टॅग: महागाई

महागाई

महागाई

महागाईबद्दल कोणीच का बोलत नाही? अगदी पत्रकार अन वर्तमानपत्रे देखील. जणू काही ह्या शब्दावर बंदी आहे. मागणी वाढली वा पुरवठा कमी झाली तर महागाई वाढते. पण आपल्याकडे सरकारने कृत्रिमरीत्या महागाई वाढवली आहे. साधं स्वयंपाकाचा वायू घ्या. साडे तीनशेला मिळत होता. काल परवापर्यंत ११०६ रुपयांना मिळे. आजचा त्याचा भाव ९०६ रुपये आहे.

माझ्या अंदाजानुसार वर्षाला २५% महागाई आपल्या देशात आहे. स्वयंपाकाचा वायू नऊ वर्षात ३१६% महाग झालेला. ६० रुपयांचे पेट्रोल नऊ वर्षात ११६ वर गेलेले. आज त्याचा भाव १०६ आहे. म्हणजे १८०% भाववाढ. ९५ रुपयांचे खाद्यतेल २२० रुपयांपर्यंत गेलेले. म्हणजे २२९% भाववाढ. ज्या देशातील कुटुंबांचे सरासरी मासिक उत्पन्न २३ हजार रुपये आहे. त्यांच्यासाठी हे उध्वस्त करण्याजोगे आहे.

अगदी ५० रुपये दराने मिळणारे दूध आज ७२ रुपयांना (१४४% वाढ) मिळत आहे. बर उत्पन्नात कुठेही वाढ नाही. प्रत्येक नागरिकावर आज १ लाख १६ रुपयांचे कर्ज आहे. गंमत म्हणजे दरडोई उत्पन्न अवघे ९७ हजार आहे. इतकी गंभीर परिस्थिती आहे. काही जणांना असं वाटत की, लोकांचे उत्पन्न वाढले आहे. काही जणांच्या बाबतीत ते खरं देखील आहे. देशातील १% लोकांकडे आता देशातील संपत्तीच्या ४०% एवढं धन आलेलं आहे. अन गमतीचा भाग असा ते करात केवळ २५% वाटा उचलतात.

३% लोकांचे वार्षिक उत्त्पन्न हे ३ लाखांहून अधिक आहे. जागतिक दारिद्र्य रेषेखाली आज जवळपास संपूर्ण देश गेलेला आहे. अन महागाई त्यांना अधिकच गरीब करीत आहे. बाकी आमदार, खासदारांचे उत्पन्न करमुक्त आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर साधारणपणे मासिक तीन लाखांच्या घरात त्यांचे वेतन आहे. फुकाच्या राजकारणापायी आपण देशाचा कुंटणखाना करून ठेवला आहे. कोणताही देश त्या देशाच्या नागरिकांच्या उत्पन्नावर श्रीमंत किंवा गरीब ठरतो.

महागाई बोकाळली. कर्जबुडवे उद्योगपती निर्धोक देशांतर करतात. अन त्यांनी बुडवलेली कर्जे देशातील जनतेकडून अधिक कर व कर्जांवरील व्याजदराच्या रूपाने सरकार वसूल करीत आहे. गमतीचा भाग सत्ताधारी पक्ष महागाई नाहीच अशाच थाटात आहे. जनतेची वाचा फोडण्याचं काम सोडून वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्या राजकारण्यांची निव्वळ नळावरील भांडणे दाखवण्यात व्यग्र आहे.

यासाठी नागरिकांनीच सजग व्हावे. अन शक्य त्या मार्गाने ह्याला विरोध करावा. चीनमधील हुकूमशाहीला वेसण घालण्यासाठी तेथील नागरिकांनी आपल्या खर्चावर नियंत्रण आणले आहे. इतके की, देश म्हणून चीन गटांगळ्या खात आहे. जनतेची ताकद ही सरकारपेक्षा कधीही अधिक असते. त्यामुळे नागरिकांनी स्वतःच्या व पर्यायाने देशाच्या हिताचा विचार करावा. पक्षांचे विचार अन लाडक्या पुढाऱ्यांची अफू घेणे आतातरी बंद करावे. तूर्तास इतकेच!

शासन आपल्या दारी

शासन आपल्या दारी

शासन आपल्या दारी,
पन्नास खोके लई भारी ॥ध्रु॥

मराठी शाळा मारी,
सार्वजनिक आरोग्य सेवेची दुर्दशाच सारी,
खोट्या जाहिरातींचा भडीमार करी,
पन्नास खोके लई भारी ॥ध्रु॥

अदानी, रामदेवचा करमाफ करी,
सत्तापिपासू राजकारण विखारी,
घोटाळेबाजांच्या हाती सत्तेची चावी,
पन्नास खोके लई भारी ॥ध्रु॥

परप्रांतियांना कंत्राटांची खारी,
पुणे मेट्रोत बिहारींची भरती सारी,
मोठे प्रकल्प गुजरातच्या दारी!
पन्नास खोके लई भारी ॥ध्रु॥

बस गाड्यांची वाताहत सारी,
खड्ड्यांची मुंबई गोवा महामार्ग साक्ष देई,
सर्वच शहरात वाहतूककोंडी भारी!
समृद्धी महामार्ग मृत्यूकारी,
पन्नास खोके लई भारी ॥ध्रु॥

