टॅग: संस्कृती

चेंडूफळी

चेंडूफळी

चेंडूफळी हा आजकाल क्वचितच दिसणारा शब्द. क्रिकेट इंग्रजी शब्दाला हा मराठी पर्यायी शब्द. क्रिकेट ह्या शब्दाचा मराठीतच काय इंग्रजीत देखील काही अर्थ नाही. तो शब्द ‘क्रिक’ ह्या फ्लेमिश भाषेतून आलेला आहे. फ्लेमिश भाषा बेल्जीयममधील. क्रिक शब्दाचा इंग्रजी अर्थ स्टिक. मराठीत आपण शब्दशः न घेता एकत्र असा घेऊ शकतो.

एकत्र म्हणजे सर्व खेळाडूंना एकत्र हा खेळ खेळावा लागतो. या अर्थानं. अनेकांना हा अर्थ वा शब्द अतार्किक वाटेल. त्यापेक्षा चेंडूफळी हा शब्द अधिक संयुक्तिक वाटतो. कारण यात चेंडू व फळी या दोन्ही गोष्टी आहेत. आणि महत्वाचं म्हणजे त्याचा अर्थ सहजपणे समजेल असा आहे. सध्याचा काळ इंग्रजी शब्दाचा असल्याने कदाचित काहींना हे कठीण वाटेल. परंतु, हा शब्द सहजपणे वापरला जाऊ शकतो.

शेवटी भाषा म्हणजे काय? आपण जी बोलतो ती गोष्ट. मग कोणताही शब्द वापरला तर काय हरकत आहे असाही यावर वाद होऊ शकेल. परंतु शब्द बदलले की भाषा बदलते. भाषा बदलली की संस्कृती. आणि आजूबाजूच्या संस्कृती जर निसर्गाला पूरक नसेल तर निसर्गाची हत्या होते. अगदी उदाहरणादाखल, दिवाळीत फटाके हा काही आपला प्रकार नाही. चीनमधून तो आलेला. परंतु, तो आपल्या संस्कृतीत इतका रुळलाय की, संस्कृतीरक्षकांना फटाके उडवू नका. त्याने पर्यावरणाची हानी होते. असे सांगितले तर ते चिडतात.

३१ डिसेंबर अगदी अघोषित राष्ट्रीय सण झाला आहे. तिथेही फटाके, दारू आणि न बोलाव्या अशा गोष्टी घडतात. मुद्दा इतकाच की शब्द, संस्कृती बदलल्यावर काय काय परिणाम होऊ शकतात. ह्याच उदाहरण. अगदी सर्व पुढारलेले देश त्यांच्या भाषेची एकरूप झालेले तुम्हाला दिसतील. आता चेंडूफळी म्हणा की क्रिकेट. हे तुमच्या विवेकबुद्धीला पटेल ते वापरा. कालच एक चेंडूफळीचा सामना पहिला. खरं तर बऱ्याच वर्षांनी पाहिला. त्याचे समालोचन मराठीत असल्याने ऐकण्यास सुलभ झाले.

शब्द तयार होण्याचा काळ हा मोठा असतो. भाषा तयार होण्यासाठी कित्येक दशके जातात. परंतु, भाषा नष्ट करण्याला शब्दच जबाबदार ठरतात. मुख्य प्रवाहात चेंडूफळी हा शब्द जाईल की नाही. माहित नाही. परंतु, यापुढे चेंडूफळी हाच शब्दाचा वापर करणे मला एक शब्द आणि भाषा प्रेमी या अर्थानं योग्य वाटतो. कारण त्याला उमजेल असा अर्थ आहे. आपणही याचा विचार करावा.

संस्कृती

संस्कृती

संस्कृती हा मानवी जीवनातील अविभाज्य घटक. संस्कृती भूगोलाला पूरक असते. खरतर भूगोलामुळेच संस्कृतीचा उगम होतो. भूगोलात बदल झाला तर संस्कृतीत बदल होतो. अन संस्कृती बदलली की भूगोल देखील बदलतो.

जिथं थंड वातावरण असते, तिथं लोक जाड आणि काळे कपडे घालतात. शरीराची उष्णता वाढवण्यासाठी उष्णतावर्धक पेय घेतात. जिथं खूप पाऊस पडतो. तिथं छत्री व कमी ओले होणारे कपडे वापरतात. अशाच एकानेक गोष्टीने संस्कृती जन्मते. खानपान देखील तसेच जिथं खूप उष्ण वातावरण असते तिथं खाण्यात गोडाचे प्रमाण अधिक असते.

