हाय

काल अप्सराने स्वतःहून ‘हाय हेमंत’ म्हटले. किती आनंद झाला म्हणून सांगू! पण मी गाढवासारखा घाई घाईत ‘हाय’ म्हणून सटकलो. काय यार, त्याच ‘हाय’ चाच विचार करत होतो. म्हणजे आपण एखाद्या गोष्टीचा विचार करावा. आणि तीच गोष्ट आपल्या पुढ्यात यावी, तस झाल अगदी. दिवस खूप छान गेला. आणि संध्याकाळी घरी गेल्यावर आईने ‘मुलीचे काका आयसीयु आहेत. म्हणून मग जायचे रद्द झाले आहे’. देव पण ना! किती मनातल्या इच्छा पूर्ण करत आहे. खरंच आजकाल मी स्वप्नात आहे की सत्यात तेच कळत नाही आहे. सगळ अगदी मनाप्रमाणे घडते आहे.

त्यात हा पाऊस! आहाहा! किती छान वातावरण असते. ते पावसाचे थेंब! आणि कंपनीच्या इमारतीच्या बाजूला असलेली हिरवीगार डोंगररांग. असले सुंदर वातावरण असते ना! त्यात अप्सरा माझ्याशी काल स्वतःहून केलेले ‘हाय’. आता ना काहीच सुचत नाही आहे. काल देखील ती इतकी सुंदर दिसत होती. मुळात मी अपेक्षा केलेल्या स्वप्नसुंदरीपेक्षा हजार पटीने ती ‘अप्सरा’ सुंदर आहे. आणि तितकीच प्रेमळ. आणि तिचा तो गोड आवाज. कानात मध टाकल्याप्रमाणे!!! पण पुन्हा काल रात्री त्या स्थळाचा वडिलांना फोन आला होता. त्यामुळे आज जायचे ठरलेले आहे. मला ना, आता ‘स्थळ’ म्हणजेच ‘खलनायक’ वाटत आहे.

ती आधी का नाही भेटली? काल घरी जातांना बस अख्खी भरलेली. मला बसायलाही जागा मिळाली नाही. मी दरवाज्याच्या सुरवातीला उभा. आणि एक मुलगी माझ्याकडे पाठ करून उभी. साधी हलायला सुद्धा जागा नव्हती. कारण बसमधील उभी असलेली ‘बुजगावणी’ जागची हलत नव्हती. त्या बसच्या ब्रेकने, आणि रस्त्यातील खड्ड्याने तीचा स्पर्श होत होता. पण तसे झाले की माझे मलाच खजील व्हायचे. तिचीही काही चूक नव्हती. मुळात जागा खूप कमी होती. आपण अप्सरा सोबत ‘गद्दारी’ करतो अस सारख वाटत होत. ती ज्यावेळी माझी होईल त्यावेळी, नक्की या गोष्टीची माफी मागेल. काल मित्रांशी बोलतांना ते मला ‘नाही भेटली तर’ अस म्हणत होते. खरंच कधी कधी वाटत अस! मला म्हणत होते. नंतर पस्तावायची वेळ यायला नको. आत्ता स्थळ नाकारतो आहे.

पण खर सांगू का, मी आता काय करतो आहे. आणि जे काही घडते आहे. यात काय बरोबर आणि काय चूक हे समजतच नाही आहे. फक्त ‘अप्सरा’. बाकी काहीच सुचत नाही आहे. मित्रांशी बोलतांना, त्यांच्यासोबत जेवतांना, रात्री घरी सगळीकडेच ती माझ्यासोबत आहे असेच वाटते. तिचा चेहरा आठवला की, माझा चेहरा खुलतो. मग समोर कोण आहे. किंवा मी काय करतो हे सुद्धा समजत नाही. पण जरी उद्या जावून तिचा नकार असेल आणि आता जे करतो आहे. याचा परिणाम भविष्यकाळात असेल तरीही मला चालेल. इतक्या ‘सुंदर’ स्वप्नासाठी ती खूपच छोटी किंमत असेल. आयुष्यात पहिल्यांदा मी माझा स्वतःचा निर्णय घेतला आहे. काय होईल हे पुढचे पुढे. सोडा, यार हे मित्र ना! जावू द्या तो विषय. आज मी तिला एक इमेल केला आहे. पहिल्यांदा वाटले की, तिला विचारावे मग पाठवावा मेल. पण राहावालच नाही. मेल साधाच आहे. पण बघुयात, तिला आवडला तर बरे होईल.

Leave a Reply