त्यातून डोकावून हसणारे दादा, मामा, नाना, कार्यसम्राट खिजवतात असाच भास होतो.

अनधिकृत टपऱ्या, हातगाड्या आणि नियमबाह्य शासकीय कारभार एकेदिवशी माझाही माधव आपटे करणार हे नक्की. तक्रारींना शासन जुमानेना. आजूबाजूची परिस्थिती अन त्यात महागाईने आर्थिक यश देखील गोड लागेना. इतर देशांमध्ये जसा महागाई आणि सार्वजनिक प्रश्नांनी उद्रेक होतो तसा आपल्याकडे होईल का? बर वर्तमानाचं नसेल तर भविष्यासाठी कुठवर आशावादी राहायचं?

मग पुन्हा विचार येतो महाराजांचा. सहा शाह्या असतांना त्यांना भेदून स्वराज्य उभं राहील! एक न अनेक संकटे आली! अन मराठी वाघांनी ती पेलली! अन आताच्या तीन देशांवर स्वराज्य उभं केलं. अन पुन्हा आशेचा किरण दिसतो. लढण्याची उमेद जागी होते. हीच उर्मी आर्थिक आणि सामाजिक स्वराज्य, स्वातंत्र्याची पहाट आणेल! असो, अजूनही शब्दांच्या माळा मनातून ह्या नोंदीत उतरत आहेत! पण अतिरेकही वाईट! वाचकाला छळून कसे चालेल? तूर्तास इथं थांबतो! बाकी बोलूच!!