आपल्या देशात इतकी विविधता का याचाही कारण तेच. कारण कुठं खूप पाऊस तर कुठे वाळवंट. कुठे खूप उष्णता तर कुठे भरपूर पाऊस. त्यामुळे संस्कृतीत वैविध्य निर्माण झाले. अन ते राहणार. त्यामुळेच लोकांच्या आचार, विचारात व भाषेत फरक राहणार. संस्कृती ही निसर्गपूरक असते. त्यामुळे जोवर संस्कृती आहे तोवर निसर्ग आहे. विकासाच्या नावाखाली आपण संस्कृतीत बदल केला आणि निसर्गाची हत्या घडू लागली. आज आपण पृथ्वीवरील जीवसृष्टी धोक्यात आणली आहे.

दगडात अन झाडात कुठं देव असतो. असे म्हणून संस्कृतीची थट्टा केली. आपण अफाट वृक्षतोड केली. विकासाच्या नावाखाली पर्यावरणात देखील आपण बदल केले. अन आता सर्व भूभाग प्रदूषणाच्या विळख्यात सापडला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि युरोपीय देशात वनांना आगी लागत आहेत. आणि जपानमध्ये भयंकर वादळे तडाखा देत आहेत. आपल्याकडे दुष्काळ आणि तापमान ५० अंश गाठत आहे. आणि उत्तर भारतात पूर गावे वाहून नेत आहे.

तरीही आपण त्याच्या मुळाकडे साफ दुर्लक्ष करतो. सरकार नावाचा लाकूडतोड्या देशभर उन्माद करीत आहे. आपल्या अधिकाराचा गैरवापर करून निसर्गाशी वैर ओढत आहे. भाषा हे संस्कृतीचे बाह्यरूप. भाषेतून आपण संस्कृतीची ओळख करू शकतो. इंग्रजी भाषेत ‘रेन रेन गो अवे’ म्हणजेच पावसाला जा म्हणणारी कविता आहे. तर मराठीत ‘येरे येरे पावसा’ ही कविता आहे. ह्यातून आपण दोन संस्कृतीतील फरक पाहू शकतो.

मराठी संस्कृती महाराष्ट्रातून जसजशी कमी होते. तसतसे दुष्काळ वाढत आहे. दुष्काळ पाणीप्रश्न निर्माण करतो. असे का? कारण आपण निसर्गपूजक आहोत. शिवरायांनी अगदी नौकाबांधणीसाठी इतर राज्यातून लाकूड मागवले. पण महाराष्ट्रातील वृक्षांना हात लावला नाही. वृक्षतोड करण्यासाठी ‘एकास पाच’ असा नियम केलेला. म्हणजे एक झाड तोडण्याआधी पाच झाडांचे संगोपन करायचे मग एक झाड तोडण्यास परवानगी. आताचे सरकार एका रात्रीत लाखो झाडांची यथेच्छ कत्तल करते. अन दुष्काळाला आपण निसर्गाला दोष देतो! गंमत आहे नई?

मुद्दा इतकाच की, संस्कृतीचे महत्व आपण मनापासून स्वीकारायला हवे. चालीरीती का कशासाठी ह्याचे पैलू आपण उलगडून पाहायला हवे! नाहीतर विनाश असाही डोळ्यासमोर होत आहेच!!

मराठीमय महाराष्ट्रासाठी

मराठीमय महाराष्ट्रासाठी अनेक संकल्पना राबवता येऊ शकतात. खरंतर आपल्या साधुसंतांनी म्हटलेलं, हे विश्वची माझे घर! त्यायोगे मराठीमय विश्व हेही शक्य आहे. तूर्तास आपल्या राज्यातील मराठीच्या वापराबाबत बोलूयात! व्यावसायिक भाषा वाढते अन टिकते!

आक्रमणाचे म्हणाल तर गेल्या दोन हजार वर्षांपासून महाराष्ट्रावर व मराठी संस्कृतीवर आक्रमण होत होतंच आहे. त्यामुळे आधी सगळं छान होत आणि आता ह्रास होतोय असं काही नाही! त्यावेळेस प्रत्यक्षात शत्रू मराठी माणसांचेच गळे चिरायच्या! आता केवळ तो भाषेला मारण्याचा प्रयत्न करतोय. थोडक्यात मराठी संस्कृतीवर आक्रमणे होत आलेली आहेत व पुढेही होतील!

मुद्दा इतकाच की, मराठी माणसाने मराठी भाषेवर व महाराष्ट्रावर येणाऱ्या संकटाची चिंता करू नये! ते होणारच! जर महाराष्ट्र अख्या देशावर हिंदवी स्वराज्याची पताका फडकवू शकतो तर तो मराठी संस्कृती व भाषेचा प्रसार जगभर करून मराठीमय पृथ्वी करू शकतो!