स्त्रीयांवर अत्याचाराची परिसीमा करी,
अत्याचाऱ्यांना अभय, शोध पत्रकारांवर गुन्हे भारी,
सत्ताधाऱ्यांच्या लीला गुवाहाटीच्या दारी,
पन्नास खोके लई भारी ॥ध्रु॥

सत्तेत भगवाधारी,
तरी जातीधर्म आंदोलनकारी,
तत्वाहीन राजकारणाची मांदियाळी,
पन्नास खोके लई भारी ॥ध्रु॥

सोन्याच्या मुंबईची सूत्रे कुनीतीच्या घरी,
मध्यान्न भोजनात जिह्याजिल्ह्यात घोटाळ्यांची शे कोटींची भरारी,
सत्तेसाठी खोकेबहाद्दरांची काहीही करण्याची तयारी,
पन्नास खोके लई भारी ॥ध्रु॥

भर पावसाळ्यात दोन हजार टँकरची फेरी,
काही ठिकाणी ओला दुष्काळ नांदी,
काय झाडी, काय डोंगर खोकेशाही गुवाहाटी मजा मारी,
पन्नास खोके लई भारी ॥ध्रु॥

तलाठी आगाऊ प्रश्नपत्रिकेची लाखोंच्या उलाढाली,
परीक्षेत गुन्हेगार पकडल्यावर मंत्रालय तडजोड करी,
कधी सारथी कधी महाराष्ट्र लोकसेवा,
कधी शिक्षकभरती, कधी पोलीसभरती,
सगळीकडे मलिद्याची किमया सारी,
पन्नास खोके लई भारी ॥ध्रु॥

शेतकरी आत्महत्या करी,
महागाई जनते छळी, दलालांची चांदी शेतमाल लाल सडा पाडी,
शासन आपल्या दारी,
पन्नास खोके लई भारी ॥ध्रु॥

कोरोनाच्या विश्वात

कोरोनाच्या विश्वात कधीकधी इतर प्रश्न शिल्लक आहेत का असा प्रश्न पडतो. दिवसातून किमान शंभर वेळा कोरोना शब्द या न त्या कारणाने कानी पडतो. बर कोरोना सगळ्या जगाला होणार आहे हेही का कुणाच्या लक्षात येत नाही देव जाणे. त्यातून सरकारचा इतका ढिसाळ कारभार आहे की, कोरोना रुग्णांचे शेकड्यांमध्ये अंत्यसंस्कार होत आहेत. काही नदीकाठी कुत्री ओरबाडून खात आहेत.

दिवसेंदिवस आर्थिक ताण वाढत आहे. जनतेच्या सहनशीलतेच्या सर्व सीमा गेल्याच वर्षी ओलांडल्या गेल्या आहेत. त्यामुळे ह्या नावडत्या पण आर्थिक प्रश्नांशी निगडित विषयावर बोलायला भाग पडते. बरं, लसीकरण हे उत्तर आहे. तरी स्वयं घोषित साधू मोदी साहेबांना काही जमेना असंच दिसत आहे.

एव्हाना पेट्रोलच्या किंमती शतक ओलांडून गेलेल्या आहेत. खाद्यतेल दोनशे अन चहा चारशे रुपयांच्या घरात पोहचलेला आहे. डाळी देखील महागाईच्या घरी पाहुण्या गेलेल्या आहेत! सिलेंडर देखील आठशेच्या वर अन जनतेच्या खिशात कवडी नाही. अनेकांचे आर्थिक परिस्थिती बिकट झालेली आहे. बाळ कोरोनाने तर अनेकांचे जीव देखील घेतले.

आता त्यांच्या मृत्यू कोरोनमुळे झाला की सरकारी निष्काळजीपणामुळे हा वादाचा विषय होऊ शकतो. पण किमान दोन महिन्यांपासून घरात बसून माझ्यासारख्या अनेकांना आता बंदच्या विरोधात बंड करण्याची इच्छा होत आहे. संकट कधीही सांगून येत नाही. अन आल्यावर सावरायला वेळही देत नाही. त्यामुळे आहे तो वेळ आपल्या चुका सुधारण्याला द्यावा. पण इथं कुणाला सांगणार? सगळेच अतिशहाणे!!

वारंवार वीजपुरवठा खंडीत होत होता. त्यात आमच्या लाडक्या ब्रिटिश ठाकरेंनी गेल्या सव्वा वर्षातील नववी कोरोनासंदर्भातील टाळेबंदीची नियमावली जाहीर केली. नेहमीप्रमाणे तीही ब्रिटिशांच्या मातृभाषेत. बरं कितीदा तक्रारी कराव्या अन त्यावर कामधंदे सोडून किती वेळ दवडावा?

बाकी घसरलेली अर्थव्यवस्थेवर बोलण्यासारखं काहीच शिल्लक राहिलेलं नाही. जे शिल्लक आहे ते मोदी साहेबांनी टिकवलं तरी मोठी गोष्ट होईल. तर विषय इतकाच की कोरोनाच्या विश्वात आता मरणे सोपे अन जगणे अत्यंत महागडे झाले आहे. असच चालू राहील तर लवकरच भारताला सीरिया बुद्रुक म्हटले जाईल इतकं नक्की. काश्मीर प्रश्न सोपा अन उर्वरित भारत अवघड प्रश्न बनलेला आहे.

तर अशा रीतीने कोरोनाचा दुसरा अध्याय सुरु आहे. एकूणच भारताने जगात सर्वात मोठा फटका खाल्लेला आहे.