ब्रिटिशांनी ज्यावेळी जगाच्या पृष्ठभागाच्या एक चतुर्थांश भूभागावर स्वामित्व मिळवले त्यावेळी त्यांची लोकसंख्या साधारण ५१ लाखांच्या घरात होती! जर ५१ लाख ब्रिटिश जगाच्या चौथाईवर अधिकार मिळवू शकत असतील! जर ते त्यांची भाषा जागतिक बनवू शकत असतील तर आठ कोटींच्या मराठी संस्कृतीला काय अशक्य? खरतर संख्याबळ आणि ध्येय यांचा काहीच संबंध नाही! तरीही जर आपल्याला शंका असेल तर आपण जगातील कोणत्याही युद्धाचा ताळेबंद करून पाहावा.

इथं तर आपण केवळ मराठीमय महाराष्ट्राची संकल्पना राबवण्याची गोष्ट बोलत आहोत! आज देशातील प्रत्येक राज्यात मराठी भाषिक आहे. इतकंच काय २०० देशांपैकी ७२ हुन अधिक देशामध्ये मराठी भाषिक स्थायिक आहेत. मग भीती कशाची?

मराठीमय महाराष्ट्र करण्यासाठी आधी आपल्याला वस्तुस्थिती पाहावी लागेल! जेणेकरून अमराठी भाषांची आणि मराठीची सद्यस्थिती व ताकद याची जाणीव होईल! अमराठी भाषिक संस्थांमध्ये मराठीचा वापर कसा होईल व तो होणार नसेल तर त्याला मराठी पर्यायी संस्था कशा उभ्या राहतील याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. त्याखेरीज आपण या लढाईत यशस्वी होणार नाहीत!

लक्षात घ्या हेही युद्धच आहे! अन युद्ध कधीही संपत नसते! भाषिक आक्रमण आर्थिक कारणांमुळे झालेले आहे! त्याच कारणासाठी पूर्वीही युद्धे झालेली! महाराष्ट्र मराठीमय करण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या प्रत्येकाने हे कधीही विसरता कामा नये!

मराठी वाढवण्याचे अनेक मार्ग आहेत. अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर महाराष्ट्रात दिशादर्शक व फलकांवर मराठी असावी असा कायदा आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या पाठी आपण लागणे आवश्यक आहे! कोणीही कुठेही जाऊन राहू शकतो वा व्यवसाय करू शकतो परंतु, त्या भागातील कायदे पाळणे अपेक्षित असते. अमराठी भाषिकांकडून कळत नकळत अनेक कायद्यांचे उल्लंघन होते. तेही आपण लक्षात आणून दिले तर राज्यात मराठीचा प्रसार जोमाने होऊ शकतो!

देशातील राज्यातील एक तृतीयांश लोकसंख्या १३ वर्षांपेक्षा कमी असलेल्यांची आहे. त्यांच्यासाठी मराठीचे सांस्कृतिक वर्ग भरवले तर नक्कीच त्याचा फायदा त्यांना व मराठी संस्कृतीला होईल. मराठी संबंधी जनजागृती करण्यासंबंधी विविध स्पर्धा भरवून त्याद्वारे मराठीबाबत व महाराष्ट्राच्या अजेय इतिहासाची माहिती दिली जाऊ शकते.

शासनाची विविध आस्थापनांमध्ये नियमानुसार मराठीचा वापर होतो का नाही हेही पाहणे आवश्यक आहे. त्यानेही अमराठी भाषांचा अकारण वापर थांबेल व मराठीला कायद्यानुसार प्रथम स्थान मिळू शकेल. असे साधे परंतु सोपे पर्याय आपण वापरायला हवेत!

सोबतच आपण आभासी जगताचा योग्य वापर करीत मराठी भाषेसंबंधी अनेक उपक्रम राबवू शकतो. भविष्यात माहिती हे इंधनाची जागा घेईल. त्यावेळी मराठी भाषेमुळे आर्थिक फायदा मराठी भाषिकांना होऊ शकेल! माहिती असणे हे एकप्रकारे शस्त्रसज्ज असण्याप्रमाणे आहे! त्यामुळे मराठी भाषिकांनी ज्ञान मिळवावे! व मराठीत नसलेल्या गोष्टी मराठीत भाषांतरित कराव्यात! त्यानेही महाराष्ट्र मराठी वाढवण्यास मदत होईल!

मराठीमय महाराष्ट्रासाठी मराठीत सर्व सेवा कशा येतील याची चाचपणी करणे आवश्यक आहे. तसेच व्यावसायिक भाषा म्हणून मराठीचाच वापर कसा होईल हेही कटाक्षाने पहिले पाहिजे. अन या दोन्ही गोष्टींसाठी व्यावसायिक मराठी भाषिक असणे वा सेवा पुरावठेदार मराठी असणे आवश्यक आहे. त्यासाठी रोजगाराच्या व व्यवसायाच्या संधी मराठी भाषिकांनाच कशा मिळू शकतील याच्या यंत्रणेची नितांत गरज आहे!!